नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री : नऊ माळांतून स्त्रीशक्तीचा प्रवास
“विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी प्रवास” – प्राचार्य अर्चना पत्की
नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री : नऊ माळांतून स्त्रीशक्तीचा प्रवास
“विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी प्रवास” – प्राचार्य अर्चना पत्की
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचा सखोल अनुभव देणारी आणि विद्यार्थिनींमध्ये प्रेरणा निर्माण करणारी ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५’ सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे उत्साहात पार पडली. “नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री” या मुख्य संकल्पनेवर आधारित नऊ माळांतून नेतृत्व, समाजभान, सहजीवन, आत्मशोध, कलात्मकता आणि सुरक्षा यांसारखे स्त्रीच्या बहुआयामी योगदानाचे विविध आयाम विद्यार्थिनीसमोर उलगडले गेले. ही व्याख्यानमाला गेली पाच वर्षे सलग सुरू असून, नवदुर्गेंच्या कार्याचा आलेख विद्यार्थिनींसमोर मांडला जातो. प्राचार्य अर्चना पत्की म्हणाल्या, “शारदोत्सवात नवदुर्गेंचा स्वयंपूर्णतेकडे जाणारा प्रवास विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे.”
पहिल्या माळेत पद्मश्री राव, व्हॉईस कोच, लेखिका व इतिहासकथनकार यांनी “जिजाबाई : स्वराज्य जननी राष्ट्रमाता” या विषयावर विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले, “जिजाबाई हे केवळ मातृत्वाचे नव्हे, तर नेतृत्वाचेही श्रेष्ठ उदाहरण आहेत. राजमाता जिजाऊंचे विचार आणि तत्त्वे आजही विद्यार्थिनींसाठी आदर्शवत आहेत. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील जिजाऊ शोधली पाहिजे.”
दुसऱ्या माळेत संगीत विशारद अॅड. सुरेखा भुजबळ यांनी ‘गंध सुरांचा ठाव – स्त्रीमनाचा’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “संगीत आणि सूर केवळ संवेदना नाहीत, तर स्त्रीमनाच्या अस्तित्वाचे अविभाज्य भाग आहेत. सुरांतील गंध जेव्हा स्त्रीच्या कोमल मनाचा ठाव घेतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगते.”
तिसऱ्या माळेत कथाकथनकार मंजिरी देवरस यांनी ‘पुल – सुनीताबाई सहजीवन’ या कथेद्वारे स्त्रीच्या सहजीवनातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. चौथ्या माळेत समाजसेविका जयश्री चौधरी यांनी ‘स्त्रीचे समाजभान’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “स्त्रीचे समाजभान केवळ तिच्या व्यक्तिगत प्रगतीपुरते मर्यादित नसते, तर ते संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी, प्रगतीशी आणि समतेशी निगडीत असते. स्त्री जेव्हा सजग होते, तेव्हा संपूर्ण समाज अधिक सुजाण, समतावादी आणि प्रगतिशील बनतो.”
पाचव्या माळेत डॉ. वृंदा कौजलगीकर, लेखिका व कथाकथनकार, यांनी ‘स्व-कथाकथन’ सादर केले. त्यांनी स्पष्ट केले, “स्व-कथाकथन म्हणजे एका स्त्रीने स्वतःच्या अनुभवांवर, भावविश्वावर, संघर्षांवर आणि आत्मशोधावर आधारित कथन करणे. हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा आणि सामाजिक स्थितीचा आरसा ठरते.”
सहाव्या माळेत निवेदिका व समाजसेविका वैशाली जाधव यांनी कोसबाडच्या टेकडीवरून महिला सुरक्षा आणि स्त्रीशक्तीचा प्रवास विद्यार्थिनीसमोर उलगडला. त्यांनी सांगितले, “महाविद्यालयात विद्यार्थिनीसमोर अनुताईंच्या कार्याचा आढावा घेणे खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. मोक्ष शोधताना किंवा काम करताना कामातून मिळणारा मोक्ष हीच खरी कोसबाडची टेकडी आहे.”
सातव्या माळेत दंत चिकित्सक व कवयित्री डॉ. रिबेका दोडती यांनी ‘दातापासून दातांकडे’ या विषयावर कविता सादर केली. त्यांनी स्पष्ट केले, “दात आणि दातामुळे येणारे स्मित हास्य हा सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. दातांची निगा राखणे आवश्यक आहे.”
आठव्या माळेत अश्विनी गाडगीळ, अहिल्या महिला मंडळ अध्यक्षा, यांनी महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवले जाणारे उपक्रम विद्यार्थिनींसमोर मांडले. त्यांनी सांगितले, “महिलांनी आता स्वयंनिर्मितीपासून स्वयंपूर्णतेकडे धाव घेतली पाहिजे.”
नवव्या माळेत एपीआय गौरी जगताप-पाटील, गुन्हे शाखा, यांनी स्त्री सुरक्षा आणि सायबर क्राईमवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “एआय जितक्या संधी देते, तितके धोके निर्माण करू शकते. महिलांनी जागरूकतेने आणि आत्मविश्वासासह डिजिटल जगाचा वापर केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सुरक्षितता साधता येईल.”
सर्व कार्यक्रम श्रीमती परमेश्वरी देवी गोवर्धनदास गरोडिया एज्युकेशन कॉम्प्लेक्स, माटुंगा, मुंबई येथे पार पडले. उपस्थित विद्यार्थिनींना स्त्रीशक्तीची प्रेरणा मिळाली, बहुआयामी स्त्रीच्या योगदानाचा अनुभव घेता आला आणि स्त्रीसक्षमीकरणाची नवी दृष्टी समोर आली.
“नवदुर्गेच्या नऊ रूपांतून उलगडलेले हे विचार म्हणजेच आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक दीप आहेत. स्त्री ही केवळ करुणा किंवा कळकळ नाही, तर ती प्रेरणा, पराक्रम आणि परिवर्तनाची शाश्वत ऊर्जा आहे.”