नागपूरमध्ये कोणी केला राडा ? आमदार प्रवीण दटकेंच्या दाव्यामुळे खळबळ
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला आहे. नागपूरमध्ये कबरीच्या वादावरुन दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. नागपूरमध्ये जमावाकडून दगडफेक करण्यात आली. तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.
काही वाहने पेटवण्यात आली. त्यामुळे नागपूरच्या महाल भागात तणाव निर्माण झाला. या दगडफेकीत 8-10 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अग्निशमन दलाचे चार जवानसुद्धा जखमी झाले आहेत. या राड्यानंतर 30 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपच्या आमदारांनी या घटनेनंतर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. बाहेरून आलेल्यांनीच जाळपोळ आणि दगडफेक केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.
नागपूरचे आमदार प्रवीण दटके म्हणाले की, सकाळी आंदोलन झालं. पण पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री महाल आणि इतर परिसरात दगडफेक करण्यात आली. त्यानंतर वाहने जाळण्यात आली. अग्नीशमन दलाच्या जवानांना मारहाण झाली. बाहेरून आलेल्या काही लोकांनी लोकांची घरे पेटवली. या लोकांनी टिपून दगडफेक केली, असा दावा प्रवीण दटके यांनी केला आहे. पोलीस घटनास्थली उशीरा पोहोचले, असा आरोपही दटके यांनी केला आहे.
दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर येऊन हिंसा करत होते. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मुख्यमंत्र्यांनी या लोकांवर तात्काळ कारवाई करावी. मी स्वत: नागपूरमध्ये जाणार आहे. तिथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहे, असं प्रवीण दटके म्हणाले.
आमदार प्रशांत जगताप म्हणाले की, ही घटना दुर्देवी आहे. विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला सध्या शांतता हवी आहे की दंगली? राज्यात नवीन उद्योग येतायत. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक वातावरणाची आवश्यकता असते. पण सध्या वातावरण बिघडलं आहे. महागाईऐवजी दुसऱ्या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष वळवलं जात आहे. नागपुरमधील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणा, नाहीतर मतदार रस्त्यावर उतरतील, असं जगताप म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या आवाहनाला अजिबात बळी पडू नका, असं ते म्हणाले. मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित केलं जात आहे. काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर होतील. त्यामुळे हे मुद्दाम केलं जातंय का हे पाहण्याची गरज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक पार पडली. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भात आणि समाजकंटकांवर अंकुश लावण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.