
लोण पिराचे येथे हजरत गैबन शहा बाबा यांची वार्षिक यात्रा उत्साहात सुरू
भडगाव ता प्रतिनिधी : -आमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील लोण पिराचे येथे प्रसिद्ध संत हजरत गैबन शहा बाबा यांची वार्षिक यात्रा उत्सवाला सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय, आनंदी व उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत आहे.
बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुजारी ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्या निवासस्थानातून पारंपरिक पद्धतीने सादर व संदल मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, फटाके व भक्तीगीतातून सजलेली ही मिरवणूक संपूर्ण गावातून मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम बांधवांसह लहान मुले, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेनिमित्त दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, मनोरंजनाचे साहित्य व पाळणे उभारण्यात आले आहेत. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची, आरोग्यसेवेची तसेच वाहतूक व्यवस्थेची योग्य सोय करण्यात आली आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी मुख्य यात्रा कार्यक्रम पार पडणार असून, या दिवशी सकाळपासूनच दर्ग्यावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. चादर चढविणे, दुआ, कव्वाली व महाप्रसाद यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. जिल्ह्यातील तसेच बाहेरगावाहूनही भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले आहे.
ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक ऐक्य, बंधुभाव व शांततेचा संदेश देणारा सोहळा असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.


