भडगावमध्ये समाजप्रबोधनाचा जागर; गोविंद महाराजांच्या भारूडाने भ्रष्टाचारावर प्रहार,भडगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
लोकशाहीत मतदार हा केवळ मत देणारा नसून तो सत्तेचा खरा राखणदार आहे, हा संदेश देत. देवाची आंळदी येथिल गोविंद महाराज यांनी ‘विनोदातुन समाज प्रबोधन’ करत एक वैचारिक विचार व विनोदाचा संगम साधत अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारूडाच्या कार्यक्रमाने जनमानसात विचारांची ठिणगी पेटवली. कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय प्रांगणात झालेला हा कार्यक्रम सामाजिक भान आणि जनजागृतीचा नवा अध्याय ठरला.
प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज (देवाची आळंदी) यांनी आपल्या धारदार भारूडातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घातला. भ्रष्टाचार, राजकीय उदासीनता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी परखड शब्दांत प्रहार केला. “जनतेने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे,” असे आवाहन करत त्यांनी लोकशाहीचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून देत भारूडातून ‘दांभिकतेवर’ ताशेरे ओढले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात लोटपोट हसत दाद दिली.
*नवनिर्वाचित नगराध्यक्षा सह मान्यवरांचा गौरव*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने होते. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र तथा पाचोरा गट नेते सुमित पाटील, भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा, रेखा प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील, विजय महाजन (जळगाव), जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय पवार, तालुकाध्यक्ष जावेद शेख, पत्रकार सुनिल पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील सह पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी संपादक हेमंत अलोने यांच्या हस्ते नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, गोविंद महाराज याचा सत्कार तर पत्रकार दिलीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
*पत्रकारितेचे सामाजिक दायित्व*
भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे. “एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक प्रबोधनासाठी एकत्र येणे, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे,” असे मत जेष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचलन व आभार शिक्षक योगेश शिपी यानी केले.
———————-चौकट—————–
*पत्रकार दिनी आरोग्य सेविकाचा सन्मान*
भडगाव तालुका पत्रकार संघ पत्रकार दिनी विविध उपक्रम राबवित असतो. यावर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिसी उपविभाग अधिकारी विजय ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य सुनिल पाटील, विलासराव नेरकर, डॉ. समाधान वाघ, बाळासाहेब महाजन, जेष्ठ पत्रकार संजय पवार, जावेद शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार सुनिल पाटील याची कन्या तेजस्विनी पाटील हीने वैद्यकीय क्षेत्रात बीएएमएस पदवी प्राप्त केल्याने तर साधनाई पुरस्कारची हॅट्रीक प्राप्त दर्शन पाटील याचा सन्मान करण्यात आला.
