Home Blog Page 7

नवरा–बायकोची विजयी जोडी दिग्गजांवर भारी भडगावमध्ये शिवसेनेची भक्कम आघाडी

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगांवच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विस्थापित तरुण नेते लखीचंद पाटील हे किंगमेकर ठरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यातून शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

 

या निवडणुकीत लखीचंद पाटील पुरस्कृत नगराध्यक्ष उमेदवाराने विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे. या सोबतच पाटील दाम्पत्यानेही निवडणूक जिंकत शहर भर लक्ष वेधून घेतले आहे. नवरा–बायको दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येण्याची घटना भडगावच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

 

लखीचंद पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मधून एकूण १३९१ मते मिळवत ६३४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात सर्वसामान्य नागरिक, युवक व महिलांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रचारात विकास, पारदर्शकता व सर्वसमावेशक राजकारण या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

 

दरम्यान, त्यांच्या पत्नी समीक्षा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. समीक्षा पाटील यांनी एकूण १३०१ मते मिळवत अवघ्या १४ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. विशेष म्हणजे, त्यांनी दिग्गज नेते प्रताप नाना पाटील यांच्या कन्येचा पराभव केला. हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पारंपरिक राजकारणाला मतदारांनी नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.

 

अवघ्या १४ मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मतमोजणीदरम्यान शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरात विजयाच्या घोषणा देत शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले.

या निकालामुळे भडगाव च्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आगामी काळात शहराच्या विकासासाठी शिवसेना आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहरात विकासाला गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद.!!!

सावरकर सदन येथे पाचोरा व भडगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद.!!!

मुंबई | प्रतिनिधी :-

मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा व भडगाव नगरपरिषदांच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा यांचा सत्कार व शुभेच्छा समारंभ पार पडला. यावेळी शिवसेनेच्या पाचोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोरआप्पा पाटील तसेच भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई प्रदीप मालचे यांना मा. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नगरपालिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांनी पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करताना नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी विकासपुरुष आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. लखीचंद पाटील, नगरसेविका सौ. समीक्षा पाटील, पिंटू मराठे, जहांगीर मालचे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्हा परिषद जळगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न.!!!

 

भडगाव प्रतिनिधी : –

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले.

या शिबिरामध्ये जळगाव तालुका सर्व आरोग्य अधिकारी,सर्व आरोग्य सेवा कर्मचारी,समुदाय आरोग्य अधिकारी व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.याबाबत अधिक माहिती देतांना डॉ.सचिन भायेकर यांनी सांगितले की सिकलसेल,थॅलेसेमीया अशा रक्ताशी निगडित आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती मातांना नियमित रक्ताची गरज भासत असते.अशा सर्व गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून रक्तदान हे सर्वात मोठे श्रेष्ठदान असल्याने वर्षातून किमान दोन वेळा तरी प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करावे.असे आवाहन सदर प्रसंगी डॉ.भायेकर यांनी केले.स्वतः डॉ. भायेकर यांनी देखील रक्तदान करून सहभाग नोंदवला.सदर शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते,डॉ.प्रमोद पांढरे, डॉ.बाळासाहेब वाबळे,डॉ.सुपे आदी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तथा

इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांची रक्तपेढीची सर्व टीम,आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच

जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.आज पार पडलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लेख – ग्रामकौलाचा इशारा आणि महानगरांची निर्णायक कसोटी

महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर पालिका निवडणुकांचे २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेले निकाल फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता समजून घेण्याचे साधन नाहीत; ते ग्रामीण व निमशहरी मतदारांनी दिलेले लोकशाहीचे ठाम, जागरूक आणि स्पष्ट विधान आहेत. मतदारांचा बदललेला स्वभाव स्पष्ट दिसतो—सत्ता फक्त सवयीची नको, ती परिणामकारक, उत्तरदायी आणि दैनंदिन जीवनाला थेट स्पर्श करणारी हवी. हा कौल केवळ निवडणुकीचा निकाल नसून, प्रशासनाला दिलेला अंतिम इशारा आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातून उमटलेला कौल काही महत्त्वाचे संदेश ठळकपणे अधोरेखित करतो. मतदार आता फक्त घोषणा किंवा ओळखीच्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महागाई, सार्वजनिक सुविधा आणि स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता—हेच आज निर्णयाचे खरे निकष ठरत आहेत. काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी, काही ठिकाणी सत्ताबदल, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला दिलेली संधी हे स्पष्ट करतात की मतदार आता प्रत्यक्ष काम पाहतो आणि त्यावर न्याय्य निर्णय देतो. काही ठिकाणी दीर्घकाळ सत्तेत असलेली समीकरणे मतदारांनी क्षणार्धात बदलून टाकली, हे या बदललेल्या मानसिकतेचे ठळक उदाहरण ठरते.

