Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 4

वाळू तस्करीविरोधात प्रशासन आक्रमक ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात.!!!

0

वाळू तस्करीविरोधात प्रशासन आक्रमक ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील जुने पिंपळगाव रस्त्यावरील घोडदे परिसरात गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू जप्त केली. सदर कारवाईत पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ रोजी करण्यात आली. गिरणा नदी पात्रातून कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाईचे नियोजन केले. कारवाईदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला.

महसूल पथकाने एक ब्रास वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात महसूल व गौण खनिज कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाई ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लुळे, निखिल बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश अहिरे, महसूल सेवक समाधान माळी आदींच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, भडगाव तालुक्यातील गिरणा नदीसह अन्य परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महिंदळे येथील प्रवाशी निवाऱ्यात ग्रामपंचयातीचे आतिक्रमण; बस स्टॅन्ड मध्ये बसवले जल शुद्धीकारण मशीन.!!!    

0

महिंदळे येथील प्रवाशी निवाऱ्यात ग्रामपंचयातीचे आतिक्रमण; बस स्टॅन्ड मध्ये बसवले जल शुद्धीकारण मशीन.!!!    

भडगाव प्रतिनिधी :-

येथील ग्रामपंचायत यांनी गावाला अल्प दरात शुद्ध पाणी मिळावे यासाठी जल शुद्धीकारण मशीन उपलब्ध केले. परंतु बस स्टॅन्ड वरील प्रवाशी निवाऱ्यात त्यांनी मशीन फिट करून प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. त्वरित प्रवाशी निवाऱ्यातील जल शुद्धीकारण मशीन इतरत्र हलवून प्रवाशांचा हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा. अशा मागणीचे निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    प्रवाशी निवारा प्रवाशांना कुचकामी.

  प्रवाशांना बस येईपर्यंत ऊन.वारा. पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात प्रवाशी निवारा बांधले आहेत. परंतु येथे मात्र ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा कळसच झाला. ग्रामपंचायत प्रशासनाने चक्क प्रवाशी निवाऱ्यावरच अतिक्रमण करत शुद्ध पाण्याचे मशीन यात बसवून प्रवाशांना उन्हात बसवले आहे.

  याबत ग्रामस्थांनी आमदार किशोर पाटील, तहसीलदार भडगाव,आगार प्रमुख पाचोरा, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रवाशी निवारा प्रवाशांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

     शासनाचे पैसे गेले पाण्यात.

  शासनाच्या लोकाभिमुख योजनेतून ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांना अल्प दरात शुद्ध पाणी मिळावे या भावनेतून गावासाठी जल शुद्धीकारण मशीन उपलब्ध करून दिले परंतु या मशीनचे शुद्ध पाणी ग्रामस्थांना चाखायला मिळालेच नाही. त्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेले आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, यांना प्रवाशी निवाऱ्यातील बंद मशीन काढून प्रवाशांची सोय करण्याची मागणी केली परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभाराचा कळस झाल्याने प्रवाशांना पावसाळ्यात, उन्हात, आसरा घेण्यासाठी जागा शोधावी लागत आहे.        

चौकट – प्रतिक्रिया 

 शासनाने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवाशी निवारा बांधला होता. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभाराने प्रवाशांच्या हक्काच्या जागेवरच अतिक्रमण करून त्यांच्या डोक्यावरचे छत हिरवले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.राजेंद्र शिवदास पाटील. व ग्रामस्थ महिंदळे.

भडगावमध्ये समाजप्रबोधनाचा जागर; गोविंद महाराजांच्या भारूडाने भ्रष्टाचारावर प्रहार,भडगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.!!!

0

भडगावमध्ये समाजप्रबोधनाचा जागर; गोविंद महाराजांच्या भारूडाने भ्रष्टाचारावर प्रहार,भडगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.!!!

​ भडगाव प्रतिनिधी :-

लोकशाहीत मतदार हा केवळ मत देणारा नसून तो सत्तेचा खरा राखणदार आहे, हा संदेश देत. देवाची आंळदी येथिल गोविंद महाराज यांनी ‘विनोदातुन समाज प्रबोधन’ करत एक वैचारिक विचार व विनोदाचा संगम साधत अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारूडाच्या कार्यक्रमाने जनमानसात विचारांची ठिणगी पेटवली. कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय प्रांगणात झालेला हा कार्यक्रम सामाजिक भान आणि जनजागृतीचा नवा अध्याय ठरला.

