Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 6

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

0

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

रावेर प्रतिनिधी

शहरातील डी.एम. मॅरेज हॉल समोर असलेल्या शाळा परिसरात महावितरणच्या विद्युत तारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या लोंबकळत्या तारांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे. महावितरणच्या सर्व्हिस लाईनच्या विद्युत तारा तब्बल १० ते १५ फूट खाली लोंबकळत असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे.

या रस्त्यावरून दररोज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. मात्र लोंबकळलेल्या तारांमुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्याच्या झोतासोबत या तारा जोरजोरात हलताना दिसतात. कधीही तुटून खाली पडतील, अशी धास्ती नागरिक व्यक्त करीत आहेत.

काही ठिकाणी तारा इतक्या खाली आहेत की उंच वाहन गेल्यास थेट संपर्क येण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे जीवघेणा अपघात घडू शकतो. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीकडे स्थानिक नागरिक व पालकांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महावितरणच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. शाळा परिसर असल्याने येथे लहान मुले, मुली, पालक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असताना महावितरणकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.अपघात घडण्याची वाट न पाहता महावितरण व प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून लोंबकळलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी व त्या सुरक्षित उंचीवर नेाव्यात, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या दरम्यान पत्रकार शेख शरीफ यांनी स्वतः महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोन  दिवस सातत्याने फोन करून शाळा परिसरात लोंबकळलेल्या विद्युत तारांची माहिती दिली व तातडीने तारांची उंची वाढवण्याची मागणी केली. मात्र तरीही महावितरणकडून कोणतीही हालचाल न झाल्याने “पत्रकारांचा फोन करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

0

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा  दाखल

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना ३० तारखेला घडली. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील ऊर्फ आबा याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली. रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरड–मांडकी रस्त्यावर गिरणा नदीकडून येणारे एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाळूने भरलेले आढळून आले. वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र चालकांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

थोड्याच वेळात घटनास्थळी २० ते २५ अनोळखी इसम जमा झाले. दरम्यान पोलिस मदतीसाठी पोलीस कर्मचारी दाखल झाले असताना,काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या रितेश पाटील ऊर्फ आबा (रा. पाचोरा) याने महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धमकी दिली, धक्काबुक्की केली तसेच वाहन जप्तीला विरोध केला. त्याच्या साथीदारांनीही आरडाओरड, शिवीगाळ करत पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने जमाव पळून गेला.

यानंतर महसूल व पोलिस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली. जप्त मुद्देमालात १५ लाखांचे जेसीबी, २ लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर व किन्ही, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर व त्यातील वाळू असा एकूण ३७.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. अवैध वाळू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाडे मुक्कामे बस ५ ते ६ दिवसापासुन बंद.पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांचे भडगाव व पाचोरा आगारास निवेदन.!!!

0

भडगाव प्रतिनिधी:-

बंद बस सुरु करण्याची मागणी.भडगाव ते वाडे मुक्कामी एस. टी. बस ५ ते ६ दिवसापासुन काही कारणास्तव एस. टी. महामंडळाने अचानक बंद केलेली आहे. तरी वाडे मुक्कामी बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.प्रवाशांसह विदयार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन वाडे येथील नागरीक व दै. लोकमतचे पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक व पाचोरा आगारा प्रमुखांना दि. ३१ रोजी सायंकाळी ७ वाजता दिलेले आहे. यावेळी वाहतुक निरीक्षकांना भेटुन चर्चा केली. व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांना मुक्कामी बस बंदमुळे होणार्या हाल व ञास याबाबत व्यथा मांडल्या. व मुक्कामी बस फेर्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

भडगाव व पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, मी वाडे गावामार्फत प्रवाशी व विदयार्थी वर्गामार्फत नम्र विनंती करतो कि, आमचे गावाचे बस चालक व वाहकांना नेहमी सहकार्य असते. आमच्या वाडे गावाला भडगावच्या बसस्थानकातुन मुक्कामे येणारी बस काही कारणास्तव बंद करुन ५ ते ६ दिवस होत आहेत. मुक्कामे बस फेर्या बंद झाल्यामुळे प्रवाशी,

