
निंभोरा महादेव बर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल.!!!
डफाच्या तालावर आखाडा गाजला;तरुणांसह तरुणींचाही उत्स्फूर्त सहभाग
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील निंभोरा महादेव बर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातील श्री कमळेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडलेल्या या कुस्त्यांनी भाविक व क्रीडाप्रेमी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
डफाच्या गजरात सुरू झालेल्या कुस्त्यांमध्ये परिसरातील अनेक नामवंत तसेच नवोदित मल्लांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे यावर्षी काही तरुणींनीही आखाड्यात उतरून कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. पारंपरिक मल्लखांब, ताकद आणि डावपेच यांचा संगम पाहायला मिळाल्याने आखाडा चांगलाच रंगला.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांना पाहण्यासाठी निंभोरा महादेव बर्डीसह परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. आखाड्याभोवती प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रत्येक कुस्तीवेळी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कुस्त्यांचे आयोजन श्री कमळेश्वर महादेव पंच मंडळ निंभोरा (महादेव बर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यासाठी विकास पाटील, सुधाकर पाटील उर्फ मुन्ना सर, जितेंद्र पाटील,विनोद पाटील,श्रीकांत पाटील, अर्जुन भिल्ल,बालु गायकवाड,धाकु पहेलवान,विष्णु भिल्ल, बाबाजी पाटील,गुलाब पाटील,रामदास पाटील, भारत भिल्ल व निंभोरा ग्रामस्थ युवकांनी विशेष परिश्रम घेतले. आखाड्याची तयारी, मल्लांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, शिस्तबद्ध आयोजन व सुरक्षिततेची व्यवस्था याकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले.
परंपरा जपत नव्या पिढीला कुस्तीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना चालना मिळत असून युवकांमध्ये व्यायाम व आरोग्याविषयी जागृती निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महाशिवरात्रीनिमित्त धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक व क्रीडात्मक वातावरण निर्माण झाल्याने निंभोरा महादेव बर्डी गावात उत्सवाची खऱ्या अर्थाने दंगल अनुभवायला मिळाली.