​ प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज (देवाची आळंदी) यांनी आपल्या धारदार भारूडातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घातला. भ्रष्टाचार, राजकीय उदासीनता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी परखड शब्दांत प्रहार केला. “जनतेने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे,” असे आवाहन करत त्यांनी लोकशाहीचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून देत भारूडातून ‘दांभिकतेवर’ ताशेरे ओढले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात लोटपोट हसत दाद दिली.

​ *नवनिर्वाचित नगराध्यक्षा सह मान्यवरांचा गौरव*

​ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने होते. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र तथा पाचोरा गट नेते सुमित पाटील, भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा, ​रेखा प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील, विजय महाजन (जळगाव), जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय पवार, तालुकाध्यक्ष जावेद शेख, पत्रकार सुनिल पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील सह पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी संपादक हेमंत अलोने यांच्या हस्ते नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, गोविंद महाराज याचा सत्कार तर पत्रकार दिलीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​ *पत्रकारितेचे सामाजिक दायित्व*

​ भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे. “एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक प्रबोधनासाठी एकत्र येणे, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे,” असे मत जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचलन व आभार शिक्षक योगेश शिपी यानी केले.

———————-चौकट—————–

*पत्रकार दिनी आरोग्य सेविकाचा सन्मान*

भडगाव तालुका पत्रकार संघ पत्रकार दिनी विविध उपक्रम राबवित असतो. यावर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिसी उपविभाग अधिकारी विजय ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य सुनिल पाटील, विलासराव नेरकर, डॉ. समाधान वाघ, बाळासाहेब महाजन, जेष्ठ पत्रकार संजय पवार, जावेद शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार सुनिल पाटील याची कन्या तेजस्विनी पाटील हीने वैद्यकीय क्षेत्रात बीएएमएस पदवी प्राप्त केल्याने तर साधनाई पुरस्कारची हॅट्रीक प्राप्त दर्शन पाटील याचा सन्मान करण्यात आला.

मुंबई महापालिका निवडणूक: उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार का.? एकनाथ शिंदेंच्या उत्तरामुळे राजकीय चर्चांना उधाण.!!!

0

मुंबई महापालिका निवडणूक: उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार का.? एकनाथ शिंदेंच्या उत्तरामुळे राजकीय चर्चांना उधाण.!!!

 

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची निर्णायक लढाई ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. शिवसेनेत 2022 मध्ये झालेल्या मोठ्या फाटाफुटीनंतर ठाकरे गटासमोर आव्हानांची मालिका उभी राहिली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरेंसमोरील संकटं

एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर:

उद्धव ठाकरे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागलं

“खरी शिवसेना कोणाची?” हा प्रश्न न्यायालयात गेला

पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडला

तरीही, फाटाफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकत ताकद दाखवली, तर शिंदे गटालाही 7 जागांवर यश मिळालं. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. केवळ 20 आमदारांवर समाधान मानावं लागलं, तर महायुती मोठ्या बहुमतासह सत्तेत आली.

मुंबई महापालिका: प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न

मुंबई महापालिका ही अनेक दशकांपासून शिवसेनेची बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे:

ठाकरे गटासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई ठरते आहे

पराभव झाल्यास उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपेल का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत

याच पार्श्वभूमीवर ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंना थेट सवाल विचारण्यात आला.

“मी कोणाला संपवण्याची भाषा करणार नाही” – एकनाथ शिंदे

या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले,

> “मी एवढा मोठा नाही की कोणाचं राजकारण संपवण्याची भाषा करेन. पण जर तुम्ही लोकांचं काम केलं नाही, तर लोक आपोआप दूर जातात.”

लोक उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटाकडे का येत आहेत, याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले,

> “आज उबाठा सोडून लोक माझ्याकडे का येत आहेत? सगळे लोक वाईट आहेत का? सगळाच कचरा आहे का? लोकांना पाठिशी उभा राहणारा नेता आणि संकटात धावून जाणारा कार्यकर्ता लागतो. तो त्यांनी माझ्यामध्ये पाहिलाय.”

यावेळी त्यांनी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही दिला.

“राजकारणात कोणताही पक्ष कायमचा संपत नाही”

उद्धव ठाकरे पराभूत झाले तर त्यांचं राजकारण संपेल का, या चर्चांवर शिंदे म्हणाले,

> “राजकारणात कोणताही पक्ष कायमचा संपत नसतो. चढ-उतार येत असतात.”

