आधी डोक्याला खाज, नंतर तीन दिवसांनी टक्कल; विचित्र आजाराने महाराष्ट्र हादरला.!!!
बुलढाणा प्रतिनिधी :-
बुलढाण्यातून एक अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोकांना अचानक जास्त केस गळण्याची समस्या उद्भवली आहे. ही समस्या इतकी वाढली आहे की, काही दिवसातच लोकांच्या डोक्यांवर टक्कल पडले आहे.
या विचित्र आजारामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आरोग्य पथक स्थानिक पाणीपुरवठ्याची तपासणी करत आहे.
बुलढाण्यात टक्कल व्हायरसने थैमान घातले आहे. काही दिवसांतच 40 ते 50 लोकांना टक्कल पडले आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. त्यानंतर काही दिवसांत टक्कल पडल्याचं समोर आलं आहे. शॅम्पू वापरणाऱ्यांना टक्कल पडल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे, पण ज्यांनी कधी शॅम्पू वापरला नाही त्यांनाही अचानक केस गळायला लागले आहेत.
या तीन गावांतील लोकांना करावा लागतोय सामना
बोंडगाव, हिंगणा, कालवड या तीन गावांमध्ये टक्कल पडत आहे. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहेत. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने तात्काळ सर्वेक्षणाच्या आदेशांची घोषणा करण्यात आली आहे. नमुने घेऊन यावर खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अचानक होतेय केसगळती
शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये 50 हून अधिक लोकांना अचानक केसगळती होत आहे. काही दिवसातच त्यांचे डोकं टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अज्ञात आजाराने घातलेय थैमान
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. कुटुंबाच्या कुटुंब या व्हायरसचे बळी ठरत आहेत. सुरुवातीला डोक्याला खाज सुटते, नंतर केस हातात येतात आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडते. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिन्ही गावांमधील अनेक लोकांची केस एकाएकी गळून जात आहेत, आणि यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. आरोग्य विभागाने यावर तपासणी सुरू केली आहे.
समस्येवर करण्यात आले सर्वेक्षण
केसगळतीच्या समस्येवर सर्वेक्षण करण्यात आले आहे आणि पाणी नमुने घेतले आहेत. साथ रोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे. नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. शॅम्पूने असे होणं शक्य असं डॉक्टरांचे म्हणणं असले तरी, शॅम्पू न वापरणाऱ्यांचेही केस गळल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
मार्गदर्शन शिबिर राबवण्याची मागणी
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर राबवण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या घटनेबाबत अवगत केले आहे.
प्रत्येक गावात 15 ते 20 रुग्ण प्रभावित
शेगाव तालुक्यातील गोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक गावात 15 ते 20 रुग्ण यामुळे प्रभावित झाले आहेत, आणि तिन्ही गावांमध्ये जवळपास 60 रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींना केस गळून पडत आहेत, त्यामुळे टक्कल देखील होत आहे.
आरोग्य विभाग घेतोय शोध
तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाणी नमुने घेतले आहेत. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे आम्ही देखील आश्चर्यचकित आहोत. तालुका आरोग्य विभागाने जिल्हा साथ रोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या बाबत माहिती दिली आहे. आम्ही शोध घेत आहोत की हा आजार का आणि कसा घडत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली भायेकर यांनी दिली.