“अबकी बार 400 पार!” – पाचोऱ्यातील उर्दू कन्या शाळेचा शिक्षणातील ‘विजयघोष.!!!
पाचोरा प्रतिनिधी:-
“अबकी बार 400 पार” ही कोणतीही राजकीय घोषणा नसून पाचोरा येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेतील शिक्षकांचा शिक्षणात्मक संकल्प होता – आणि त्यांनी तो यशस्वीरीत्या पूर्ण केला!
शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी वातावरण, खेळांच्या माध्यमातून होणारे शिक्षण आणि शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षांसाठी दिले जाणारे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या १०% ने वाढली असून गेल्या वर्षीची ३८६ ची संख्या यंदा ४२५ वर पोहोचली आहे.
मौलाना आझाद हॉलमध्ये झालेल्या सत्कार समारंभात ही माहिती उपशिक्षक शेख जावेद रहीम यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोराडखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदीर होते. प्रमुख अतिथी म्हणून युवा सेना जिल्हाध्यक्ष जितूदादा जैन, भीमसेना जिल्हाध्यक्ष प्रविण ब्राह्मणे, व डॉ. भरत पाटील उपस्थित होते.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी लक्षात घेऊन शाळेत ‘विज्ञान सप्ताह’ साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी पाथराचा कोळसा, ज्वालामुखी यांसारख्या विषयांवर मॉडेल्स व चार्टद्वारे प्रयोग सादर केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश होता.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रविण ब्राह्मणे यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्धतेचे आणि शिक्षकांच्या कार्यशैलीचे कौतुक केले व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले. समारोपात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात सईद शब्बीर, निसार पिंजारी, मुख्याध्यापक एजाज रऊफ, तौसिफ शेख, सुमय्या देशमुख, शबाना देशमुख, सलाउद्दीन शेख, इम्रान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.