
तांदुळवाडीतील ५ तरुणांची संरक्षण दलात निवड. ग्रामस्थांकडुन मिरवणुक.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील तांदुळवाडी गावातील ५ तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणुक काढुन जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.
निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), मयुर नाना पवार (सीआयएसएफ ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ ), गौरव अनिल पाटील (बीएसएफ ) व अनंत तुकाराम मोरे ( इंडीयन नेव्ही) यांचा समावेश आहे.
या प्रसंगी पत्रकार अशोक परदेशी व प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या तरुणांनी केलेली मेहनत व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत या जवानांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी मिरवणुकीत, तरुण मंडळी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