 

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका केवळ वॉटर–गटर–मीटर व्यवस्थापन करणारी यंत्रणा नाहीत; त्या शहराच्या आत्म्याची आणि भविष्यास दिशा देणाऱ्या संस्थाही आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी–निजामपूर, पिंपरी–चिंचवड, नवी मुंबई, वसई–विरार, कल्याण–डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड–वाघाळा, मालेगाव, मीरा–भाईंदर, सांगली–मीरज–कुपवाड, पनवेल, अमरावती, इचलकरंजी, अकोला आणि अहिल्यानगर—या शहरांतून राज्याच्या अर्थचक्राची इंजिने सातत्याने चालत असतात.

 

वाढती महागाई, घरकुलांच्या वाढत्या किंमती, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, झोपडपट्ट्यांतील समस्या आणि असमान विकास यांनी शहरी जीवन अधिक गुंतागुंतीचे आणि तणावग्रस्त केले आहे. दीर्घकाळ चाललेल्या प्रशासक कारभारामुळे लोकप्रतिनिधींच्या अभावात नागरिकांचा थेट सहभाग मर्यादित झाला असून उत्तरदायित्वाची धार बोथट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका फक्त सत्ता हस्तांतरणापुरत्या मर्यादित न राहता, लोकप्रतिनिधींच्या पुनरागमनासाठी आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी नागरिकांनी व्यक्त केलेली ठाम मागणी ठरणार आहेत.

 

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका काही ठळक आणि परस्परपूरक प्रवाह स्पष्टपणे दर्शवतात. कामगिरीवर आधारित मतदान हा कळीचा मुद्दा ठरत असून, केवळ प्रचाराच्या जोरावर संधी मिळणे आता अशक्य होत चालले आहे. स्थानिक, पारदर्शक, सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह नेतृत्वाला मतदार प्राधान्य देताना दिसतात. महिला आणि तरुण मतदार सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, रोजगार, शिक्षण व आरोग्य या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेत आहेत. शहरी मध्यमवर्ग घरकुल, वाहतूक, महागाई आणि एकूणच जीवनमानाशी निगडित प्रश्नांवर उघड नाराजी व्यक्त करत आहे. त्याचवेळी पूर, उष्णतेच्या लाटा, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय व आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्द्यांनाही मतदार गंभीरतेने घेत आहेत. डिजिटल व सोशल मिडियामुळे प्रचार अधिक प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन मतदार स्वतः करीत आहेत. हे सर्व प्रवाह परस्परांपासून वेगळे नसून, शहरी मतदाराच्या वाढत्या अपेक्षा, जागरूकता आणि उत्तरदायित्वाच्या मागणीचे प्रतिबिंब आहेत.

 

ग्रामीण भागात मतदान प्रामुख्याने स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता, पाणीपुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधांभोवती केंद्रित असते. त्याउलट शहरी भागात आर्थिक स्थैर्य, जीवनमान, सार्वजनिक सेवा, घरकुल आणि वाहतूक व्यवस्था हे निर्णायक मुद्दे ठरतात. ही तुलना राज्यातील बदलत्या सामाजिक–राजकीय वास्तवाचे स्पष्ट चित्र उभे करते.

 

