
भडगाव प्रतिनिधी :-
नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज भडगाव शहरात सर्वपक्षीय वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाले होते.
दिनांक 16 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोल्हा नाल्याच्या पाण्यात पडून नर्सरीत शिकणाऱ्या अंश सागर तहसिलदार वय-३वर्ष ६ महिने व मयांक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय- ४ वर्ष २ महिने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण भडगाव शहरात स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळण्यात आला.
सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले, बसस्टँड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रस्ता, पाचोरा रस्ता, पेठ भागातील लहान-मोठी दुकाने पूर्णतः बंद होती. खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांवरही बंदचा परिणाम दिसून आला. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.
या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा तैनात बंदोबस्त होता. बंद काळात कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, सदर घटनेतील आठ ते दहा आरोपी अद्याप फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, शाळेचे संचालक मंडळ बखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज दुपारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार शितल सोलाट व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना देण्यात आले
एकूणच, चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शहराने दाखवलेली एकजूट लक्षवेधी ठरली असून बंद शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे चित्र दिसून आले.
