भडगाव नगरपरिषदला अजूनही हक्काच्या जागेचा प्रश्न कायम.!!!
बातमी लोक हितासाठी(भाग २)
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथे सन 2009 मध्ये नगरपरिषदेची स्थापना होऊनही तब्बल १६ वर्षांनंतरही नगरपरिषदेला हक्काची व स्वतंत्र शासकीय जागा उपलब्ध झालेली नाही. सध्या अनेक शासकीय जमिनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या विविध विकास योजनांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
हक्काची जागा उपलब्ध नसल्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनाला कार्यालयीन कामकाज, नागरी सुविधा पुरवणे, तसेच विकास प्रकल्प राबविणे या सर्वच गोष्टींमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली असून, शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि नगरपरिषदेला आवश्यक ती शासकीय जागा हस्तांतरित करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, शासकीय जमिनींवरील आतिक्रमणामुळेही अनेक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे विविध विकास योजनांना चालना देत असले, तरी जागेच्या उपलब्धतेच्या प्रश्नामुळे भडगाव शहरात अपेक्षित वेगाने विकास होताना दिसत नाही, ही बाब निश्चितच चिंतेची आहे.