जळगाव हादरले. नरबळीच्या संशयानं एरंडोल तालुक्यात खळबळ१३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या; मृतदेह शेतात फेकला
जळगाव हादरले. नरबळीच्या संशयानं एरंडोल तालुक्यात खळबळ१३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या; मृतदेह शेतात फेकला
एरंडोल प्रतिनिधी :-
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या 13 वर्षीय तेजस गजानन महाजन या अल्पवयीन मुलाचा गळा चिरलेला मृतदेह मंगळवारी सकाळी खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात आढळून आला. या अमानुष घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तेजसच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६ जून) त्याचे वडील गजानन महाजन यांनी तेजसला त्यांच्या हार्डवेअर दुकानावर बसवले होते व ते कामानिमित्त जळगावला गेले होते. दुकान बंद करून तेजस घरी परत येईल, असा कुटुंबाचा अंदाज होता. मात्र तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. याच दिवशी गावात आठवडी बाजार असल्याने गर्दी मोठी होती.
संध्याकाळपर्यंत काहीही ठसा लागला नाही म्हणून कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तेजसच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम रात्रभर सुरू ठेवण्यात आली.
मंगळवारी सकाळी सुमारे ८ वाजता काही ग्रामस्थांना खर्ची गावाजवळील शेतात एका मुलाचा गळा चिरलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता तो मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे महाजन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून हत्या करण्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.