विदयार्थ्यांचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. वाडे गावात मुक्कामे बस न जाता गोंडगाव पर्यंतच बस जाते. गोंडगावहुन वाडे, बांबरुड प्र.ब, नावरे आदि गावांना जाण्यासाठी वृद्ध मंडळी, नागरीक, प्रवाशी, विदयार्थ्यांना ७ ते ८ कि. मी. अंतर पायी जाऊन अंधारात प्रवास करावा लागत आहे.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आठवडयात बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु होणार आहेत.तरी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. प्रवाशांना प्रवासाचा ञास होणार नाही. याची काळजी घ्यावी. संपुर्ण वाडे गावाच्या नागरीकांची मागणीची दखल घ्यावी.तात्काळ भडगाव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करावी ही विनंती आहे. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांची सही आहे.

भडगाव तालुका वकील संघात लोकशाहीचा निर्णायक कौल.!!!

0

भडगाव तालुका वकील संघात लोकशाहीचा निर्णायक कौल.!!!

‘बिनविरोध’ परंपरेला छेद देत ॲड. बी. आर. पाटील यांचा मतदानातून दणदणीत विजय

भडगाव  प्रतिनिधी :-

भडगाव तालुका वकील संघाच्या इतिहासात दि. ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला छेद देत यंदा प्रथमच थेट मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेतून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या ऐतिहासिक निवडणुकीत अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान पटकावला असून, भडगाव तालुका वकील संघात हा विक्रम प्रथमच नोंदवला गेला आहे.

दीर्घकाळापासून संघात सहमती, समेट आणि बिनविरोध निवडीद्वारे पदांची भर पडत होती. मात्र यावेळी संघातील सदस्यांनी लोकशाही प्रक्रियेचा आग्रह धरत मतदानाद्वारे नेतृत्व ठरवण्याचा निर्णय घेतला. मतदानाची जोखीम पत्करूनही अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी थेट सभासदांच्या कौलावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास बहुमताच्या रूपाने अधोरेखित झाला.

या निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य प्रमुख पदांसाठीही चुरस पाहायला मिळाली. उपाध्यक्षपदी ॲड. गणेश आर. वेलसे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संघातील तरुण नेतृत्वाला बळकटी दिली. सचिवपदी ॲड. प्रकाश जी. सोनवणे यांची निवड झाल्याने प्रशासनिक सुसूत्रता व कार्यक्षमतेचा संदेश संघाला मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत वकील संघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवला. ‘निर्णय प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत’ हे ठामपणे दाखवून देत सभासदांनी संघाच्या भविष्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. ही उपस्थिती संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या निवडणुकीकडे केवळ पदाधिकाऱ्यांच्या निवडीपुरते न पाहता संघटनात्मक नेतृत्वावर दिलेला विश्वासाचा कौल म्हणून पाहिले जात आहे. बिनविरोध परंपरेऐवजी लोकशाही मार्ग स्वीकारून भडगाव तालुका वकील संघाने इतर संघटनांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

ॲड. बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुका वकील संघ अधिक संघटित, पारदर्शक आणि सक्रिय होईल, अशी अपेक्षा वकील वर्गातून व्यक्त होत आहे.ही निवडणूक संघटनात्मक आत्मविश्वास, लोकशाही पुनरुज्जीवन आणि सक्रिय सहभागाचा जाहीरनामा ठरली आहे.

