Home Blog Page 4

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भडगाव तालुका यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना ‘गिरणा नवरत्न पुरस्कार’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासह परिसरातील पर्यावरण, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या समारंभाला भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार अनिल भामरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राजेंद्र निकम यांच्यासह भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांचे पती प्रदीप (जहांगीर) मालचे तसेच नगरसेवक विजयकुमार भोसले, अतुलसिंह परदेशी, सचिन चोरडिया,अलीम शहा (छोटे सरकार), इम्रानअली सय्यद, शशीकांत येवले, साप्ताहिक महाराष्ट्र चौफेर चे मुख्यसंपादक अबरार मिर्झा, निलेश मालपुरे, मा नगरसेविका तथा फ्रुट सेल  सोसायटी चे संचालिका योजना ताई, फ्रुट सेल  सोसायटी चे संचालक प्रभाकर शामराव पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सकारात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माउली फाउंडेशनच्या वतीने संगिता जाधव, उद्योजक दिलीप शेंडे, धैर्य कॉम्प्युटेकचे संचालक महेंद्र अहिरराव, अंबिका कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय पाटील, इंदुमती ट्रेडर्सचे संचालक नाना चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.

कार्यक्रमास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, तालुका सचिव यशकुमार पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

पत्रकारितेचा दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर आणि आजचा पत्रकार

 

अबरार मिर्झा

_महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पत्रकारांचा सन्मान करण्याचा सोहळा नसून, समाजातील पत्रकारितेच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि निर्भीड पत्रकारितेच्या परंपरेचा पुनरुच्चार करतो.

इ.स. १८३२ साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजप्रबोधनाची मशाल पेटवली. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात सत्य मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे धाडसाचे काम होते. मात्र जांभेकरांनी ज्ञान, विज्ञान, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहित या विषयांना प्राधान्य देत पत्रकारितेला दिशा दिली. त्यांनी पत्रकारितेला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाजशिक्षणाचे प्रभावी साधन बनवले.

आजच्या काळात पत्रकारितेची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. छापील माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी माहितीचे स्वरूप बदलले आहे. माहिती क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचते; मात्र त्याचबरोबर अफवा, अर्धसत्य आणि सनसनाटीपणाचे आव्हानही वाढले आहे. अशा परिस्थितीत पत्रकाराची जबाबदारी अधिक कठीण आणि अधिक महत्त्वाची बनली आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करतो. सामान्य नागरिकांचे प्रश्न, दुर्लक्षित घटकांचे दुःख, भ्रष्टाचार, अन्याय या सर्व बाबी समाजासमोर निर्भीडपणे मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य पार पाडताना सत्यनिष्ठा, निष्पक्षता आणि सामाजिक भान जपणे अत्यावश्यक आहे.

आज व्यावसायिक स्पर्धा, टीआरपी, लाईक्स-व्ह्यूज यांच्या दबावाखाली पत्रकारितेची नैतिकता धोक्यात येत असल्याची टीका होत आहे. अशा वेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांकडे पाहणे गरजेचे ठरते. त्यांनी पत्रकारितेला मूल्यांची बैठक दिली होती. त्या मूल्यांची जपणूक करणे ही आजच्या पत्रकारांसमोरील खरी कसोटी आहे.

पत्रकार दिन हा केवळ अभिनंदनाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय योगदान देत आहोत? आपली लेखणी सत्याच्या बाजूने आहे का? दुर्बलांच्या आवाजाला आपण व्यासपीठ देतो आहोत का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा दिवस आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेत, बदलत्या काळाशी जुळवून घेत सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पत्रकारितेचा दीपस्तंभ उजळवत ठेवण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक पत्रकारावर आहे._

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ. सुनीता किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार हाजी अबुलेस आलाउद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील मुस्लिम नगरसेवक, समाजसेवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. पाटील यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, सलोखा व विकासाभिमुख प्रशासन या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष सौ. सुनीता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व पायाभूत विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सौ. पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

