Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 7

शिव उद्योग संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या व सुरक्षित व्यवसाय संधी

0

शिव उद्योग संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या व सुरक्षित व्यवसाय संधी

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत सुमारे १.५० कोटी ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, त्यांच्यापैकी अनेक जण वेळेचा योग्य उपयोग न होणे, अनुभव सांगण्यासाठी संवादाचा अभाव तसेच निवृत्तीनंतर उद्भवणारी आर्थिक तंगी अशा समस्यांना सामोरे जात आहेत. गावी घर बांधणे, मुलांचे लग्न किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आयुष्याची जमापुंजी खर्च झाल्याने पुढील आयुष्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असून, याचा परिणाम त्यांच्या सामाजिक संपर्कांवरही होत आहे.

या पार्श्वभूमीवर सुखवस्तू तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांसाठी शिव उद्योग संघटना कमी गुंतवणुकीत आणि कमी अंगमेहनतीत सुरू करता येतील अशा सोप्या व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमांतर्गत व्यवसाय सुरू करताना आणि तो चालविताना शिव उद्योग संघटना प्रत्येक टप्प्यावर संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिक साहाय्य सेवा महत्त्वाची असून, एकटे राहणाऱ्या किंवा ज्यांची मुले बाहेरगावी असतात अशा नागरिकांना बँकिंग व शासकीय कामे, पेन्शनविषयक प्रक्रिया, लाईट बिल भरणे, टॅक्स फाईल करणे, डॉक्टरांकडे जाण्यासाठी सोबत करणे, औषधांचे नियोजन तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू व औषधे घरपोच देण्यासारख्या सेवा देण्यात येणार आहेत. यासोबतच सुखवस्तू ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधणे व गप्पा मारणे हेदेखील या सेवेत समाविष्ट आहे.

नोकरी करणाऱ्या पालकांसाठी बालसंगोपन व डे-केअर सेवा तसेच परदेशात किंवा इतर शहरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी होम-चेक व मालमत्ता व्यवस्थापन सेवा या उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये मुलांची काळजी घेणे, त्यांना गोष्टी सांगणे व अभ्यासात मदत करणे, रिकाम्या घरांची नियमित पाहणी, साफसफाई, पाणी व वीजबिल भरणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे करून घेणे यांचा समावेश आहे.

याशिवाय आध्यात्मिक व सामाजिक सेवांद्वारे पूजा-पाठ व पुरोहित सेवा, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना वाचन सेवा, गृहनिर्माण संस्थांमध्ये सचिव किंवा सल्लागार म्हणून कार्य करणे तसेच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी सहलींचे आयोजन करण्यासारख्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासोबतच आर्थिक स्वावलंबनास हातभार लागणार असून, “तुम्ही ठरवा, बाकी शिव उद्योग संघटना तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद (९८२०३१७१५०) यांनी व्यक्त केला आहे.

“गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” ने ॲड. सोपान बुडबाडकर सन्मानित

0

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र जनगौरव परिषद या संस्थेच्यावतीने शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी वांद्रे, मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ॲड. सोपान विठ्ठल बुडबाडकर (लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते) यांना “गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी राज्यपाल आंध्र प्रदेश) यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

या समारंभास राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे थेट चौदावे वंशज संभाजी राजे जाधवराव (इतिहास संशोधक), दैनिक ‘मुंबई मित्र’ चे संपादक व कामगार नेते अभिजित राणे, ‘जयऱ्या’ या आत्मचरित्राचे लेखक व कवी जयराम सोनावणे, तसेच मैत्री संस्था अध्यक्ष व मुक्त पत्रकार सूरज भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी साहित्यिक कवी ॲड. सोपान बुडबाडकर यांना आपल्या स्वरचित ‘कैदखाना कैफाचा’ या कवितेचे गायन करून सादरीकरण करण्याची संधी मिळाली. साहित्य, सामाजिक कार्य आणि वैचारिक योगदानाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून देण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

भडगांव येथील दर्शन विठ्ठल पाटील याची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ म्हणून हॅट्रिक