जि. प.उर्दू बाईज शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

0
0-0x0-2-0-{}-0-0#

जि. प.उर्दू बाईज शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचे धडे; पालक-ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव येथील जि. प. उर्दू बाईज शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. पावभाजी, मुगभजी, सँडविच, खमंग ढोकळा, चिवडा, पाणीपुरी, शेवपुरी, आलू चाट, रसगुल्ला आदी स्वादिष्ट पदार्थांनी मेळाव्यातील वातावरण रंगून गेले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी विक्री, आर्थिक व्यवहार, ग्राहकांशी संवाद व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून व्यवहारज्ञान, संघभावना तसेच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली. शालेय स्तरावरच उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळाल्याने पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मेळाव्याला पालक, शिक्षक, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थिनींच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. उपस्थितांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भडगाव तालुका गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व वर्षा मॅडम उपस्थित होते. केंद्रप्रमुख खलील सर, प्रमुख पाहुणे हाजी एतबार खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीर मुजावर, अल्ताफ शेख, साबीर कुरैशी, इमरान कुरैशी, पत्रकार अबरार मिर्झा आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि. प. उर्दू बाईज शाळेचे मुख्याध्यापक जाहीद बेग सर व लुकमान सिद्दीकी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तबस्सुम बेगम सादिक अली,पटेल शिरीन, अमीर हमजा सय्यद, नसिरुद्दीन शेख तसेच जि.प.उर्दू कन्या शाळा नं.१ चे मुख्याध्यापक नईम शेख, हुजूर सर, अशफाक सर, इम्तियाज सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण मेळावा आनंदी, उत्साही व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

लेख – छडी, शब्द आणि संस्कार — शिक्षणाच्या वाटेवरील नाजूक समतोल

0

लेख – छडी, शब्द आणि संस्कार — शिक्षणाच्या वाटेवरील नाजूक समतोल

ग्रामीण भागातील त्या हतबल पण स्वाभिमानी बापाचं मनोगत ही केवळ एका व्यक्तीची भावनिक तक्रार नसून, आजच्या शिक्षणव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या अनेक मूलभूत प्रश्नांची प्रामाणिक साक्ष आहे. बदलत्या काळात शिक्षण, शिस्त, कायदा, संविधानिक मूल्ये, बालहक्क आणि मानवी संवेदनशीलता यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाचं ते जिवंत प्रतिबिंब ठरतं. एका बाजूला आपल्या लेकराचं भविष्य उजळावं म्हणून आयुष्य झिजवणारा कष्टकरी बाप उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला नियम, जबाबदाऱ्या आणि आरोपांच्या भीतीत काम करणारा शिक्षक. या दोघांच्या मध्ये उभं आहे ते कोवळं बालमन — अजून घडत असलेला, ओल्या मातीचा नाजूक गोळा.

 

त्या बापाच्या शब्दांत असहाय्यता आहे; मात्र त्याहून अधिक ठाम स्वाभिमानही स्पष्टपणे दिसून येतो. “छडी लागे छमछम, विद्या येई घमघम” या म्हणीतून तो हिंसेचं समर्थन करत नाही, तर शिस्तीचं महत्त्व अधोरेखित करतो. त्याच्या पिढीला दोन शब्दांचा धाक, चार शब्दांचं प्रेम आणि श्रमांची सवय या संतुलित मिश्रणातून घडवलं गेलं. त्यामुळेच आज तो समाजात ताठ मानेनं उभा आहे, अशी त्याची ठाम श्रद्धा आहे. त्याच्या दृष्टीने शिस्त म्हणजे दडपशाही नव्हे, तर जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी जीवनपद्धती आहे.

 

मात्र आजचा काळ पूर्णपणे बदललेला आहे. आजचं मूल केवळ आज्ञाधारक राहिलेलं नाही; ते प्रश्न विचारणारं, हक्कांची जाणीव असलेलं, भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील आणि स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणारं आहे. मोबाईल, समाजमाध्यमं, स्पर्धा, तुलना आणि आभासी जग यांचा प्रभाव बालमनावर खोलवर रुजलेला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेसाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी शासनाने घेतलेला निर्णय आवश्यक आणि स्वागतार्ह ठरतो. शारीरिक शिक्षेवर स्पष्ट मर्यादा घालून बालहक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, याबाबत कोणताही दुमत नाही.

 

तरीही एक महत्त्वाचा प्रश्न उरतो — या निर्णयांमुळे शिक्षक भयग्रस्त तर होत नाहीत ना? शिक्षक हे केवळ अभ्यास शिकवणारे कर्मचारी नसून, शाळेला ‘दुसरं घर’ बनवणारे मार्गदर्शक असतात. मात्र सतत संशय, तक्रारी, चौकशी आणि कायदेशीर कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असेल, तर त्यांच्या मानसिक स्थैर्यावर अपरिहार्यपणे परिणाम होतो. या भीतीमुळे शिक्षक–विद्यार्थी नात्यातील विश्वास हळूहळू ढासळतो आणि हा विश्वासभंग दीर्घकाळात संपूर्ण शिक्षणप्रक्रियेलाच पोखरू शकतो, ही बाब गांभीर्याने विचारात घेणं अत्यावश्यक आहे.

