पाचोरा तहसील कार्यालयातील हरित योजनेचा फज्जा.!!!
रोपे कोमेजून मरतायत, प्रशासन मूकदर्शक – निसर्गप्रेमींचा संताप उफाळला
पाचोरा तहसील कार्यालयातील हरित योजनेचा फज्जा.!!!
रोपे कोमेजून मरतायत, प्रशासन मूकदर्शक – निसर्गप्रेमींचा संताप उफाळला
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तहसील कार्यालय परिसरात राबवण्यात आलेली “हरित योजना” आज अक्षरशः कोमेजलेली दिसत आहे!
परिसरात शेकडो रोपे पडून आहेत — न लागवड, न देखभाल! या रोपांकडे पाहताना प्रशासनाची उदासीनता आणि निष्काळजीपणा उघडपणे दिसून येतो.
मागील जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेला तीन महिने उलटले, तरी आजही झाडांची लागवड पूर्ण झालेली नाही. कार्यालयासमोर अस्ताव्यस्त पडलेली आणि मरत चाललेली रोपे पाहून निसर्गप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक पर्यावरणप्रेमींनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. “हरित योजना फक्त कागदावरच हिरवी आहे! झाडे लावण्याची घोषणा मोठ्या थाटामाटात करण्यात आली, पण प्रत्यक्षात काहीच कृती दिसत नाही. झाडे मरतायत आणि अधिकारी मात्र मौन बाळगून बसले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
पर्यावरण तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, लागवड विलंबाने केल्यास झाडांची वाढ आणि टिकाव दोन्ही धोक्यात येतात. ही रोपे योग्य वेळी लावली गेली नाहीत तर संपूर्ण योजना अपयशी ठरणार आहे.
निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत मागणी केली आहे की —
> “तहसील कार्यालय परिसरातील सर्व रोपे तातडीने लावावीत, नियमित पाणीपुरवठा आणि निगा राखावी. अन्यथा ही योजना केवळ कागदोपत्री राहून पर्यावरणावर अन्याय करणारी ठरेल.”
हिरवागार परिसर हा केवळ शोभेचा भाग नाही, तर जीवनाचा आधार आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने त्वरित जबाबदारी स्वीकारून परिसर पुन्हा हरित करण्याची गरज आहे.