लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात एक लाखाचे बक्षीस.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत एक लाखाचे बक्षीस प्राप्त झाले. जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून लाडकुबाई शाळेचा गौरव करण्यात आला.
वर्षभर नियमितपणे नाविन्यपूर्ण उपक्रम लाडकुबाई शाळा राबवत असते. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरण पूरक शाळुच्या माती पासून गणपती बनवा कार्यशाळा, स्वयंनिर्मित व सृजनशील राखी बनवा कार्यशाळा, ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी तसेच जागतिक वारसा व संवर्धन यामध्ये समाविष्ट असणाऱ्या स्थळांना अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. न्यायालयीन प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित केली. तसेच इंडियन पोस्ट कार्यालयाला क्षेत्रभेट दिली. साधनाई कलाविष्कार महोत्सव अंतर्गत नाविन्यपूर्ण स्नेहसंमेलन आयोजित केले. शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे झाले. विद्यार्थ्यांना ओझेविना अध्ययन या अंतर्गत आनंददायी शनिवारी मध्ये नियमितपणे दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शारीरिक,बौद्धिक, भावनिक, मानसिक रित्या कणखर व परिपूर्ण होण्यासाठी विविध कौशल्यावर आधारित नाविन्यपूर्ण खेळ विद्यार्थ्यांना शिकवले. विद्यार्थ्यांच्या बाल मनावर संस्कार रुजावेत यासाठी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मूल्य शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांनी गिरवले. मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत लाडकुबाई शाळेचे विद्यार्थी चमकले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी कठोर परिश्रम घेतले. सप्टेंबर महिन्यात क्रीडा महोत्सव साजरा केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. यासारख्या असंख्य उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे अध्ययन अनुभव मिळाले.
पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व १ लाखाचा धनादेश प्राप्त झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाले. संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, व्हॉइस चेअरमन पूनमताई प्रशांत पाटील, उपसचिव श्री प्रशांतराव विनायक पाटील,
गटशिक्षणाधिकारी श्री विश्वास हरी पाटील, गटविकास अधिकारी श्री के. बी. अंजने, मुख्याधिकारी श्री रवींद्र लांडे,विस्ताराधिकारी श्री गणेश पाटील, केंद्रप्रमुख श्री बैरागी सर, लाडकुबाई माध्यमिकच्या प्राचार्या श्रीमती वैशाली पाटील, उपमुख्याध्यापक श्री एन.जी. पाटील, पर्यवेक्षक श्री वाय.ई. पाटील यांनी शाळेच्या उत्कृष्ट यशाबद्दल कौतुक केले.*