Home Blog Page 5

शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील भडगाव नगरपालिकेचे गटनेते.!!!

शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील भडगाव नगरपालिकेचे गटनेते.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ऐतिहासिक विजयामागे प्रभावी निवडणूक व्यवस्थापन, अचूक रणनीती आणि मजबूत संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरले असून, त्यात नगरसेवक लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.

निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन, उमेदवारांचा समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी तसेच कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम लखीचंद पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. याचा थेट लाभ शिंदे सेनेला मिळाला असून नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे भडगाव नगरपालिकेत शिवसेनेने ऐतिहासिक विजय नोंदविला आहे.

भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत लखीचंद पाटील यांनी एक सकारात्मक व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. याच जनाधाराचा लाभ पक्षाला निवडणुकीत मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नगरपालिकेतील गटनेता हा पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे, सर्वसाधारण सभा व समित्यांमध्ये पक्षाची भूमिका मांडणे, विकासकामांबाबत धोरण निश्चित करणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय ठेवणे तसेच नगरसेवकांच्या समस्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या गटनेत्यावर असतात.

गटनेतेपद हे मानाचे तसेच अत्यंत जबाबदारीचे पद असून, आगामी काळात भडगाव नगरपालिकेच्या कारभारात लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल आणि शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे साधनाई कलाविष्कार महोत्सव जल्लोषात संपन्न

भडगाव प्रतिनिधी:-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे नानासाहेब प्रतापराव हरि पाटील व डॉ.सौ.पुनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रेरणेने शाळेत साधनाई कलाविष्कार महोत्सव जल्लोषात संपन्न झाला. सर्वप्रथम अंश तहसीलदार व संकेत वाघ या आदर्श कन्या शाळेच्या दुर्घटनेतील विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लाडकुबाई शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे, रावसाहेब पाटील गटशिक्षणाधिकारी भडगाव, राजेश साळुंखे केंद्रप्रमुख भडगाव, श्री सुभाष सुपडु पाटील स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन भडगाव, श्रीमती वैशाली शिंदे प्राचार्या भडगाव,श्री एन.जी. पाटील मुख्याध्यापक महिंदळे, श्री एस.डी.पाटील मुख्याध्यापक शिंदी, श्री रवींद्र वळखंडे मुख्याध्यापक आमडदे माध्यमिक, श्री विलास पाटील मुख्याध्यापक आमडदे प्राथमिक, श्री अनिल पवार मुख्याध्यापक कोळगाव, श्री सुनील पाटील उपमुख्याध्यापक लाडकुबाई माध्यमिक, श्री निलेश तिवारी तालुकाध्यक्ष वकील संघ भडगाव, श्री बी.एन. पाटील मुख्याध्यापक अंजनविहिरे, श्री संदीप सोनवणे मुख्याध्यापक भातखंडे, श्री एस. पी. पाटील मुख्याध्यापक गिरड, श्रीमती विद्या पवार प्राचार्या इंग्लिश मीडियम भडगाव, सचिन सोमवंशी, दगडू सोनवणे, कोमल पाटील, गायत्री सोनार, प्रदीप राजपूत, मनोज माळी, ललित पाटील, दीपक पाटील, विकी नाना, प्रमोद सैंदाणे, दिलीप ठाकरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

मनस्वी अभिजीत सिसोदे, यशराज सचिन पाटील, निर्भय भास्कर तायडे, ममता सुनील पाटील,ओम निलेश तिवारी या विद्यार्थ्यांचा मंचावरील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आदर्श विद्यार्थी सन्मान सोहळा

अमन शेख, इशिता बडगुजर, रु्ही सैंदाणे,अंशरा मिर्झा, सानवी शिंदे, वेदांत ठाकरे, पूर्वा वाघ, मयुरी गुरव, प्रिन्स चव्हाण या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन आदर्श विद्यार्थी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हस्तलिखित बालरंग प्रकाशन सोहळा

मंचावरील मान्यवरांच्या हस्ते लाडकुबाई शाळेतील चिमुकल्यांचे बालरंग हस्तलिखित संकलित लेखांचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक केले. व लाडकुबाई शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.