 

याच पार्श्वभूमीवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नियमित संवादाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होतं. शिक्षक आणि पालक सतत संपर्कात राहिल्यास विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि आत्मविश्वासयुक्त राहतो. पालक शिक्षकांना मुलाच्या वर्तन, आवडीनिवडी आणि अडचणींबाबत माहिती देतात, तर शिक्षक पालकांना मुलाच्या शैक्षणिक प्रगती, सामाजिक वर्तन आणि मानसिक स्थितीबाबत योग्य दिशा देतात. या परस्पर संवादामुळे गैरसमज कमी होतात, शिक्षणातील त्रुटी वेळेत दुरुस्त करता येतात आणि शिक्षकांवर अपेक्षा व कायदेशीर दबाव यांचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

 

हेही तितकंच सत्य आहे की शारीरिक शिक्षा मुलांच्या मनावर खोल जखमा करू शकते. भीतीतून निर्माण होणारी शिस्त क्षणिक असते; तर समजुतीतून, संवादातून आणि जबाबदारीतून घडणारी शिस्त दीर्घकाळ टिकणारी ठरते. म्हणूनच आधुनिक शिक्षणपद्धतीत “परिणामाधारित शिस्त” महत्त्वाची मानली जाते — चूक केल्यावर मार नव्हे, तर त्या चुकीचे परिणाम समजावून देणे. मुलाला स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारायला शिकवणं हाच खऱ्या शिक्षणाचा गाभा आहे.

 

ग्रामीण बाप शेतातील पिकाचं उदाहरण देतो, ते अत्यंत बोलकं आणि अर्थपूर्ण आहे. वेळेवर तण काढलं नाही, तर पीक नासतं; पण अति खुरपणी केली, तर पीकही उखडून जातं. शिक्षणातही शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा नाजूक समतोल साधणं हेच आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. संवाद, समुपदेशन, स्पष्ट नियम, योग्य वेळी प्रामाणिक कौतुक आणि आवश्यक तेथे संयम — हेच खरे संस्कार होत. संस्कार म्हणजे केवळ शिस्त नव्हे; तर मूल्ये, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव.

 

शिक्षण ही शिक्षक–पालक–विद्यार्थी–शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. एका शाळेत शिक्षकाने रागावून हात उगारण्याऐवजी चूक केलेल्या मुलाला वर्गानंतर शांतपणे बसवून विचारलं, “तू हे का केलंस?” — त्या एका प्रश्नानं मुलाचं डोकं खाली झुकलं; शिक्षा नव्हे, तर अपराधबोध जागा झाला. त्या मोलमजुरी करणाऱ्या बापाची अंतिम मागणीही साधी, पण खोल आहे — “माझं पोरगं माणूस म्हणून घडवा.” शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ नोकरी मिळवणं नसून, सजग, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडवणं हा आहे. शिक्षण म्हणजे मार किंवा मोकळीक यांपैकी एक निवडणं नव्हे; तर माणुसकीच्या चौकटीत शिस्त, स्वातंत्र्य, अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल साधणं होय — हाच खरा संस्कार.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : ३०/१२/२०२५ 

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत एस.के.पवार विद्यालयाचा देशातून पाचवा क्रमांक

0

पाचोरा ता. प्रतिनिधी :-

नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध कला उत्सव स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये दिनांक २० ते २३ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांसाठी देशातील विविध राज्यातील तसेच केंद्र शासित प्रदेशातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांनी देशातून पाचवा क्रमांक पटकावत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या कला उत्सव स्पर्धेत शिल्पकला या कला प्रकारातून आपले विद्यार्थी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत होते. त्यांनी “लाकडी ट्रॅक्टर, जेसीबी, पांगुळगाडा, विटीदांडू, बाबागाडी, बळीराम नांगर व दुशर,” तयार केली होती.महाराष्ट्र राज्याला प्रथमच हा मान मिळाला ही गौरवाची बाब आहे.आय. ए.एस.अधिकारी मंगेश दोषी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संपूर्ण उपकरणांची माहिती जाणून घेतली.या विद्यार्थ्यांना प्रा उमेश काटकर व प्रा एस एच जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा चेअरमन सुभाष थेपडे मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ,

