
गोंडगाव चौफुली येथे भीषण अपघात; वाहन चालक गंभीर जखमी.!!!
भडगाव ता प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गोंडगाव चौफुली परिसरात शनिवारी (दि. 24) रात्री सुमारे 10 ते 10.30 वाजेच्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मक्याने भरलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मक्याने भरलेला ट्रक (क्रमांक MH 18 AA 7343) हा महामार्गाच्या कडेला उभा होता. याच दरम्यान भडगावकडून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MH 54/6678 ने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चारचाकी वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात चारचाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी चालक हा नगरदेवळा येथील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या चौफुली परिसरात यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याने नागरिकांकडून वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.