रोमहर्षक आकर्षक नृत्यविष्कार

आई भवानी, झुकू झुकू गाडी, देशभक्तीपर गीते, पुष्पा मिक्स, वाडी वाडी ये, गोविंदा थीम, लाल ओढणी वाली, शकुंतला बाई मिक्स, बाप तो बाप रहेगा,सुंदरी सुंदरी, पंजाबी सॉन्ग, पावरी रिमिक्स, छावा नाट्य व नृत्य इत्यादी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यविष्कार सादर केला व उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनीता देवरे,अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, सचिन पाटील,हरिचंद्र पाटील,किरण पाटील, व शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या गंभीर जखमी.अर्ध्या तासात चार हल्ले; महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न.!!!

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या गंभीर जखमी.अर्ध्या तासात चार हल्ले; महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न.!!!

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांचा संताप, प्रशासनावर टीकेची झोड

.भडगाव ता.प्रतिनिधी : – आमीन पिंजारी

कजगाव शहरात गुरुवारी सायंकाळी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जैन मंदिर चौक व परिसरात अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत कुत्र्याने केलेल्या सलग हल्ल्यांत दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून दोन महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे कजगावमध्ये भीती, संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील फळविक्रेते अनिस मण्यार यांची आठ वर्षांची कन्या कशफिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हाताला चावा घेतला. रक्तस्राव होऊन ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कजगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.

या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्याच परिसरात घरासमोर खेळत असलेल्या समृद्धी सचिन भोसले (वय ५) या चिमुकलीवर त्याच कुत्र्याने हल्ला केला. तिच्या हाताला व पायाला चावा घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली. तिला तत्काळ चाळीसगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही कुत्र्याने हल्ला चढविला. मात्र, नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने त्या थोडक्यात बचावल्या. याच सुमारास आणखी एका महिलेवरही कुत्र्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दोन ते तीन तासांच्या कालावधीत तीन ते चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली.

कजगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तातडीने मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

रावेर शहरातील एका शाळा परिसरात लोंबकळत्या विद्युत तारा : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात.!!!

रावेर प्रतिनिधी

शहरातील डी.एम. मॅरेज हॉल समोर असलेल्या शाळा परिसरात महावितरणच्या विद्युत तारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या लोंबकळत्या तारांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे. महावितरणच्या सर्व्हिस लाईनच्या विद्युत तारा तब्बल १० ते १५ फूट खाली लोंबकळत असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे.

या रस्त्यावरून दररोज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. मात्र लोंबकळलेल्या तारांमुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्याच्या झोतासोबत या तारा जोरजोरात हलताना दिसतात. कधीही तुटून खाली पडतील, अशी धास्ती नागरिक व्यक्त करीत आहेत.

काही ठिकाणी तारा इतक्या खाली आहेत की उंच वाहन गेल्यास थेट संपर्क येण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे जीवघेणा अपघात घडू शकतो. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीकडे स्थानिक नागरिक व पालकांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महावितरणच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. शाळा परिसर असल्याने येथे लहान मुले, मुली, पालक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असताना महावितरणकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.अपघात घडण्याची वाट न पाहता महावितरण व प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून लोंबकळलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करावी व त्या सुरक्षित उंचीवर नेाव्यात, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या दरम्यान पत्रकार शेख शरीफ यांनी स्वतः महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोन  दिवस सातत्याने फोन करून शाळा परिसरात लोंबकळलेल्या विद्युत तारांची माहिती दिली व तातडीने तारांची उंची वाढवण्याची मागणी केली. मात्र तरीही महावितरणकडून कोणतीही हालचाल न झाल्याने “पत्रकारांचा फोन करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

अवैध वाळू चोरीच्या कारवाईस गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला.हुज्जतबाजी,धमकी आणि दगडफेक , जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!

पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा  दाखल

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना ३० तारखेला घडली. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील ऊर्फ आबा याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली. रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरड–मांडकी रस्त्यावर गिरणा नदीकडून येणारे एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाळूने भरलेले आढळून आले. वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र चालकांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

थोड्याच वेळात घटनास्थळी २० ते २५ अनोळखी इसम जमा झाले. दरम्यान पोलिस मदतीसाठी पोलीस कर्मचारी दाखल झाले असताना,काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या रितेश पाटील ऊर्फ आबा (रा. पाचोरा) याने महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धमकी दिली, धक्काबुक्की केली तसेच वाहन जप्तीला विरोध केला. त्याच्या साथीदारांनीही आरडाओरड, शिवीगाळ करत पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने जमाव पळून गेला.

यानंतर महसूल व पोलिस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली. जप्त मुद्देमालात १५ लाखांचे जेसीबी, २ लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर व किन्ही, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर व त्यातील वाळू असा एकूण ३७.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. अवैध वाळू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाडे मुक्कामे बस ५ ते ६ दिवसापासुन बंद.पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांचे भडगाव व पाचोरा आगारास निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

बंद बस सुरु करण्याची मागणी.भडगाव ते वाडे मुक्कामी एस. टी. बस ५ ते ६ दिवसापासुन काही कारणास्तव एस. टी. महामंडळाने अचानक बंद केलेली आहे. तरी वाडे मुक्कामी बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.प्रवाशांसह विदयार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन वाडे येथील नागरीक व दै. लोकमतचे पञकार श्री.अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक व पाचोरा आगारा प्रमुखांना दि. ३१ रोजी सायंकाळी ७ वाजता दिलेले आहे. यावेळी वाहतुक निरीक्षकांना भेटुन चर्चा केली. व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांना मुक्कामी बस बंदमुळे होणार्या हाल व ञास याबाबत व्यथा मांडल्या. व मुक्कामी बस फेर्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

भडगाव व पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, मी वाडे गावामार्फत प्रवाशी व विदयार्थी वर्गामार्फत नम्र विनंती करतो कि, आमचे गावाचे बस चालक व वाहकांना नेहमी सहकार्य असते. आमच्या वाडे गावाला भडगावच्या बसस्थानकातुन मुक्कामे येणारी बस काही कारणास्तव बंद करुन ५ ते ६ दिवस होत आहेत. मुक्कामे बस फेर्या बंद झाल्यामुळे प्रवाशी,

विदयार्थ्यांचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. वाडे गावात मुक्कामे बस न जाता गोंडगाव पर्यंतच बस जाते. गोंडगावहुन वाडे, बांबरुड प्र.ब, नावरे आदि गावांना जाण्यासाठी वृद्ध मंडळी, नागरीक, प्रवाशी, विदयार्थ्यांना ७ ते ८ कि. मी. अंतर पायी जाऊन अंधारात प्रवास करावा लागत आहे.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आठवडयात बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु होणार आहेत.तरी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. प्रवाशांना प्रवासाचा ञास होणार नाही. याची काळजी घ्यावी. संपुर्ण वाडे गावाच्या नागरीकांची मागणीची दखल घ्यावी.तात्काळ भडगाव ते वाडे मुक्कामी बस सेवा सुरु करावी ही विनंती आहे. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांची सही आहे.

भडगाव तालुका वकील संघात लोकशाहीचा निर्णायक कौल.!!!

भडगाव तालुका वकील संघात लोकशाहीचा निर्णायक कौल.!!!

‘बिनविरोध’ परंपरेला छेद देत ॲड. बी. आर. पाटील यांचा मतदानातून दणदणीत विजय

भडगाव  प्रतिनिधी :-

भडगाव तालुका वकील संघाच्या इतिहासात दि. ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला छेद देत यंदा प्रथमच थेट मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेतून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या ऐतिहासिक निवडणुकीत अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान पटकावला असून, भडगाव तालुका वकील संघात हा विक्रम प्रथमच नोंदवला गेला आहे.