0

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित स्व. सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात दर्शन विठ्ठल पाटील याने साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्काराची सलग तिसऱ्यांदा (हॅट्रिक) पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

दर्शन पाटील याने शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास, तसेच विविध उपक्रमांतील सहभागाच्या जोरावर हा बहुमान मिळविला. सातत्याने तिन्ही वर्षे हा सन्मान मिळविणे ही संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब ठरली आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. श्री. हेरंब कुलकर्णी (शिक्षण तज्ज्ञ व ज्येष्ठ समाजसेवक) यांच्या हस्ते दर्शन पाटील यास सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्शनच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दर्शन विठ्ठल पाटील याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, सातत्य, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असा संदेश या हॅट्रिक यशातून मिळतो.

सलग तिसऱ्यांदा ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार पटकावणारा दर्शन विठ्ठल पाटील हा गुणवत्तेची हॅट्रिक करणारा भडगावचा विद्यार्थी.

गुजरातकडे जाणारे पाणी आता आपल्या शेतात नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला मुहूर्त; नाशिक–जळगावचा कायापालट.!!!

0

नाशिक प्रतिनिधी :-

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी व अतितुटीच्या भागांसाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला अखेर मुहूर्त लाभला आहे. जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४,११६ कोटी रुपयांची निविदा काढली असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनेला अखेर प्रत्यक्ष कामाची दिशा मिळाली आहे. या निर्णयामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील शेती, पिण्याचे पाणी आणि एकूणच जलव्यवस्थापनात आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नार, पार, औरंगा व अंबिका या चारही पश्चिमवाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. या नद्या पुढे गुजरातमार्गे वाहत अरबी समुद्रात मिळतात. पावसाळ्यात या नद्यांमधील मोठ्या प्रमाणावरील पाणी विनावापर समुद्रात वाहून जाते. हेच अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नार–पार–गिरणा नदी जोड योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय, आर्थिक व राजकीय कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावरच राहिला होता.

या प्रकल्पाअंतर्गत नार व पार नद्यांमधील एकूण १०.७६ टीएमसी (३०४.६० दशलक्ष घनमीटर) पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे. यापैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यांच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल, तर उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ७,४६५ कोटी रुपये इतकी आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ४,११६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाची रचना (डिझाइन) तसेच बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या ठिकाणी नऊ धरणांचे बांधकाम करण्यात येणार असून, या धरणांमधून पाणी उचलून ते बोगदे, कालवे आणि पाईपलाइनद्वारे गिरणा नदीत सोडले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कालवे, पाइप वितरण जाळे तसेच गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या पूरक कामांची निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.

या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरण परिसरातील ७,१७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पामुळे केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भूजल पातळी, ग्रामीण रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांनाही मोठी चालना मिळणार आहे. वर्षानुवर्षे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नुकताच निवडून आलेले प्रभाग क्र. ७ मधील अपक्ष नगरसेवक अलीम शाह यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील अपक्ष नगरसेवक अलीम शाह यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक लखीचंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रवेशामुळे भडगाव शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेच्या स्थानिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशानुसार अलीम शाह यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. शिवसेनेची शाल घालून व पक्षचिन्ह देत त्यांचा औपचारिक प्रवेश जाहीर करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेवक लखीचंद पाटील म्हणाले की, शिवसेना ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी चळवळ असून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. अलीम शाह यांचा अनुभव आणि व्यापक जनसंपर्क शिवसेनेस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षप्रवेशावेळी अलीम शाह म्हणाले की, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मोठ्या पातळीवर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्व व संघटित पक्षाची गरज असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ तसेच संपूर्ण भडगाव शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका समन्वयक युवराज आबा पाटील,  व शहर पदाधिकारी, नुकतेच निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे हॅट्रिक नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, नगरसेवक इमरान अली सय्यद, प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक हाजी खलील (मिस्त्री), हाजी अल्ताफ खाटीक,राजू शाह, रावसाहेब पाटील, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलीम शाह यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवरा–बायकोची विजयी जोडी दिग्गजांवर भारी भडगावमध्ये शिवसेनेची भक्कम आघाडी

