
मुद्रांक शुल्क घोटाळ्याचा भंडाफोड: भडगावात धरणे आंदोलन; दोषींवर फौजदारी कारवाईचे आश्वासन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या बोगस दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क अपहार प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांचा शासन महसूल बुडवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांनंतर सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील (भडगाव) यांच्या नेतृत्वाखाली दि. ६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रशासन व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
बोगस दस्त नोंदणीद्वारे कोट्यवधींचा महसूल बुडवला
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अंतर्गत होणाऱ्या जमीन, घर व अन्य मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य नोंदणी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. संबंधित मुद्रांक विक्रेते व दलाल यांनी संगनमताने शासनाच्या मुद्रांक शुल्क नियमांचे उल्लंघन करून लाखो रुपयांचा आर्थिक लाभ मिळवला असून, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या गैरप्रकारात काही संबंधित अधिकारीही सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचा मार्ग
या प्रकरणी विजय पाटील यांनी यापूर्वीच संबंधित मुद्रांक विक्रेते, दलाल व दुय्यम निबंधक यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
दि. ६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तहसीलदार व पोलीस निरीक्षकांचे लेखी आश्वासन
आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शीतल सोलाट यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकरणाची गंभीरता मान्य केली. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधित मुद्रांक विक्रेते व दलाल यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच त्यांच्या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करून ती हटवण्यात येतील, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले.
याचवेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी बोगस दस्त नोंदणी, भ्रष्टाचार व फसवणूक प्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यांनी या संदर्भात ठोस कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
आयजीआर कार्यालयाकडून १० पट दंड व कठोर कारवाईचे आदेश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक येथील मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आयजीआर कार्यालयाने जळगाव जिल्हा मुद्रांक अधिकारी व जिल्हाधिकारी यांना संबंधित बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यांवर मुद्रांक शुल्क कायद्यानुसार १० पट दंड व कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पारदर्शक चौकशीची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या घटनेमुळे भडगाव तालुक्यात मोठी चर्चा सुरू असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