राज्यातील प्रमुख १० महानगरपालिकांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांचे स्वरूप ठळकपणे वेगवेगळे दिसते. बृहन्मुंबईत वाहतूक, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन आघाडीवर आहेत; पुण्यात सार्वजनिक वाहतूक आणि शिक्षण सुविधा महत्त्वाच्या ठरतात; ठाण्यात पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडी हे कळीचे प्रश्न आहेत; नागपुरात औद्योगिक वाढीसोबत वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे; नाशिकमध्ये पाणी, महागाई आणि रस्त्यांची अवस्था चर्चेत आहे; कोल्हापुरात सांडपाणी आणि सार्वजनिक सुविधांचा प्रश्न केंद्रस्थानी आहे; सोलापुरात कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा महत्त्वाचा ठरतो; नवी मुंबईत वाहतूक आणि पर्यावरण व्यवस्थापन महत्त्वाचे मुद्दे आहेत; वसई–विरारमध्ये झोपडपट्ट्या, पाणी आणि सार्वजनिक सेवा गंभीर प्रश्न आहेत; तर पिंपरी–चिंचवडमध्ये उद्योग, वाहतूक आणि घरकुल हे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. इतर महानगरपालिकांमध्येही मतदानाची दिशा प्रामुख्याने कामगिरी, नेतृत्व आणि पारदर्शक कारभाराभोवतीच फिरताना दिसते—हीच बाब भविष्यातील शहरी राजकारणाला व्यक्तिकेंद्रिततेकडून उत्तरदायित्वकेंद्रिततेकडे नेणारी निर्णायक वळणरेषा ठरत आहे.

 

लोकशाही ही केवळ मतदानाची एकदिवसीय प्रक्रिया नसून, ती सतत चालणारी संवादयात्रा आहे. ग्रामीण महाराष्ट्राने आपल्या अपेक्षा आणि भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत; आता शहरी मतदारांची वेळ आहे. शहरे फक्त सिमेंट आणि डांबरावर उभी नसतात; ती उभी असतात नागरिकांच्या स्वप्नांवर, अपेक्षांवर आणि न्यायाच्या भावनेवर. ही स्वप्ने जेव्हा मतपेटीत उतरतात, तेव्हा फक्त सत्ता बदलत नाही—राजकीय संस्कृती बदलते, प्रशासनाची जबाबदारी निश्चित होते आणि लोकशाहीची नाडी अधिक ठामपणे धडधडू लागते.

 

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्णायक परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. कामगिरी, स्थानिक नेतृत्व आणि पारदर्शक कारभार हेच मतदानाचे मुख्य निकष असतील. महिला, तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक सत्तासमीकरणे बदलणार नाहीत, तर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रवाहांनाही दिशा देतील—सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाची आणि विरोधकांसाठी जबाबदारी स्वीकारण्याची ही वेळ असेल. या निवडणुकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय शक्तींना या कौलाचे पडसाद पुढील विधानसभा राजकारणात उमटताना दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : २२/१२/२०२५ वेळ : १०:३५

कर्जबाजारी अर्थव्यवस्थेचे आव्हान, एआयचे वर्चस्व आणि बदलते पर्यावरण : स्त्रीकेंद्री दृष्टीकोनातून सखोल मंथन.!!!

कर्जबाजारी अर्थव्यवस्थेचे आव्हान, एआयचे वर्चस्व आणि बदलते पर्यावरण : स्त्रीकेंद्री दृष्टीकोनातून सखोल मंथन.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तीन दिवसीय महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्था : एक स्त्रीकेंद्री दृष्टीकोन या परिसंवादात अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांनी आगामी काळात एआयचे वर्चस्व आणि पर्यावरणातील बदल सर्वसामान्यांच्या जीवनावर खोल परिणाम घडवतील, असा इशारा दिला. कुटुंबाचा अर्थसंकल्प सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रीवर असते; मात्र युद्धसदृश्य जागतिक परिस्थितीमुळे बहुतेक देशांचा मोठा खर्च संरक्षणावर होत असल्याने अनेक कल्याणकारी, विशेषतः स्त्रीकेंद्री योजना बंद पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. जाहिराती आणि प्रलोभनांच्या माध्यमातून स्त्रियांना भौतिक सुखांच्या मागे लावत कर्जबाजारी करणारी अर्थव्यवस्था कशी कळत-नकळत लादली जाते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे कर्जबाजारी अर्थव्यवस्था बळावत असून हा धोका वेळीच ओळखून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी ‘भवितव्य अस्वस्थ जगाचे’ या परिसंवादात ‘भवितव्य’ आणि ‘भविष्य’ यातील फरक स्पष्ट करताना युद्धमय वातावरण, एआय आणि हवामान बदल यांच्या एकत्रित परिणामांमुळे संपूर्ण मानववंशासाठी गंभीर संकट निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शमा दलवाई यांनी ‘हक्कांपासून हतबलतेकडे प्रवास’ या विषयावर आपले मनोगत मांडले. पितृसत्ता आणि मनुवाद या विषयावर छाया खोब्रागडे यांनी भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या ५० वर्षांच्या वाटचालीला शुभेच्छा देत, सध्याच्या गढूळ वातावरणात आव्हान देणाऱ्या आपण सर्व जण छोट्या पणत्या असल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात स्त्री मुक्ती परिषदेने राबवलेल्या विविध अभियानांमुळे व्यापक एकजूट निर्माण झाल्याबद्दल त्यांनी परिषदेचे आभार मानले.