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगांवच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विस्थापित तरुण नेते लखीचंद पाटील हे किंगमेकर ठरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यातून शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

 

या निवडणुकीत लखीचंद पाटील पुरस्कृत नगराध्यक्ष उमेदवाराने विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे. या सोबतच पाटील दाम्पत्यानेही निवडणूक जिंकत शहर भर लक्ष वेधून घेतले आहे. नवरा–बायको दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येण्याची घटना भडगावच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

 

लखीचंद पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मधून एकूण १३९१ मते मिळवत ६३४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात सर्वसामान्य नागरिक, युवक व महिलांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रचारात विकास, पारदर्शकता व सर्वसमावेशक राजकारण या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

 

दरम्यान, त्यांच्या पत्नी समीक्षा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. समीक्षा पाटील यांनी एकूण १३०१ मते मिळवत अवघ्या १४ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. विशेष म्हणजे, त्यांनी दिग्गज नेते प्रताप नाना पाटील यांच्या कन्येचा पराभव केला. हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पारंपरिक राजकारणाला मतदारांनी नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.

 

अवघ्या १४ मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मतमोजणीदरम्यान शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरात विजयाच्या घोषणा देत शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले.

या निकालामुळे भडगाव च्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आगामी काळात शहराच्या विकासासाठी शिवसेना आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहरात विकासाला गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद.!!!

0

सावरकर सदन येथे पाचोरा व भडगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद.!!!

मुंबई | प्रतिनिधी :-

मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा व भडगाव नगरपरिषदांच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा यांचा सत्कार व शुभेच्छा समारंभ पार पडला. यावेळी शिवसेनेच्या पाचोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोरआप्पा पाटील तसेच भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई प्रदीप मालचे यांना मा. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नगरपालिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांनी पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करताना नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी विकासपुरुष आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. लखीचंद पाटील, नगरसेविका सौ. समीक्षा पाटील, पिंटू मराठे, जहांगीर मालचे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्हा परिषद जळगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न.!!!

0

 

भडगाव प्रतिनिधी : –

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले.

या शिबिरामध्ये जळगाव तालुका सर्व आरोग्य अधिकारी,सर्व आरोग्य सेवा कर्मचारी,समुदाय आरोग्य अधिकारी व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.याबाबत अधिक माहिती देतांना डॉ.सचिन भायेकर यांनी सांगितले की सिकलसेल,थॅलेसेमीया अशा रक्ताशी निगडित आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती मातांना नियमित रक्ताची गरज भासत असते.अशा सर्व गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून रक्तदान हे सर्वात मोठे श्रेष्ठदान असल्याने वर्षातून किमान दोन वेळा तरी प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करावे.असे आवाहन सदर प्रसंगी डॉ.भायेकर यांनी केले.स्वतः डॉ. भायेकर यांनी देखील रक्तदान करून सहभाग नोंदवला.सदर शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते,डॉ.प्रमोद पांढरे, डॉ.बाळासाहेब वाबळे,डॉ.सुपे आदी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तथा

इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांची रक्तपेढीची सर्व टीम,आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच

जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.आज पार पडलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लेख – ग्रामकौलाचा इशारा आणि महानगरांची निर्णायक कसोटी