दीर्घकाळापासून संघात सहमती, समेट आणि बिनविरोध निवडीद्वारे पदांची भर पडत होती. मात्र यावेळी संघातील सदस्यांनी लोकशाही प्रक्रियेचा आग्रह धरत मतदानाद्वारे नेतृत्व ठरवण्याचा निर्णय घेतला. मतदानाची जोखीम पत्करूनही अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांनी थेट सभासदांच्या कौलावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास बहुमताच्या रूपाने अधोरेखित झाला.

या निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य प्रमुख पदांसाठीही चुरस पाहायला मिळाली. उपाध्यक्षपदी ॲड. गणेश आर. वेलसे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संघातील तरुण नेतृत्वाला बळकटी दिली. सचिवपदी ॲड. प्रकाश जी. सोनवणे यांची निवड झाल्याने प्रशासनिक सुसूत्रता व कार्यक्षमतेचा संदेश संघाला मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत वकील संघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवला. ‘निर्णय प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत’ हे ठामपणे दाखवून देत सभासदांनी संघाच्या भविष्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. ही उपस्थिती संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या निवडणुकीकडे केवळ पदाधिकाऱ्यांच्या निवडीपुरते न पाहता संघटनात्मक नेतृत्वावर दिलेला विश्वासाचा कौल म्हणून पाहिले जात आहे. बिनविरोध परंपरेऐवजी लोकशाही मार्ग स्वीकारून भडगाव तालुका वकील संघाने इतर संघटनांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

ॲड. बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुका वकील संघ अधिक संघटित, पारदर्शक आणि सक्रिय होईल, अशी अपेक्षा वकील वर्गातून व्यक्त होत आहे.ही निवडणूक संघटनात्मक आत्मविश्वास, लोकशाही पुनरुज्जीवन आणि सक्रिय सहभागाचा जाहीरनामा ठरली आहे.

जि. प.उर्दू बाईज शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

जि. प.उर्दू बाईज शाळेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचे धडे; पालक-ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव येथील जि. प. उर्दू बाईज शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. पावभाजी, मुगभजी, सँडविच, खमंग ढोकळा, चिवडा, पाणीपुरी, शेवपुरी, आलू चाट, रसगुल्ला आदी स्वादिष्ट पदार्थांनी मेळाव्यातील वातावरण रंगून गेले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी विक्री, आर्थिक व्यवहार, ग्राहकांशी संवाद व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून व्यवहारज्ञान, संघभावना तसेच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली. शालेय स्तरावरच उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळाल्याने पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मेळाव्याला पालक, शिक्षक, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थिनींच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. उपस्थितांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भडगाव तालुका गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व वर्षा मॅडम उपस्थित होते. केंद्रप्रमुख खलील सर, प्रमुख पाहुणे हाजी एतबार खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीर मुजावर, अल्ताफ शेख, साबीर कुरैशी, इमरान कुरैशी, पत्रकार अबरार मिर्झा आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि. प. उर्दू बाईज शाळेचे मुख्याध्यापक जाहीद बेग सर व लुकमान सिद्दीकी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तबस्सुम बेगम सादिक अली,पटेल शिरीन, अमीर हमजा सय्यद, नसिरुद्दीन शेख तसेच जि.प.उर्दू कन्या शाळा नं.१ चे मुख्याध्यापक नईम शेख, हुजूर सर, अशफाक सर, इम्तियाज सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण मेळावा आनंदी, उत्साही व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

