Home Blog Page 6

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत एस.के.पवार विद्यालयाचा देशातून पाचवा क्रमांक

पाचोरा ता. प्रतिनिधी :-

नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध कला उत्सव स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये दिनांक २० ते २३ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांसाठी देशातील विविध राज्यातील तसेच केंद्र शासित प्रदेशातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांनी देशातून पाचवा क्रमांक पटकावत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या कला उत्सव स्पर्धेत शिल्पकला या कला प्रकारातून आपले विद्यार्थी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत होते. त्यांनी “लाकडी ट्रॅक्टर, जेसीबी, पांगुळगाडा, विटीदांडू, बाबागाडी, बळीराम नांगर व दुशर,” तयार केली होती.महाराष्ट्र राज्याला प्रथमच हा मान मिळाला ही गौरवाची बाब आहे.आय. ए.एस.अधिकारी मंगेश दोषी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संपूर्ण उपकरणांची माहिती जाणून घेतली.या विद्यार्थ्यांना प्रा उमेश काटकर व प्रा एस एच जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा चेअरमन सुभाष थेपडे मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ,

तसेच प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही बी गहरवाल, पर्यवेक्षक वाय डी ठाकूर, डी पी राजपूत व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

 

ठळक मुद्दे

सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांनी या कला प्रकारात संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

 

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारी सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा ही जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली.

सादरीकरणातून सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांना राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळाला.

पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी व गौरव विनोद मिस्तरी यांना प्रा.उमेश काटकर व प्रा.एस.एच.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरदेवळ्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचाविल्यामुळे येथिल कृषीउदयोजक, प्रणय भांडारकर यांनी विद्यालयासह यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित केले, सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून विविध राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व कला प्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव

भडगाव येथे तिसरी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथे तिसरी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर अशा विविध तालुक्यांमधून तब्बल ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भडगाव तालुक्यातील ३० विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.

 

सदर जिल्हास्तरीय स्पर्धा ही पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी (Selection Trial) म्हणून घेण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड झालेले विजेते खेळाडू नांदेड येथे दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणार आहेत.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश तांदळे सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व व उज्ज्वल भविष्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सर, नाजिम सर व रवी महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

 

यावेळी व्यासपीठावर अँग्लो उर्दू हाय स्कुल चे मुख्याध्यापक नाजीम सर, भडगाव पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे,पत्रकार अबरार मिर्झा, सलाउद्दीन शेख,  अ‍ॅड. सलमान मिर्झा, मंजुरी आली, असगर खान (कॉन्ट्रॅक्टर), फहीम सर, जिल्हा अध्यक्ष हाजी झाकीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष शाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणाऱ्या पंच व कोचेसचे विशेष कौतुक केले.

 

स्पर्धेसाठी बाहेरून आलेले कोचेस अतुल जाधव (वागडी), शुभम शेट्टी (चाळीसगाव), आयान खान, प्रेम देवरे, सचिन पाटील, कुसुम पाटील, दर्शना गोसावी, सागर शिंपी, प्रतीक दाभाडे, असीम खान, तनवीर मण्यार तसेच महाराष्ट्र राज्य कोच शाहरुख मण्यार यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्य प्रशिक्षक अबरार खान सर यांनी सर्व मान्यवर, पंच, कोचेस व खेळाडूंचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र शांताराम आचारी यांनी केली आहे.

याबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, यशवंत नगरमधील बजरंग चौक, मारोती मंदिर परिसर तसेच विलास पाटील यांच्या घराजवळील चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा असून, दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.

विशेषतः वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील रहिवासी या मार्गाचा दैनंदिन वापर करीत असून, अलीकडच्या काळात येथे दुचाकी चोरीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यास गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल, गुन्हेगारांवर वचक राहील तसेच पोलिस तपास कार्यास मदत होईल, असा विश्वास आचारी यांनी व्यक्त केला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांचाही पाठिंबा असून, पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मातोश्री विद्यामंदिरात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुस्तिकांचे वाटप.!!!

मातोश्री विद्यामंदिरात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुस्तिकांचे वाटप.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द, मुंबई येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन विषयावरील क्रियाशील पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, याबाबत शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या पुस्तिकांमधून प्लास्टिकची निर्मिती, त्याचे विविध प्रकार, ३ आर—रिड्यूस, रियुज व रिसायकल ही संकल्पना, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच त्याचा पुनर्वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रंजक व सहभागात्मक क्रियाकलापांमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, त्यांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रभावीपणे समजत आहे.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे ए.व्ही.पी. प्रोग्राम कोऑर्डिनेटर श्री. प्रदीप कासुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम व पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक सवयी रुजवल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक व सामाजिक दृष्टिकोन सुधारेल आणि ते भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून पुढे येतील. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निश्चितच दृढ होण्यास चालना मिळणार आहे.