0

महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर पालिका निवडणुकांचे २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेले निकाल फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता समजून घेण्याचे साधन नाहीत; ते ग्रामीण व निमशहरी मतदारांनी दिलेले लोकशाहीचे ठाम, जागरूक आणि स्पष्ट विधान आहेत. मतदारांचा बदललेला स्वभाव स्पष्ट दिसतो—सत्ता फक्त सवयीची नको, ती परिणामकारक, उत्तरदायी आणि दैनंदिन जीवनाला थेट स्पर्श करणारी हवी. हा कौल केवळ निवडणुकीचा निकाल नसून, प्रशासनाला दिलेला अंतिम इशारा आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातून उमटलेला कौल काही महत्त्वाचे संदेश ठळकपणे अधोरेखित करतो. मतदार आता फक्त घोषणा किंवा ओळखीच्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महागाई, सार्वजनिक सुविधा आणि स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता—हेच आज निर्णयाचे खरे निकष ठरत आहेत. काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी, काही ठिकाणी सत्ताबदल, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला दिलेली संधी हे स्पष्ट करतात की मतदार आता प्रत्यक्ष काम पाहतो आणि त्यावर न्याय्य निर्णय देतो. काही ठिकाणी दीर्घकाळ सत्तेत असलेली समीकरणे मतदारांनी क्षणार्धात बदलून टाकली, हे या बदललेल्या मानसिकतेचे ठळक उदाहरण ठरते.

 

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका केवळ वॉटर–गटर–मीटर व्यवस्थापन करणारी यंत्रणा नाहीत; त्या शहराच्या आत्म्याची आणि भविष्यास दिशा देणाऱ्या संस्थाही आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी–निजामपूर, पिंपरी–चिंचवड, नवी मुंबई, वसई–विरार, कल्याण–डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड–वाघाळा, मालेगाव, मीरा–भाईंदर, सांगली–मीरज–कुपवाड, पनवेल, अमरावती, इचलकरंजी, अकोला आणि अहिल्यानगर—या शहरांतून राज्याच्या अर्थचक्राची इंजिने सातत्याने चालत असतात.

 

वाढती महागाई, घरकुलांच्या वाढत्या किंमती, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, झोपडपट्ट्यांतील समस्या आणि असमान विकास यांनी शहरी जीवन अधिक गुंतागुंतीचे आणि तणावग्रस्त केले आहे. दीर्घकाळ चाललेल्या प्रशासक कारभारामुळे लोकप्रतिनिधींच्या अभावात नागरिकांचा थेट सहभाग मर्यादित झाला असून उत्तरदायित्वाची धार बोथट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका फक्त सत्ता हस्तांतरणापुरत्या मर्यादित न राहता, लोकप्रतिनिधींच्या पुनरागमनासाठी आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी नागरिकांनी व्यक्त केलेली ठाम मागणी ठरणार आहेत.

 

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका काही ठळक आणि परस्परपूरक प्रवाह स्पष्टपणे दर्शवतात. कामगिरीवर आधारित मतदान हा कळीचा मुद्दा ठरत असून, केवळ प्रचाराच्या जोरावर संधी मिळणे आता अशक्य होत चालले आहे. स्थानिक, पारदर्शक, सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह नेतृत्वाला मतदार प्राधान्य देताना दिसतात. महिला आणि तरुण मतदार सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, रोजगार, शिक्षण व आरोग्य या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेत आहेत. शहरी मध्यमवर्ग घरकुल, वाहतूक, महागाई आणि एकूणच जीवनमानाशी निगडित प्रश्नांवर उघड नाराजी व्यक्त करत आहे. त्याचवेळी पूर, उष्णतेच्या लाटा, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय व आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्द्यांनाही मतदार गंभीरतेने घेत आहेत. डिजिटल व सोशल मिडियामुळे प्रचार अधिक प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन मतदार स्वतः करीत आहेत. हे सर्व प्रवाह परस्परांपासून वेगळे नसून, शहरी मतदाराच्या वाढत्या अपेक्षा, जागरूकता आणि उत्तरदायित्वाच्या मागणीचे प्रतिबिंब आहेत.

 

ग्रामीण भागात मतदान प्रामुख्याने स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता, पाणीपुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधांभोवती केंद्रित असते. त्याउलट शहरी भागात आर्थिक स्थैर्य, जीवनमान, सार्वजनिक सेवा, घरकुल आणि वाहतूक व्यवस्था हे निर्णायक मुद्दे ठरतात. ही तुलना राज्यातील बदलत्या सामाजिक–राजकीय वास्तवाचे स्पष्ट चित्र उभे करते.

