
मुस्कान मोहिमेत ७ दिवसांत अपहृत १७ वर्षीय मुलीचा शोध,कासोदा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.!!!
कासोदा प्रतिनिधी : शैलेश पांडे
जळगाव जिल्हा येथे हरवलेली व अपहृत बालके यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत कासोदा पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत एका १७ वर्षीय अपहृत मुलीचा यशस्वी शोध लावून तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 0022/2026, भा.न्या.सं. कलम 137(2) अन्वये सदर प्रकरण दाखल करण्यात आले होते. अपहृत मुलगी ही चालू वर्षी बारावी इयत्तेत शिक्षण घेत होती. परीक्षेचा पुरेसा अभ्यास न झाल्याने नापास होण्याची भीती आणि त्यामुळे आई-वडील तसेच आजी-आजोबा रागावतील या मानसिक तणावाखाली तिने साधना विद्यालय, कासोदा येथून “परीक्षेचा बैठक क्रमांक पाहून येते” असे सांगून कोणतीही कल्पना न देता घर सोडले होते.
तपासादरम्यान सदर मुलगी विवंचनेतून शिर्डी येथे निघून गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध नसतानाही कासोदा पोलिसांनी गोपनीय यंत्रणेच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पुढील तपासात मुलगी दोंडाईचा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली.
या शोध मोहिमेत स.पो.नि. श्रीकांत पाटील, पो.उपनि. धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. किरण गाडीलोहार, पो.ना. अकिल मुजावर व पो.कॉ. योगेश गो. पाटील यांचा समावेश होता. पथकाने दोंडाईचा येथे जाऊन सदर मुलगी हीच अपहृत मुलगी असल्याची खात्री करून तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या मूळ पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता रकर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
ऑपरेशन मुस्कान मोहिमेमुळे हरवलेली व अपहृत बालके सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचत असून, अशा घटनांबाबत नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