यासाठी त्यांनी काँग्रेसचं उदाहरण देत सांगितलं की,

काँग्रेसच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले

त्यामुळे जनतेनं सत्ताबदलाचा निर्णय घेतला

त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गेल्या 10–11 वर्षांत विकासकामांवर भर दिला

महाराष्ट्रातही लोक काम पाहून निर्णय घेतात, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.

राजकीय अर्थ

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे दोन गोष्टी स्पष्ट होतात:

1. ते थेट उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपेल असं म्हणत नाहीत

2. मात्र, लोकांचा कौल हा कामगिरीवरच अवलंबून असल्याचा ठाम संदेश देतात

मुंबई महापालिकेची निवडणूक त्यामुळे:

उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची परीक्षा

तर एकनाथ शिंदेंसाठी आपली पकड अधिक मजबूत करण्याची संधी अशी ठरणार असल्याचं चित्र आहे.

आगामी काळात मुंबई महापालिकेचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.

गोंडगाव विदयालयात स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.!!!

0

गोंडगाव विदयालयात स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विदयालयात दि. ७ रोजी दुपारी १२.३० वाजता स्वातंञ्य सेनानी, शिक्षण महर्षी नानासाहेब स्वर्गीय यशवंतराव नारायणराव चव्हाण यांची १०३ वी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. सुरुवातीस स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो,बी. जी. ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांनी स्व. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

लाडकी बहीण योजना लाभाऐवजी त्रासाचीच हमी.?

0

लाडकी बहीण योजना  लाभाऐवजी त्रासाचीच हमी.?

 

महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज अनेक महिलांसाठी दिलास्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. योजना जाहीर करताना गाजावाजा, जाहिरातबाजी आणि राजकीय श्रेयवाद भरपूर झाला; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी प्रशासनाची असंवेदनशीलता आणि तांत्रिक अपयश उघडकीस आले आहे.

केवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली, पण ही मुदत वास्तवाशी फारकत घेणारी ठरली. संकेतस्थळ वारंवार बंद पडणे, ओटीपी न मिळणे, माहिती अपलोड न होणे यामुळे हजारो महिलांना केवायसी करता आली नाही. ग्रामीण भागातील महिलांना तर इंटरनेट, स्मार्टफोन आणि तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे दुहेरी अडचणींचा सामना करावा लागला.

याहून गंभीर बाब म्हणजे, तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली आणि त्याची शिक्षा त्यांनाच भोगावी लागत आहे. पात्र असूनही लाभ नाकारणे ही प्रशासकीय बेफिकिरी नाही तर अन्यायच म्हणावा लागेल. महिला व बालविकास कार्यालये आणि सेतू केंद्रे महिलांच्या गर्दीने ओसंडून वाहत असून, “ऑनलाईन करा” या एकाच उत्तराने प्रशासन जबाबदारी झटकत आहे.

सरकारने योजना आखताना जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास केला होता का, हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ डिजिटल प्रणालीवर अवलंबून राहून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, ही अपेक्षाच चुकीची ठरत आहे. योजना लाभार्थी केंद्रित असायला हव्यात, की प्रशासन-सुविधाजनक, हा मूलभूत प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश नक्कीच चांगला आहे; मात्र अंमलबजावणीतील गोंधळामुळे तो फोल ठरत आहे. सरकारने तातडीने केवायसीची मुदत वाढवावी, ऑफलाइन पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि तांत्रिक दोषांसाठी जबाबदार यंत्रणांवर कारवाई करावी. अन्यथा, महिलांच्या नावाने सुरू केलेली ही योजना त्यांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरेल.

घोषणांनी योजना यशस्वी होत नसतात; त्या यशस्वी होतात प्रभावी अंमलबजावणीने. लाडकी बहीण योजना ही केवळ राजकीय घोषणा न राहता खऱ्या अर्थाने महिलांसाठी लाभदायक ठरावी, हीच अपेक्षा.

कासोदा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.!!!

0

कासोदा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.!!!