 

राज्यातील प्रमुख १० महानगरपालिकांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांचे स्वरूप ठळकपणे वेगवेगळे दिसते. बृहन्मुंबईत वाहतूक, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन आघाडीवर आहेत; पुण्यात सार्वजनिक वाहतूक आणि शिक्षण सुविधा महत्त्वाच्या ठरतात; ठाण्यात पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडी हे कळीचे प्रश्न आहेत; नागपुरात औद्योगिक वाढीसोबत वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे; नाशिकमध्ये पाणी, महागाई आणि रस्त्यांची अवस्था चर्चेत आहे; कोल्हापुरात सांडपाणी आणि सार्वजनिक सुविधांचा प्रश्न केंद्रस्थानी आहे; सोलापुरात कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा महत्त्वाचा ठरतो; नवी मुंबईत वाहतूक आणि पर्यावरण व्यवस्थापन महत्त्वाचे मुद्दे आहेत; वसई–विरारमध्ये झोपडपट्ट्या, पाणी आणि सार्वजनिक सेवा गंभीर प्रश्न आहेत; तर पिंपरी–चिंचवडमध्ये उद्योग, वाहतूक आणि घरकुल हे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. इतर महानगरपालिकांमध्येही मतदानाची दिशा प्रामुख्याने कामगिरी, नेतृत्व आणि पारदर्शक कारभाराभोवतीच फिरताना दिसते—हीच बाब भविष्यातील शहरी राजकारणाला व्यक्तिकेंद्रिततेकडून उत्तरदायित्वकेंद्रिततेकडे नेणारी निर्णायक वळणरेषा ठरत आहे.

 

लोकशाही ही केवळ मतदानाची एकदिवसीय प्रक्रिया नसून, ती सतत चालणारी संवादयात्रा आहे. ग्रामीण महाराष्ट्राने आपल्या अपेक्षा आणि भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत; आता शहरी मतदारांची वेळ आहे. शहरे फक्त सिमेंट आणि डांबरावर उभी नसतात; ती उभी असतात नागरिकांच्या स्वप्नांवर, अपेक्षांवर आणि न्यायाच्या भावनेवर. ही स्वप्ने जेव्हा मतपेटीत उतरतात, तेव्हा फक्त सत्ता बदलत नाही—राजकीय संस्कृती बदलते, प्रशासनाची जबाबदारी निश्चित होते आणि लोकशाहीची नाडी अधिक ठामपणे धडधडू लागते.

 

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्णायक परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. कामगिरी, स्थानिक नेतृत्व आणि पारदर्शक कारभार हेच मतदानाचे मुख्य निकष असतील. महिला, तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक सत्तासमीकरणे बदलणार नाहीत, तर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रवाहांनाही दिशा देतील—सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाची आणि विरोधकांसाठी जबाबदारी स्वीकारण्याची ही वेळ असेल. या निवडणुकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय शक्तींना या कौलाचे पडसाद पुढील विधानसभा राजकारणात उमटताना दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : २२/१२/२०२५ वेळ : १०:३५

कर्जबाजारी अर्थव्यवस्थेचे आव्हान, एआयचे वर्चस्व आणि बदलते पर्यावरण : स्त्रीकेंद्री दृष्टीकोनातून सखोल मंथन.!!!