तसेच प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही बी गहरवाल, पर्यवेक्षक वाय डी ठाकूर, डी पी राजपूत व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

 

ठळक मुद्दे

सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांनी या कला प्रकारात संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

 

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारी सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा ही जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली.

सादरीकरणातून सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांना राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळाला.

पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी व गौरव विनोद मिस्तरी यांना प्रा.उमेश काटकर व प्रा.एस.एच.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरदेवळ्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचाविल्यामुळे येथिल कृषीउदयोजक, प्रणय भांडारकर यांनी विद्यालयासह यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित केले, सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून विविध राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व कला प्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव

भडगाव येथे तिसरी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथे तिसरी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर अशा विविध तालुक्यांमधून तब्बल ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भडगाव तालुक्यातील ३० विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.

 

सदर जिल्हास्तरीय स्पर्धा ही पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी (Selection Trial) म्हणून घेण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड झालेले विजेते खेळाडू नांदेड येथे दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणार आहेत.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश तांदळे सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व व उज्ज्वल भविष्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सर, नाजिम सर व रवी महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

 

यावेळी व्यासपीठावर अँग्लो उर्दू हाय स्कुल चे मुख्याध्यापक नाजीम सर, भडगाव पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे,पत्रकार अबरार मिर्झा, सलाउद्दीन शेख,  अ‍ॅड. सलमान मिर्झा, मंजुरी आली, असगर खान (कॉन्ट्रॅक्टर), फहीम सर, जिल्हा अध्यक्ष हाजी झाकीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष शाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणाऱ्या पंच व कोचेसचे विशेष कौतुक केले.

 

स्पर्धेसाठी बाहेरून आलेले कोचेस अतुल जाधव (वागडी), शुभम शेट्टी (चाळीसगाव), आयान खान, प्रेम देवरे, सचिन पाटील, कुसुम पाटील, दर्शना गोसावी, सागर शिंपी, प्रतीक दाभाडे, असीम खान, तनवीर मण्यार तसेच महाराष्ट्र राज्य कोच शाहरुख मण्यार यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्य प्रशिक्षक अबरार खान सर यांनी सर्व मान्यवर, पंच, कोचेस व खेळाडूंचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र शांताराम आचारी यांनी केली आहे.

याबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, यशवंत नगरमधील बजरंग चौक, मारोती मंदिर परिसर तसेच विलास पाटील यांच्या घराजवळील चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा असून, दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.

विशेषतः वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील रहिवासी या मार्गाचा दैनंदिन वापर करीत असून, अलीकडच्या काळात येथे दुचाकी चोरीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यास गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल, गुन्हेगारांवर वचक राहील तसेच पोलिस तपास कार्यास मदत होईल, असा विश्वास आचारी यांनी व्यक्त केला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांचाही पाठिंबा असून, पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मातोश्री विद्यामंदिरात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुस्तिकांचे वाटप.!!!

0

मातोश्री विद्यामंदिरात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुस्तिकांचे वाटप.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द, मुंबई येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन विषयावरील क्रियाशील पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, याबाबत शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या पुस्तिकांमधून प्लास्टिकची निर्मिती, त्याचे विविध प्रकार, ३ आर—रिड्यूस, रियुज व रिसायकल ही संकल्पना, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच त्याचा पुनर्वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रंजक व सहभागात्मक क्रियाकलापांमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, त्यांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रभावीपणे समजत आहे.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे ए.व्ही.पी. प्रोग्राम कोऑर्डिनेटर श्री. प्रदीप कासुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम व पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक सवयी रुजवल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक व सामाजिक दृष्टिकोन सुधारेल आणि ते भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून पुढे येतील. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निश्चितच दृढ होण्यास चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!