 

लोकशाही संस्थांचे खच्चीकरण आणि अराजक याविषयी बोलताना तिस्ता सेटलवाड यांनी स्त्रियांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर ‘लक्षित हिंसा’ केली जाते, ही बाब उदाहरणांसह मांडली. गेल्या ७५ वर्षांत सत्तांतर होत राहिले असले तरी मूळ ढाचा बदलत गेल्याने जातीय हिंसेकडे आजही पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समस्या अनेक असल्या तरी त्यांची उत्तरे शोधण्यासाठी संघटित विचार आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अँड. वृंदा ग्रोवर यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले, दहशत आणि जनसंहाराच्या राजकारणावर भाष्य करताना गेल्या दशकात न्यायव्यवस्थेत झालेले बदल समाजमनावर गंभीर परिणाम घडवत असल्याचे स्पष्ट केले. युनिफॉर्म सिव्हिल कोड असो वा ऊस कामगारांचे प्रश्न, अनेक ठिकाणी स्त्रियांनाच लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

पर्यावरण आणि विकास या परिसंवादात जंगल व इतर नैसर्गिक संसाधने, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांसमोरील आव्हाने, घनकचरा व्यवस्थापन, शेती, शेतकरी महिला, विस्थापन आणि विकासनीती या विषयांवर सखोल चर्चा झाली. पेसा कायद्यानुसार प्रत्येक गावात ग्रामसभा असणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याने सामुदायिक आणि वैयक्तिक अधिकारांसाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याचे तज्ञांनी सांगितले. याच परिषदेत LGBTQ+ समूहाच्या हक्कांच्या लढ्याला स्त्री मुक्ती परिषदेने ठाम पाठिंबा जाहीर केला. “क्वीअर, ट्रान्स, इंटरसेक्स व सेक्स वर्कर्स : संघर्ष आणि राजकारण” या विषयावरील परिसंवादात पारलिंगी, सेक्सवर्कर आणि विविध ट्रान्सजेंडर समूहातील प्रतिनिधींनी निर्भीडपणे आपली ओळख मांडली. डॉ. चयनिका शाह यांच्या अध्यक्षतेखाली जमीर कांबळे, आर्य पाठक, भव्या गुप्ता, शाल्स महाजन, निमिष साने, मृदूल, किरण आणि स्मृती गिरीष यांनी सहभाग घेतला. लिंगभाव आणि लैंगिकतेच्या चौकटीपलीकडे जाऊन ट्रान्सजेंडर व ट्रान्स स्त्रियांना हक्क आणि स्वतंत्र ओळख मिळणे ही काळाची गरज असून, भेदभावमुक्त समाजनिर्मितीसाठी स्त्री मुक्ती परिषद सातत्याने साथ देईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकशाही सशक्त राहिली तरच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती शक्य – अ‍ॅड. इंदिरा जयसिंग

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर ) : स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय (२०, २१ व २२ डिसेंबर) राज्यस्तरीय परिषदेची सुरुवात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाली. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. इंदिरा जयसिंग, डॉ. सईदा हमीद तसेच महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार, अ‍ॅड. निशा शिऊरकर, डॉ. चयनिका शहा, लता भिसे-सोनावणे, हसीना खान, अमोल केरकर, सुनीता बागल, शुभदा देशमुख, संगीता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्त्रीमुक्ती चळवळीच्या परंपरेनुसार स्त्रीमुक्ती विषयक गीतांच्या सादरीकरणाने परिषदेची सुरुवात झाली. राज्यातील ३१ जिल्ह्यांतून ८००हून अधिक विविध जाती-पंथांतील महिला प्रतिनिधी आणि ट्रान्सजेंडर यांनी परिषदेला उपस्थिती लावली. सुमारे ९२ स्त्रीमुक्ती संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला. गेल्या वर्षभरात परिषदेमार्फत राज्यभर विभागनिहाय महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. यासह अलीकडेच करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिट अहवालाची माहिती देत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील वास्तव आणि आव्हाने स्पष्ट करण्यात आली.