लेख – छडी, शब्द आणि संस्कार — शिक्षणाच्या वाटेवरील नाजूक समतोल

लेख – छडी, शब्द आणि संस्कार — शिक्षणाच्या वाटेवरील नाजूक समतोल

ग्रामीण भागातील त्या हतबल पण स्वाभिमानी बापाचं मनोगत ही केवळ एका व्यक्तीची भावनिक तक्रार नसून, आजच्या शिक्षणव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या अनेक मूलभूत प्रश्नांची प्रामाणिक साक्ष आहे. बदलत्या काळात शिक्षण, शिस्त, कायदा, संविधानिक मूल्ये, बालहक्क आणि मानवी संवेदनशीलता यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाचं ते जिवंत प्रतिबिंब ठरतं. एका बाजूला आपल्या लेकराचं भविष्य उजळावं म्हणून आयुष्य झिजवणारा कष्टकरी बाप उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला नियम, जबाबदाऱ्या आणि आरोपांच्या भीतीत काम करणारा शिक्षक. या दोघांच्या मध्ये उभं आहे ते कोवळं बालमन — अजून घडत असलेला, ओल्या मातीचा नाजूक गोळा.

 

त्या बापाच्या शब्दांत असहाय्यता आहे; मात्र त्याहून अधिक ठाम स्वाभिमानही स्पष्टपणे दिसून येतो. “छडी लागे छमछम, विद्या येई घमघम” या म्हणीतून तो हिंसेचं समर्थन करत नाही, तर शिस्तीचं महत्त्व अधोरेखित करतो. त्याच्या पिढीला दोन शब्दांचा धाक, चार शब्दांचं प्रेम आणि श्रमांची सवय या संतुलित मिश्रणातून घडवलं गेलं. त्यामुळेच आज तो समाजात ताठ मानेनं उभा आहे, अशी त्याची ठाम श्रद्धा आहे. त्याच्या दृष्टीने शिस्त म्हणजे दडपशाही नव्हे, तर जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी जीवनपद्धती आहे.

 

मात्र आजचा काळ पूर्णपणे बदललेला आहे. आजचं मूल केवळ आज्ञाधारक राहिलेलं नाही; ते प्रश्न विचारणारं, हक्कांची जाणीव असलेलं, भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील आणि स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणारं आहे. मोबाईल, समाजमाध्यमं, स्पर्धा, तुलना आणि आभासी जग यांचा प्रभाव बालमनावर खोलवर रुजलेला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेसाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी शासनाने घेतलेला निर्णय आवश्यक आणि स्वागतार्ह ठरतो. शारीरिक शिक्षेवर स्पष्ट मर्यादा घालून बालहक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, याबाबत कोणताही दुमत नाही.

 

तरीही एक महत्त्वाचा प्रश्न उरतो — या निर्णयांमुळे शिक्षक भयग्रस्त तर होत नाहीत ना? शिक्षक हे केवळ अभ्यास शिकवणारे कर्मचारी नसून, शाळेला ‘दुसरं घर’ बनवणारे मार्गदर्शक असतात. मात्र सतत संशय, तक्रारी, चौकशी आणि कायदेशीर कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असेल, तर त्यांच्या मानसिक स्थैर्यावर अपरिहार्यपणे परिणाम होतो. या भीतीमुळे शिक्षक–विद्यार्थी नात्यातील विश्वास हळूहळू ढासळतो आणि हा विश्वासभंग दीर्घकाळात संपूर्ण शिक्षणप्रक्रियेलाच पोखरू शकतो, ही बाब गांभीर्याने विचारात घेणं अत्यावश्यक आहे.

 

याच पार्श्वभूमीवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नियमित संवादाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होतं. शिक्षक आणि पालक सतत संपर्कात राहिल्यास विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि आत्मविश्वासयुक्त राहतो. पालक शिक्षकांना मुलाच्या वर्तन, आवडीनिवडी आणि अडचणींबाबत माहिती देतात, तर शिक्षक पालकांना मुलाच्या शैक्षणिक प्रगती, सामाजिक वर्तन आणि मानसिक स्थितीबाबत योग्य दिशा देतात. या परस्पर संवादामुळे गैरसमज कमी होतात, शिक्षणातील त्रुटी वेळेत दुरुस्त करता येतात आणि शिक्षकांवर अपेक्षा व कायदेशीर दबाव यांचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

 

हेही तितकंच सत्य आहे की शारीरिक शिक्षा मुलांच्या मनावर खोल जखमा करू शकते. भीतीतून निर्माण होणारी शिस्त क्षणिक असते; तर समजुतीतून, संवादातून आणि जबाबदारीतून घडणारी शिस्त दीर्घकाळ टिकणारी ठरते. म्हणूनच आधुनिक शिक्षणपद्धतीत “परिणामाधारित शिस्त” महत्त्वाची मानली जाते — चूक केल्यावर मार नव्हे, तर त्या चुकीचे परिणाम समजावून देणे. मुलाला स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारायला शिकवणं हाच खऱ्या शिक्षणाचा गाभा आहे.

