भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी
कजगाव येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची संरक्षण भिंत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः कोसळलेल्या अवस्थेत असून, याकडे स्थानिक ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे कब्रस्तानाच्या पवित्रतेसह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सदर कब्रस्तानालगत असलेला रस्ता हा वर्दळीचा असून, रस्त्याच्या कडेला फेअर ब्लॉक बसविण्याची मागणी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कब्रस्तान परिसरात अतिक्रमण, जनावरांचा वावर तसेच अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे अल्पसंख्यांक मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण व विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामनिधीतून आवश्यक कामे करता येणे शक्य असतानाही, त्या निधीचा उपयोग न केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामस्थांच्या मते, निधी उपलब्ध असताना देखील केवळ दुर्लक्ष आणि उदासीनतेमुळे कामे रखडली आहेत.
स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील इतरही अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र होत असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीची उभारणी करावी तसेच कब्रस्तानालगतच्या रस्त्यावर फेअर ब्लॉक बसवून परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी कजगाव येथील नागरिक व अल्पसंख्यांक समाजाकडून करण्यात येत आहे.




Recent Comments