 

यावेळी बोलताना अ‍ॅड. इंदिरा जयसिंग म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने देशात स्त्रीमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली. गांधीजींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शिकवण दिली, तर डॉ. आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करायला शिकवले. संविधानाचे जनक कोण, हा प्रश्न नेहमी विचारला जातो; मात्र संविधानाची ‘आई’ कोण, हा प्रश्न विचारला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मृणालताई गोरे आणि अहिल्याबाई रांगणेकर यांनी पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लाटणे मोर्चे काढले, प्रमिला दंडवते यांनी हुंडाविरोधी चळवळ गावोगावी पोहोचवली, निरा देसाई यांनी शैक्षणिक परंपरेचा पुरस्कार केला, तर निर्मला देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्या सार्वत्रिक असल्याची जाणीव करून दिली, असे त्यांनी नमूद केले. पंचायत राज व्यवस्थेत महिलांना अधिकार मिळाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात सत्ता अनेकदा ‘सरपंच पतीं’कडेच केंद्रीत राहते. त्यामुळे स्त्रीमुक्ती ही लोकशाहीवर अवलंबून असून, लोकशाही सशक्त राहिली तरच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

सन्माननीय पाहुण्या डॉ. सईदा हमीद यांनी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या कार्याचे कौतुक करताना, प्लॅनिंग कमिशनमध्ये काम करताना मालेगाव आणि गडचिरोली येथील परिस्थितीचा अभ्यास करून वस्तुस्थिती देशासमोर मांडल्याचा अनुभव सांगितला आणि स्त्रीमुक्तीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच दशकांच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेतला. आजही हुंड्यामुळे महिलांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, मेट्रोसारख्या सुविधा आल्या तरी प्रवास सुरक्षित नाही, तसेच घर व शाळांमध्ये स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकताच नरेगा संदर्भातील ठराव लोकसभेत मंजूर केल्यामुळे रोजगार हमी योजनेवर होणारे परिणाम चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले, तसेच आगामी अणुकरारांमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांवर आतापासूनच विचार करण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्ष शारदा साठे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि परिषदेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्रावर झोंबणाऱ्या शीतलहरींचा प्रहार; पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा.!!!

महाराष्ट्रावर झोंबणाऱ्या शीतलहरींचा प्रहार; पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा.!!!

मुंबई प्रतिनिधी :-

उत्तर भारतातील पर्वतीय भागांसह मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात झालेल्या तीव्र घटीनंतर त्याचा परिणाम आता मध्य भारतासह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी महाराष्ट्रात शीतलहरींचा इशारा जारी केला आहे.

 

राज्याच्या उत्तरेकडील पट्ट्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या झोंबणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, घाट क्षेत्रासह मैदानी भागांमध्ये धुक्याची चादर पसरत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा प्रशासन आणि हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

मुंबई–उपनगरांमध्येही गारठा

 

मुंबई शहर व उपनगरांमध्येही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत असून, किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहरात सकाळच्या वेळी हलकं धुकं जाणवणार असून सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार

 

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होत असून ही स्थिती सोलापूरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जाणवणाऱ्या शीतलहरींसारखीच थंडी आता महाराष्ट्रात जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घराबाहेर पडायचं की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

मराठवाडा–विदर्भालाही फटका

कोकण, मराठवाडा आणि विदर्भ हे भागही या शीतलहरींपासून सुटलेले नाहीत. नांदेड, परभणी, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शीतलहरी हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असून, पुढील 48 तासांत हवामानात फारसे बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक कारणांशिवाय पहाटे आणि रात्री उशिरा बाहेर पडू नये, उबदार कपडे वापरावेत आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.

चार नगरसेवकांचा सौहार्दपूर्ण सत्कार; भडगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार

चार नगरसेवकांचा सौहार्दपूर्ण सत्कार; भडगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे शिवसेनेचे नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा व इमरान अली सय्यद तसेच प्रभाग क्रमांक ७ चे अपक्ष उमेदवार अलीम शाह आणि शिवसेनेचे उमेदवार हाजी खलील मिस्त्री यांनी निवडणुकीनंतर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. या उपक्रमातून राजकीय सौहार्द, एकोपा आणि शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक सहकार्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते जमाल भाऊ कासार, पत्रकार अबरार मिर्झा, एच बी ए इंग्लिश मेडीयम स्कुलचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख यांनी देखील निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला

निवडणूक काळात विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी निवडणुकीनंतर ते बाजूला ठेवून नागरिकांच्या हितासाठी एकत्र काम करणे ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. भडगाव शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा व शिक्षण या विषयांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर वेळेत तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या समजून घेऊन त्यावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

भडगावच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्षभेद न ठेवता सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक असून, शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. नागरिकांचा विश्वास व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सौहार्दपूर्ण भूमिकेमुळे नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सत्कार सोहळ्याला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी सहकार्य व समन्वयाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे भडगाव शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख ठरले किंगमेकर

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख ठरले किंगमेकर

पाचोरा प्रतिनिधी :–

पाचोरा नगरपरिषदेच्या अलीकडील निवडणुकीत हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख हे ठरले निर्णायक किंगमेकर. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या जबाबदारीनुसार, हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांनी शिवसेनाच्या 9पैकी 9 उमेदवारांना नगरसेवकपदी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

यामुळे निवडणुकीत सत्ता समतोल राखण्यात आणि शिवसेनेला नगरपरिषदेतील आपले स्थान मजबूत करण्यात मोठा वाटा राहिला. स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरल्यामुळे भविष्यातील नगरपालिकेच्या धोरणांवरही त्यांचा प्रभाव दिसून येईल.

नगरपरिषदेच्या या निवडणुकीत अनेक पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा होती, मात्र हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन यांच्या निर्णयक्षमतेमुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले.

मताधिक्यांचा पाऊस, विजयांचा इतिहास : भडगाववर शिवसेनेचा भगवा शिक्का.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व यश मिळवत नगरराजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मिळालेल्या विक्रमात्मक मताधिक्यामुळे हे उमेदवार शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

प्रभाग क्रमांक ३ अ : सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम

या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान प्रभाग क्रमांक ३ अ मधील शिवसेनेच्या उमेदवार आसिम भाऊ मिर्झा यांच्या मातोश्री सौ. मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग यांनी पटकावला आहे.

त्यांना तब्बल १७८५ मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवार पठाण बिबाबी अमानुल्लाखान यांना केवळ ५३१ मते मिळाली.

यामुळे अनजुमपरवीन मिर्झा यांनी १२५४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम नोंदवला आहे.

प्रभाग क्रमांक ७ ब : शिवसेनेचा प्रचंड जनाधार

प्रभाग क्रमांक ७ ब मधून शिवसेनेचे शेख खलील शेख अजिज यांनी १६०३ मते मिळवत विजय मिळवला. भाजपाचे बेग न्यामतबेग हुकूमत यांना केवळ ४६१ मते मिळाली.या लढतीत ११४२ मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवत शेख खलील यांनी शिवसेनेचा मजबूत जनाधार स्पष्ट केला.

प्रभाग क्रमांक ३ ब : हजाराहून अधिक मतांचे वर्चस्व

इतर मोठ्या फरकाने विजयी उमेदवार

प्रभाग ९ अ : भोसले विजयकुमार रायभान (शिवसेना) – १५०५ मते, फरक १०५३

प्रभाग क्रमांक ३ ब मधून शिवसेनेचे सय्यद इम्रानअली शहादतअली यांनी १६६८ मते मिळवली, तर भाजपाचे पठाण शेरखान मजिदखान यांना ६३६ मते मिळाली.

याठिकाणी १०३२ मतांच्या फरकाने शिवसेनेचा विजय झाला.

प्रभाग ६ ब : पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना) – १३९१ मते, फरक ६३४

प्रभाग ५ ब : परदेशी अतुलसिंह भिकनसिंह (शिवसेना) – ११९६ मते, फरक २३०

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही मोठा फरक

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखाताई प्रदीप मालचे यांनी भाजपाच्या सुशीलाबाई पाटील यांचा १५११ मतांनी पराभव करत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हा विजयही शहराच्या राजकारणात मैलाचा दगड मानला जात आहे.

जनतेचा स्पष्ट कौल

या निवडणुकीतील मोठ्या मताधिक्यांचे निकाल पाहता भडगाव शहरातील जनतेने विकास, स्थैर्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला स्पष्ट कौल दिल्याचे चित्र आहे.

नगरपरिषदेतील बहुसंख्य जागांवर मिळालेला विजय आणि काही प्रभागांतील विक्रमी मताधिक्य यामुळे आगामी काळात शिवसेनेचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

error: Content is protected !!