शिव उद्योग संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या व सुरक्षित व्यवसाय संधी

शिव उद्योग संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या व सुरक्षित व्यवसाय संधी

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत सुमारे १.५० कोटी ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, त्यांच्यापैकी अनेक जण वेळेचा योग्य उपयोग न होणे, अनुभव सांगण्यासाठी संवादाचा अभाव तसेच निवृत्तीनंतर उद्भवणारी आर्थिक तंगी अशा समस्यांना सामोरे जात आहेत. गावी घर बांधणे, मुलांचे लग्न किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आयुष्याची जमापुंजी खर्च झाल्याने पुढील आयुष्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असून, याचा परिणाम त्यांच्या सामाजिक संपर्कांवरही होत आहे.

या पार्श्वभूमीवर सुखवस्तू तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांसाठी शिव उद्योग संघटना कमी गुंतवणुकीत आणि कमी अंगमेहनतीत सुरू करता येतील अशा सोप्या व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमांतर्गत व्यवसाय सुरू करताना आणि तो चालविताना शिव उद्योग संघटना प्रत्येक टप्प्यावर संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिक साहाय्य सेवा महत्त्वाची असून, एकटे राहणाऱ्या किंवा ज्यांची मुले बाहेरगावी असतात अशा नागरिकांना बँकिंग व शासकीय कामे, पेन्शनविषयक प्रक्रिया, लाईट बिल भरणे, टॅक्स फाईल करणे, डॉक्टरांकडे जाण्यासाठी सोबत करणे, औषधांचे नियोजन तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू व औषधे घरपोच देण्यासारख्या सेवा देण्यात येणार आहेत. यासोबतच सुखवस्तू ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधणे व गप्पा मारणे हेदेखील या सेवेत समाविष्ट आहे.

नोकरी करणाऱ्या पालकांसाठी बालसंगोपन व डे-केअर सेवा तसेच परदेशात किंवा इतर शहरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी होम-चेक व मालमत्ता व्यवस्थापन सेवा या उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये मुलांची काळजी घेणे, त्यांना गोष्टी सांगणे व अभ्यासात मदत करणे, रिकाम्या घरांची नियमित पाहणी, साफसफाई, पाणी व वीजबिल भरणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे करून घेणे यांचा समावेश आहे.

याशिवाय आध्यात्मिक व सामाजिक सेवांद्वारे पूजा-पाठ व पुरोहित सेवा, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना वाचन सेवा, गृहनिर्माण संस्थांमध्ये सचिव किंवा सल्लागार म्हणून कार्य करणे तसेच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी सहलींचे आयोजन करण्यासारख्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासोबतच आर्थिक स्वावलंबनास हातभार लागणार असून, “तुम्ही ठरवा, बाकी शिव उद्योग संघटना तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद (९८२०३१७१५०) यांनी व्यक्त केला आहे.

“गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” ने ॲड. सोपान बुडबाडकर सन्मानित

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र जनगौरव परिषद या संस्थेच्यावतीने शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी वांद्रे, मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ॲड. सोपान विठ्ठल बुडबाडकर (लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते) यांना “गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी राज्यपाल आंध्र प्रदेश) यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

या समारंभास राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे थेट चौदावे वंशज संभाजी राजे जाधवराव (इतिहास संशोधक), दैनिक ‘मुंबई मित्र’ चे संपादक व कामगार नेते अभिजित राणे, ‘जयऱ्या’ या आत्मचरित्राचे लेखक व कवी जयराम सोनावणे, तसेच मैत्री संस्था अध्यक्ष व मुक्त पत्रकार सूरज भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी साहित्यिक कवी ॲड. सोपान बुडबाडकर यांना आपल्या स्वरचित ‘कैदखाना कैफाचा’ या कवितेचे गायन करून सादरीकरण करण्याची संधी मिळाली. साहित्य, सामाजिक कार्य आणि वैचारिक योगदानाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून देण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

भडगांव येथील दर्शन विठ्ठल पाटील याची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ म्हणून हॅट्रिक

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित स्व. सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात दर्शन विठ्ठल पाटील याने साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्काराची सलग तिसऱ्यांदा (हॅट्रिक) पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

दर्शन पाटील याने शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास, तसेच विविध उपक्रमांतील सहभागाच्या जोरावर हा बहुमान मिळविला. सातत्याने तिन्ही वर्षे हा सन्मान मिळविणे ही संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब ठरली आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. श्री. हेरंब कुलकर्णी (शिक्षण तज्ज्ञ व ज्येष्ठ समाजसेवक) यांच्या हस्ते दर्शन पाटील यास सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्शनच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दर्शन विठ्ठल पाटील याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, सातत्य, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असा संदेश या हॅट्रिक यशातून मिळतो.