0

कर्जबाजारी अर्थव्यवस्थेचे आव्हान, एआयचे वर्चस्व आणि बदलते पर्यावरण : स्त्रीकेंद्री दृष्टीकोनातून सखोल मंथन.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तीन दिवसीय महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्था : एक स्त्रीकेंद्री दृष्टीकोन या परिसंवादात अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांनी आगामी काळात एआयचे वर्चस्व आणि पर्यावरणातील बदल सर्वसामान्यांच्या जीवनावर खोल परिणाम घडवतील, असा इशारा दिला. कुटुंबाचा अर्थसंकल्प सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रीवर असते; मात्र युद्धसदृश्य जागतिक परिस्थितीमुळे बहुतेक देशांचा मोठा खर्च संरक्षणावर होत असल्याने अनेक कल्याणकारी, विशेषतः स्त्रीकेंद्री योजना बंद पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. जाहिराती आणि प्रलोभनांच्या माध्यमातून स्त्रियांना भौतिक सुखांच्या मागे लावत कर्जबाजारी करणारी अर्थव्यवस्था कशी कळत-नकळत लादली जाते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे कर्जबाजारी अर्थव्यवस्था बळावत असून हा धोका वेळीच ओळखून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी ‘भवितव्य अस्वस्थ जगाचे’ या परिसंवादात ‘भवितव्य’ आणि ‘भविष्य’ यातील फरक स्पष्ट करताना युद्धमय वातावरण, एआय आणि हवामान बदल यांच्या एकत्रित परिणामांमुळे संपूर्ण मानववंशासाठी गंभीर संकट निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शमा दलवाई यांनी ‘हक्कांपासून हतबलतेकडे प्रवास’ या विषयावर आपले मनोगत मांडले. पितृसत्ता आणि मनुवाद या विषयावर छाया खोब्रागडे यांनी भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या ५० वर्षांच्या वाटचालीला शुभेच्छा देत, सध्याच्या गढूळ वातावरणात आव्हान देणाऱ्या आपण सर्व जण छोट्या पणत्या असल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात स्त्री मुक्ती परिषदेने राबवलेल्या विविध अभियानांमुळे व्यापक एकजूट निर्माण झाल्याबद्दल त्यांनी परिषदेचे आभार मानले.

 

लोकशाही संस्थांचे खच्चीकरण आणि अराजक याविषयी बोलताना तिस्ता सेटलवाड यांनी स्त्रियांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर ‘लक्षित हिंसा’ केली जाते, ही बाब उदाहरणांसह मांडली. गेल्या ७५ वर्षांत सत्तांतर होत राहिले असले तरी मूळ ढाचा बदलत गेल्याने जातीय हिंसेकडे आजही पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समस्या अनेक असल्या तरी त्यांची उत्तरे शोधण्यासाठी संघटित विचार आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अँड. वृंदा ग्रोवर यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले, दहशत आणि जनसंहाराच्या राजकारणावर भाष्य करताना गेल्या दशकात न्यायव्यवस्थेत झालेले बदल समाजमनावर गंभीर परिणाम घडवत असल्याचे स्पष्ट केले. युनिफॉर्म सिव्हिल कोड असो वा ऊस कामगारांचे प्रश्न, अनेक ठिकाणी स्त्रियांनाच लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

पर्यावरण आणि विकास या परिसंवादात जंगल व इतर नैसर्गिक संसाधने, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांसमोरील आव्हाने, घनकचरा व्यवस्थापन, शेती, शेतकरी महिला, विस्थापन आणि विकासनीती या विषयांवर सखोल चर्चा झाली. पेसा कायद्यानुसार प्रत्येक गावात ग्रामसभा असणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याने सामुदायिक आणि वैयक्तिक अधिकारांसाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याचे तज्ञांनी सांगितले. याच परिषदेत LGBTQ+ समूहाच्या हक्कांच्या लढ्याला स्त्री मुक्ती परिषदेने ठाम पाठिंबा जाहीर केला. “क्वीअर, ट्रान्स, इंटरसेक्स व सेक्स वर्कर्स : संघर्ष आणि राजकारण” या विषयावरील परिसंवादात पारलिंगी, सेक्सवर्कर आणि विविध ट्रान्सजेंडर समूहातील प्रतिनिधींनी निर्भीडपणे आपली ओळख मांडली. डॉ. चयनिका शाह यांच्या अध्यक्षतेखाली जमीर कांबळे, आर्य पाठक, भव्या गुप्ता, शाल्स महाजन, निमिष साने, मृदूल, किरण आणि स्मृती गिरीष यांनी सहभाग घेतला. लिंगभाव आणि लैंगिकतेच्या चौकटीपलीकडे जाऊन ट्रान्सजेंडर व ट्रान्स स्त्रियांना हक्क आणि स्वतंत्र ओळख मिळणे ही काळाची गरज असून, भेदभावमुक्त समाजनिर्मितीसाठी स्त्री मुक्ती परिषद सातत्याने साथ देईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!