 

ग्रामीण बाप शेतातील पिकाचं उदाहरण देतो, ते अत्यंत बोलकं आणि अर्थपूर्ण आहे. वेळेवर तण काढलं नाही, तर पीक नासतं; पण अति खुरपणी केली, तर पीकही उखडून जातं. शिक्षणातही शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा नाजूक समतोल साधणं हेच आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. संवाद, समुपदेशन, स्पष्ट नियम, योग्य वेळी प्रामाणिक कौतुक आणि आवश्यक तेथे संयम — हेच खरे संस्कार होत. संस्कार म्हणजे केवळ शिस्त नव्हे; तर मूल्ये, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव.

 

शिक्षण ही शिक्षक–पालक–विद्यार्थी–शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. एका शाळेत शिक्षकाने रागावून हात उगारण्याऐवजी चूक केलेल्या मुलाला वर्गानंतर शांतपणे बसवून विचारलं, “तू हे का केलंस?” — त्या एका प्रश्नानं मुलाचं डोकं खाली झुकलं; शिक्षा नव्हे, तर अपराधबोध जागा झाला. त्या मोलमजुरी करणाऱ्या बापाची अंतिम मागणीही साधी, पण खोल आहे — “माझं पोरगं माणूस म्हणून घडवा.” शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ नोकरी मिळवणं नसून, सजग, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडवणं हा आहे. शिक्षण म्हणजे मार किंवा मोकळीक यांपैकी एक निवडणं नव्हे; तर माणुसकीच्या चौकटीत शिस्त, स्वातंत्र्य, अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल साधणं होय — हाच खरा संस्कार.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : ३०/१२/२०२५ 

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत एस.के.पवार विद्यालयाचा देशातून पाचवा क्रमांक

पाचोरा ता. प्रतिनिधी :-

नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध कला उत्सव स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये दिनांक २० ते २३ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांसाठी देशातील विविध राज्यातील तसेच केंद्र शासित प्रदेशातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील गौरव विनोद मिस्तरी व पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी या विद्यार्थ्यांनी देशातून पाचवा क्रमांक पटकावत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या कला उत्सव स्पर्धेत शिल्पकला या कला प्रकारातून आपले विद्यार्थी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत होते. त्यांनी “लाकडी ट्रॅक्टर, जेसीबी, पांगुळगाडा, विटीदांडू, बाबागाडी, बळीराम नांगर व दुशर,” तयार केली होती.महाराष्ट्र राज्याला प्रथमच हा मान मिळाला ही गौरवाची बाब आहे.आय. ए.एस.अधिकारी मंगेश दोषी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संपूर्ण उपकरणांची माहिती जाणून घेतली.या विद्यार्थ्यांना प्रा उमेश काटकर व प्रा एस एच जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा चेअरमन सुभाष थेपडे मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ,

तसेच प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही बी गहरवाल, पर्यवेक्षक वाय डी ठाकूर, डी पी राजपूत व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

 

ठळक मुद्दे

सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांनी या कला प्रकारात संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

 

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारी सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा ही जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली.

सादरीकरणातून सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा यांना राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळाला.

पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी व गौरव विनोद मिस्तरी यांना प्रा.उमेश काटकर व प्रा.एस.एच.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरदेवळ्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचाविल्यामुळे येथिल कृषीउदयोजक, प्रणय भांडारकर यांनी विद्यालयासह यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित केले, सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून विविध राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व कला प्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव

error: Content is protected !!