महिला गटात धाराशिव, किशोरी गटात सांगलीला विजेतेपद.!!!
कै.भाई नेरुरकर चषक राज्य खो-खो स्पर्धाः कोल्हापूरला दुहेरी मुकुट
महिला गटात धाराशिव, किशोरी गटात सांगलीला विजेतेपद.!!!
कै.भाई नेरुरकर चषक राज्य खो-खो स्पर्धाः कोल्हापूरला दुहेरी मुकुट
इचलकरंजी, दि. 28 मार्च-कोल्हापूरने पुरुष व किशोर गटात विजेतेपद पटकावित कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादिला. सांगलीने किशोरी गटातून तर धाराशिवने महिला गटातून विजेतेपदाचा मान मिळविला.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा खात्याच्या वतीने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक 21च्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. किशोर गटातील अंतिम सामन्यात मध्यंतराच्या 11-10 अश्या एका गुणाच्या निसटत्या आघाडीनंतर कोल्हापूरने बहारदार खेळी करीत सांगलीचा 16-15 असा पराभव केला. कोल्हापूरकडून रुद्र यादव (1.30, 1.20 मिनिटे सरंक्षण), राजवीर वेर्णेकर (5 गडी), आर्यन कुकडे (4 गडी), देवराज यड्रावे (1.30 मिनिटे व 2 गडी) यांनी बहारदार खेळी केली. सांगलीकडून सार्थक हिरेकुर्ब (2.10 मिनिटे व 5 गडी), सोहम पाडळे (1.00 व 3.00 मिनिटे), दक्ष जाधव (2.00 मिनिटे व 1 गडी) यांनी कामगिरी केली.
किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात सांगलीने पुण्यावर 11-8 असा एक डाव राखून 3 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतरासच त्यांनी 11-2 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. सांगलीच्या अनुष्का तामखडे हिने 2.40 मिनिटे संरक्षण करीत आक्रमणात 3 गडी बाद करीत अष्टपैलू खेळी केली. श्रावणी तामखडे (2.30 मिनिटे), वेदिका तामखडे (1.50,2.10 मिनिटे व 1 गुण) यांनी संरक्षणाची बाजू सांभाळली. पुण्याकडून अपर्णा वर्धे (1.30 मिनिटे), रोहिणी सुलाखे (1.10 मिनिटे व 2 गडी) व पूजा बिराजदार हिने (1.10 मिनिटे) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
महिला गटातील अंतिम सामन्यात धाराशिवने पुण्यास 12-10 असे 2 गुण व 4.30 मिनिटे राखून हरविले. मध्यंतरासच धाराशिवने 8-5 अशी 3 गुणाची निर्णायक आघाडी घेतली होती. संध्या सुरवसे (3.10, 2.10 मिनिटे व 3 गडी), अश्विनी शिंदे (1.00, 2.00 व 3 गडी) व प्रीती काळे (1.20, 1.30 मिनिटे व 1 गडी) हे धाराशिवच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पुण्याकडून प्रियंका इंगळे (2.00, 1.30 मिनिटे), कृतिका राठोड (3 गडी) व श्वेता वाघ (1.00, 1.00 मिनिटे व 1 गडी) यांची लढत एकाकी ठरली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेतील बरोबरीनंतर कोल्हापूरने मुंबई उपनगरवर जादा डावात 12-11 अशी एका गुणाने मात केली. मध्यंतरास मुंबई उपनगरकडे 11-9 अशी आघाडी होती. त्यानंतर कोल्हापूरने बहारदार खेळी करीत मुंबई उपनगरला 18-18 असे बरोबरीत रोखले होते. कोल्हापूरकडून अर्णव पाटणकर, सौरभ आडावकर, मनोज पाटील, विराज गळतगे, रोहन कोरे व श्रीराम कांबळे यांनी तर मुंबई उपनगरकडून प्रतीक देवरे व ओंकार सोनवणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडामंत्री दत्ता भरणे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
किशोर ः अष्टपैलू – सार्थक संजय हिरेकुर्ब (सांगली), संरक्षक – रुद्र उत्तम यादव (कोल्हापूर), आक्रमक – ओजस उमेश बंडगर (कोल्हापूर).
किशोरी ः अष्टपैलू – अनुष्का आबासो तामखडे (सांगली), संरक्षक- श्रावणी रामहरी तामखडे (सांगली), आक्रमक -अपर्णा विशाल वर्धे (पुणे).
पुरुषः अष्टपैलू – रोहन बापूसो कोरे (कोल्हापूर), संरक्षक – ओमकार श्रीकांत सोनवणे (मुंबई उपनगर),आक्रमण – सौरभ शिवाजी आडावकर (कोल्हापूर).
महिला ः अष्टपैलू – अश्विनी आप्पासाहेब शिंदे (धाराशिव), संरक्षक – संध्या सौदागर सुरवसे (धाराशिव), आक्रमक – प्रियांका हनुमंत इंगळे (पुणे).