क्राईमजळगाव

पोटगी व कौटुंबिक वादातून घर जाळण्याचा कट,पतीच निघाला मुख्य सूत्रधार; स्थानिक गुन्हे शाखेचा यशस्वी तपास, २ आरोपी अटकेत

आरोपींकडून ९ चोरीच्या मोटरसायकली जप्त

पोटगी व कौटुंबिक वादातून घर जाळण्याचा कट,पतीच निघाला मुख्य सूत्रधार; स्थानिक गुन्हे शाखेचा यशस्वी तपास, २ आरोपी अटकेत

आरोपींकडून ९ चोरीच्या मोटरसायकली जप्त

नगरदेवळा प्रतिनिधी :-

पोटगी व कौटुंबिक वादातून एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावून दहशत निर्माण करण्याच्या गंभीर गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी तपास लावला आहे. या धक्कादायक प्रकरणामागे फिर्यादी महिलेचा पतीच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून विविध जिल्ह्यांतून चोरी केलेल्या एकूण ९ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असा असून, तो फिर्यादी महिलेचा पती आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 57/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 326 (ग) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी घरावर पेट्रोल टाकून आग

घटनेच्या रात्री फिर्यादी महिला तिच्या आईसह घरात झोपलेली असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एलसीबीचा समांतर तपास, आरोपी जाळ्यात

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल डेटा व गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने प्रथम संशयित गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपल्या साथीदार समाधान निकम याच्या मदतीने सदर कृत्य केल्याची कबुली दिली.

पोटगीच्या आदेशाचा राग; सुपारी देऊन कट

तपासात पुढे उघड झाले की, राहुल पाटील व त्याची पत्नी यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. न्यायालयाने राहुल पाटील यास दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा राग मनात धरून राहुल पाटील याने पत्नीला धाक दाखवण्यासाठी व बदला घेण्याच्या उद्देशाने दोन साथीदारांना २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. यातील १ लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. त्यानुसार आरोपींनी हे कृत्य घडवून आणले.

९ मोटरसायकली जप्त

संशयित गणेश पाटील याच्या सखोल चौकशीत त्याने जळगावसह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून चोरीच्या एकूण ९ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, याबाबतही पुढील तपास सुरू आहे.

तपास पथकाचे योगदान

या यशस्वी तपासात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, अमलदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन, सचिन घुगे, दिनेश पाटील तसेच सायबर सेलचे मिलिंद जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.

अटकेतील गणेश बाबुराव पाटील व राहुल वसंतसिंग पाटील यांना पुढील तपासासाठी पाचोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अल्पावधीतच हा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे नगरदेवळा व पाचोरा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!