म्हसवेच्या विकासाला नवे गतीमान: आमदार अमोलदादांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.!!!
पारोळा प्रतिनिधी –
पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख प्रशांत पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुरभाऊसाहेब पाटील, विद्यमान अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संचालक साहेबरावदादा पाटील, मोहाडीचे माजी सरपंच रामचंद्रआबा पाटील, लोणीसिमचे सरपंच डॉ. कैलास पाटील, सांगवीचे नथाबापू पाटील, म्हसवेचे दत्तुआप्पा पाटील, बाहुट्याचे मनोहर पाटील सर आदी मान्यवरांची होती.
या कार्यक्रमात तेली समाजासाठी सभामंडप, मुख्य रस्त्याचे विद्युतीकरण, बंदिस्त गटार, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी पोहोच रस्ता, चौकांचे सुशोभीकरण, तलाठी कार्यालय आदी विविध पायाभूत सुविधांची कामे लोकार्पण व भूमिपूजनाद्वारे शुभारंभ करण्यात आला.
या कामांसाठी आतापर्यंत ₹1.09 कोटींची कामे पूर्ण झाली असून ₹62 लाखांच्या नवीन कामांचे भूमिपूजन झाले. विशेषतः तेली समाजासाठी मंजूर केलेल्या ₹25 लाखांच्या सभामंडपाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. हे व्यासपीठ लवकरच समाजाच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याचा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार अमोलदादा म्हणाले,
“गेल्या निवडणुकीत म्हसवे गणाने मला मताच्या रूपात दिलेला शुभाशीर्वाद अभूतपूर्व होता. हे माझ्या जीवनातील सर्वोच्च विश्वासाचे प्रतीक आहे. या शुभाशीर्वादाची परतफेड या जन्मात कदाचित शक्य नसली, तरी मी या गावाच्या आणि जनतेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी आमदारांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पुढील काळातही वचनपूर्तीच्या मार्गावर अविचल राहण्याचे आश्वासन दिले.