कासोदा ता. एरंडोल  प्रतिनिधी

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार समाजाच्या दैनंदिन कार्यात मोलाचे योगदान असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेत पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील प्रश्न, अन्याय व प्रशासनाच्या कार्यावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व पत्रकारितेच्या माध्यमातून कसे अधोरेखित होते, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांनी सत्य, निष्ठा व सामाजिक बांधिलकी जपून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना स. पो. नि. श्रीकांत पाटील यांनी पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समाजात शांतता, सुव्यवस्था व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमास नरेंद्र पाटील, नुरुद्दीन मुल्लाजी, केदारनाथ सोमानी, जितेंद्र ठाकरे, शैलेश पांडे, सुरेश ठाकरे, सागर शेलार, प्रशांत सोनार, घनश्याम पांडे, अॅड. वासुदेव वारे, अहमद रजा खान आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला.

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भडगाव तालुका यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना ‘गिरणा नवरत्न पुरस्कार’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासह परिसरातील पर्यावरण, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या समारंभाला भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार अनिल भामरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राजेंद्र निकम यांच्यासह भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांचे पती प्रदीप (जहांगीर) मालचे तसेच नगरसेवक विजयकुमार भोसले, अतुलसिंह परदेशी, सचिन चोरडिया,अलीम शहा (छोटे सरकार), इम्रानअली सय्यद, शशीकांत येवले, साप्ताहिक महाराष्ट्र चौफेर चे मुख्यसंपादक अबरार मिर्झा, निलेश मालपुरे, मा नगरसेविका तथा फ्रुट सेल  सोसायटी चे संचालिका योजना ताई, फ्रुट सेल  सोसायटी चे संचालक प्रभाकर शामराव पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सकारात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माउली फाउंडेशनच्या वतीने संगिता जाधव, उद्योजक दिलीप शेंडे, धैर्य कॉम्प्युटेकचे संचालक महेंद्र अहिरराव, अंबिका कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय पाटील, इंदुमती ट्रेडर्सचे संचालक नाना चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.

कार्यक्रमास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, तालुका सचिव यशकुमार पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

0

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

 

अबरार मिर्झा

_महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पत्रकारांचा सन्मान करण्याचा सोहळा नसून, समाजातील पत्रकारितेच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि निर्भीड पत्रकारितेच्या परंपरेचा पुनरुच्चार करतो.

इ.स. १८३२ साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजप्रबोधनाची मशाल पेटवली. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात सत्य मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे धाडसाचे काम होते. मात्र जांभेकरांनी ज्ञान, विज्ञान, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहित या विषयांना प्राधान्य देत पत्रकारितेला दिशा दिली. त्यांनी पत्रकारितेला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाजशिक्षणाचे प्रभावी साधन बनवले.

आजच्या काळात पत्रकारितेची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. छापील माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी माहितीचे स्वरूप बदलले आहे. माहिती क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचते; मात्र त्याचबरोबर अफवा, अर्धसत्य आणि सनसनाटीपणाचे आव्हानही वाढले आहे. अशा परिस्थितीत पत्रकाराची जबाबदारी अधिक कठीण आणि अधिक महत्त्वाची बनली आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करतो. सामान्य नागरिकांचे प्रश्न, दुर्लक्षित घटकांचे दुःख, भ्रष्टाचार, अन्याय या सर्व बाबी समाजासमोर निर्भीडपणे मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य पार पाडताना सत्यनिष्ठा, निष्पक्षता आणि सामाजिक भान जपणे अत्यावश्यक आहे.

आज व्यावसायिक स्पर्धा, टीआरपी, लाईक्स-व्ह्यूज यांच्या दबावाखाली पत्रकारितेची नैतिकता धोक्यात येत असल्याची टीका होत आहे. अशा वेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांकडे पाहणे गरजेचे ठरते. त्यांनी पत्रकारितेला मूल्यांची बैठक दिली होती. त्या मूल्यांची जपणूक करणे ही आजच्या पत्रकारांसमोरील खरी कसोटी आहे.

पत्रकार दिन हा केवळ अभिनंदनाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय योगदान देत आहोत? आपली लेखणी सत्याच्या बाजूने आहे का? दुर्बलांच्या आवाजाला आपण व्यासपीठ देतो आहोत का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा दिवस आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेत, बदलत्या काळाशी जुळवून घेत सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पत्रकारितेचा दीपस्तंभ उजळवत ठेवण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक पत्रकारावर आहे._

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

0

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ. सुनीता किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार हाजी अबुलेस आलाउद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील मुस्लिम नगरसेवक, समाजसेवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, सलोखा व विकासाभिमुख प्रशासन या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व पायाभूत विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सौ. पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!