वाळू तस्करीविरोधात प्रशासन आक्रमक ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील जुने पिंपळगाव रस्त्यावरील घोडदे परिसरात गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू जप्त केली. सदर कारवाईत पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ रोजी करण्यात आली. गिरणा नदी पात्रातून कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाईचे नियोजन केले. कारवाईदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला.
महसूल पथकाने एक ब्रास वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात महसूल व गौण खनिज कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लुळे, निखिल बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश अहिरे, महसूल सेवक समाधान माळी आदींच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, भडगाव तालुक्यातील गिरणा नदीसह अन्य परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




Recent Comments