कासोदा पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.!!!
कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार समाजाच्या दैनंदिन कार्यात मोलाचे योगदान असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेत पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील प्रश्न, अन्याय व प्रशासनाच्या कार्यावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व पत्रकारितेच्या माध्यमातून कसे अधोरेखित होते, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांनी सत्य, निष्ठा व सामाजिक बांधिलकी जपून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना स. पो. नि. श्रीकांत पाटील यांनी पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समाजात शांतता, सुव्यवस्था व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमास नरेंद्र पाटील, नुरुद्दीन मुल्लाजी, केदारनाथ सोमानी, जितेंद्र ठाकरे, शैलेश पांडे, सुरेश ठाकरे, सागर शेलार, प्रशांत सोनार, घनश्याम पांडे, अॅड. वासुदेव वारे, अहमद रजा खान आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला.
