चिकन बिर्याणी खाताना घसात अडकले कोंबडीचे हाड, घशातील हाड काढण्यासाठी मोजावे लागले ४ लाख रुपये.!!!
मुंबई:-
चिकन बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलात गेलेल्या कुर्ल्यातील शेख कुटूंबियांना चिकन बिर्याणी चांगलीच महागात पडली. बिर्याणी खाताना शेख कुटूंबातील ३४ वर्षीय रेश्मा (काल्पनिक नाव) हिच्या घशात कोंबडीचे हाडं अडकले, आणि हे हाडं शस्त्रक्रिया करून काढावे लागले.
या शस्त्रक्रिये साठी शेख कुटूंबाला ४ लाखांचा खर्च आला असून या सर्व वैद्यकीय प्रकियेला १ महिण्याचा कालावधी लागला.
कुर्ला येथे राहणारे शेख कुटूंबियांनी ३ फेब्रुवारी रोजी हॉटेलात जेवणाचा बेत आखला होता, शेख कुटूंबातील ३४ वर्षीय रेश्मा (काल्पनिक नाव) तिचा पती, दोन मुले आणि सासुसासरे हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. सर्वांसाठी त्यांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली, चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत असताना अचानक रेश्माचा श्वास अडकला, तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, आणि तीने डोळे फिरवले. रेश्माची हालत बघून शेख कुटूंब हादरले आणि त्यांनी हॉटेल कर्मचारी यांच्या मदतीने तात्काळ रेश्माला कुर्ल्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले. हॉस्पिटच्या तपासणीत आढळून आले की, तिच्या घशात कोंबडीचे हाड अडकले आहे, अडकलेले कोंबडीचे हाड काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियापूर्वी वेगवेगळे उपाय करून बघितले. मात्र हाड अशा ठिकाणी अडकले होते की, शस्त्रक्रिया हा अखेरचा उपाय होता. या साठी रुग्णालयाने ८ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता.
रेश्माचा पती एका स्थानिक कारखान्यात सुपरवायझरची नोकरी करीत असल्यामुळे एवढं खर्च त्याला झेपणार नव्हता, अखेर डॉक्टरांनी वैद्यकिय उपचारासाठी देणग्या देणाऱ्या संस्था यांच्याकडे जाण्यास सुचवून रुग्णालयाने देखील हा खर्च अर्ध्यावर म्हणजेच ४ लाखावर आणला, अखेर ८ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करून रेश्माच्या घशात अडकलेले ३.२ सेमी कोंबडीचे हाड बाहेर काढण्यात यश आले. तब्बल आठ तास ही अवघड शस्त्रक्रिया सुरू होती, हे हाड अन्ननलिकेजवळून काढण्यात आले. या सर्व शस्त्रक्रियेपूर्वी रेश्माची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती, अखेर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि ८ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियेनंतर घशातील हाडं काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रेश्माला तब्बल २१ दिवस नळीवाटे अन्न पाणी देण्यात येत होते, या सर्वातून बाहेर पडायला रेश्माला एक महिन्याच्या कालावधी लागला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर रेश्माने आयुष्यात कधीही बिर्याणी खाणार नाही, घरात देखील शिजवणार नाही. असा संकल्प केला आहे.