भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व १२ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण ४३ मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार या निवडणुकीची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे. मतमोजणीचे काम भडगाव तालुका क्रीडा संकुल, पाचोरा रोड, भडगाव येथे होणार असून, याठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ६० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून, मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी ६ टेबल आणि पोस्टल मतदानासाठी स्वतंत्र १ टेबल अशा एकूण ७ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया साधारण ७ ते ८ फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे २ ते ३ प्रभागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन व पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल परिसरात पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण, वाहतूक नियमन तसेच सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केवळ अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक आयोगाने दिलेल्या पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले असून, मतमोजणीनंतर नगरपरिषदेतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असून, २१ डिसेंबर रोजी भडगाव नगरपरिषदेला नवे नेतृत्व मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