सलग तिसऱ्यांदा ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार पटकावणारा दर्शन विठ्ठल पाटील हा गुणवत्तेची हॅट्रिक करणारा भडगावचा विद्यार्थी.

गुजरातकडे जाणारे पाणी आता आपल्या शेतात नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला मुहूर्त; नाशिक–जळगावचा कायापालट.!!!

नाशिक प्रतिनिधी :-

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी व अतितुटीच्या भागांसाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला अखेर मुहूर्त लाभला आहे. जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४,११६ कोटी रुपयांची निविदा काढली असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनेला अखेर प्रत्यक्ष कामाची दिशा मिळाली आहे. या निर्णयामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील शेती, पिण्याचे पाणी आणि एकूणच जलव्यवस्थापनात आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नार, पार, औरंगा व अंबिका या चारही पश्चिमवाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. या नद्या पुढे गुजरातमार्गे वाहत अरबी समुद्रात मिळतात. पावसाळ्यात या नद्यांमधील मोठ्या प्रमाणावरील पाणी विनावापर समुद्रात वाहून जाते. हेच अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नार–पार–गिरणा नदी जोड योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय, आर्थिक व राजकीय कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावरच राहिला होता.

या प्रकल्पाअंतर्गत नार व पार नद्यांमधील एकूण १०.७६ टीएमसी (३०४.६० दशलक्ष घनमीटर) पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे. यापैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यांच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल, तर उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ७,४६५ कोटी रुपये इतकी आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ४,११६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाची रचना (डिझाइन) तसेच बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या ठिकाणी नऊ धरणांचे बांधकाम करण्यात येणार असून, या धरणांमधून पाणी उचलून ते बोगदे, कालवे आणि पाईपलाइनद्वारे गिरणा नदीत सोडले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कालवे, पाइप वितरण जाळे तसेच गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या पूरक कामांची निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.

या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरण परिसरातील ७,१७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पामुळे केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भूजल पातळी, ग्रामीण रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांनाही मोठी चालना मिळणार आहे. वर्षानुवर्षे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नुकताच निवडून आलेले प्रभाग क्र. ७ मधील अपक्ष नगरसेवक अलीम शाह यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील अपक्ष नगरसेवक अलीम शाह यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक लखीचंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रवेशामुळे भडगाव शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेच्या स्थानिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशानुसार अलीम शाह यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. शिवसेनेची शाल घालून व पक्षचिन्ह देत त्यांचा औपचारिक प्रवेश जाहीर करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेवक लखीचंद पाटील म्हणाले की, शिवसेना ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी चळवळ असून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. अलीम शाह यांचा अनुभव आणि व्यापक जनसंपर्क शिवसेनेस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षप्रवेशावेळी अलीम शाह म्हणाले की, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मोठ्या पातळीवर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्व व संघटित पक्षाची गरज असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ तसेच संपूर्ण भडगाव शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका समन्वयक युवराज आबा पाटील,  व शहर पदाधिकारी, नुकतेच निवडून आलेले प्रभाग क्रमांक ३ चे हॅट्रिक नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, नगरसेवक इमरान अली सय्यद, प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक हाजी खलील (मिस्त्री), हाजी अल्ताफ खाटीक,राजू शाह, रावसाहेब पाटील, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलीम शाह यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवरा–बायकोची विजयी जोडी दिग्गजांवर भारी भडगावमध्ये शिवसेनेची भक्कम आघाडी

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगांवच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विस्थापित तरुण नेते लखीचंद पाटील हे किंगमेकर ठरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यातून शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

 

या निवडणुकीत लखीचंद पाटील पुरस्कृत नगराध्यक्ष उमेदवाराने विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे. या सोबतच पाटील दाम्पत्यानेही निवडणूक जिंकत शहर भर लक्ष वेधून घेतले आहे. नवरा–बायको दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येण्याची घटना भडगावच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

 

लखीचंद पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मधून एकूण १३९१ मते मिळवत ६३४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात सर्वसामान्य नागरिक, युवक व महिलांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रचारात विकास, पारदर्शकता व सर्वसमावेशक राजकारण या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

 

दरम्यान, त्यांच्या पत्नी समीक्षा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. समीक्षा पाटील यांनी एकूण १३०१ मते मिळवत अवघ्या १४ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. विशेष म्हणजे, त्यांनी दिग्गज नेते प्रताप नाना पाटील यांच्या कन्येचा पराभव केला. हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पारंपरिक राजकारणाला मतदारांनी नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.

 

अवघ्या १४ मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मतमोजणीदरम्यान शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरात विजयाच्या घोषणा देत शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले.

या निकालामुळे भडगाव च्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आगामी काळात शहराच्या विकासासाठी शिवसेना आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लखीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहरात विकासाला गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!