शब्दांची जबाबदारी आणि काळाची हाक

शब्दांची जबाबदारी आणि काळाची हाक

 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केवळ साहित्यिक मंच व्यापला नाही, तर समकालीन समाजमनालाही अंतर्मुख होण्यासाठी एक प्रबोधनात्मक, जबाबदार आणि मूल्यकेंद्री आव्हान दिले. सुप्रसिद्ध कादंबरीकार व ऐतिहासिक कथालेखक म्हणून मराठी वाङ्मयात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांची निवड केवळ साहित्यिक कर्तृत्वासाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक जाणिवा असलेला विचारवंत म्हणून झाली होती, हे त्यांच्या भाषणातील आशयातून प्रकर्षाने जाणवते. त्यांनी शब्द हे केवळ सौंदर्यनिर्मितीचे साधन नसून समाजपरिवर्तनाची नैतिक जबाबदारी वाहणारे प्रभावी अस्त्र आहे, ही भूमिका ठामपणे मांडली. साहित्य हे काळाचे केवळ प्रतिबिंब न राहता दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे असावे, असा सूचक विचार त्यांच्या भाषणातून सातत्याने व्यक्त होत राहिला. मराठी साहित्याची परंपरा ही केवळ गौरवगाथांची मालिका नसून संघर्ष, प्रश्न, परिवर्तन आणि सत्यशोधनाची अखंड प्रक्रिया आहे, हे सांगताना त्यांनी संतपरंपरा, शाहिरी वाङ्मय, समाजसुधारक, दलित साहित्यिक आणि आधुनिक विचारवंतांची वैचारिक साखळी उलगडली. भाषणात भावनांचा आवेश होता; मात्र त्याहून अधिक बौद्धिक शिस्त, वैचारिक प्रामाणिकता आणि सामाजिक भान प्रकर्षाने जाणवत होते. वेगवान, तंत्रज्ञानप्रधान काळात साहित्याची उपयुक्तता काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले की माणूस जेव्हा माणूसपण हरवू लागतो, तेव्हा साहित्यच त्याला स्वतःकडे पाहण्याचा आरसा दाखवते. त्यामुळे साहित्यसंमेलन हे केवळ उत्सव नसून सामूहिक आत्मपरीक्षणाची जिवंत प्रक्रिया आहे, ही जाणीव त्यांच्या भाषणातून ठळकपणे अधोरेखित झाली.

 

मराठी भाषेची सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जबाबदारी हा ९९व्या संमेलनातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला. संमेलनाध्यक्षांनी स्पष्ट केले की भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून समाजाची सामूहिक स्मृती, मूल्यव्यवस्था आणि अस्मिता जपणारी सजीव शक्ती आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात भाषा उपयुक्ततेच्या निकषांवर मोजली जात असताना, मराठीने आपल्या मुळाशी असलेली नाळ तोडू नये, असा सजग इशारा त्यांनी दिला. भाषा आणि संस्कृती यांचे नाते नदीसारखे असल्याचे प्रतिमात्मक वर्णन करत त्यांनी सूचित केले की नदी वाहते, बदलते, नवे प्रवाह स्वीकारते; मात्र उगम विसरल्यास ती कोरडी पडते. या विचारातून परंपरेचे भान राखत आधुनिकतेचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित होते. मराठी साहित्याने लोकभाषा, बोली, ग्रामीण व आदिवासी संवेदना आत्मसात करत लोकजीवनाशी नाते टिकवले आहे, याची त्यांनी विशेष दखल घेतली. भाषेतील शुद्धता केवळ व्याकरणिक काटेकोरपणात नसून आशयाच्या प्रामाणिकतेत असते, हा सूक्ष्म पण मूलभूत विचार त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने पुढे आला. विद्यार्थ्यांनी भाषा केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न ठेवता विचारांची शिस्त, सांस्कृतिक जाणीव आणि संवेदनशीलता विकसित करणारे माध्यम म्हणून आत्मसात करावी, असा सूचक संदेश या भाषणातून सातत्याने उमटत राहिला.

 

अध्यक्षीय भाषणाचा वैचारिक गाभा म्हणजे साहित्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा अटळ व अविभाज्य संबंध होय. तटस्थतेच्या नावाखाली मौन धरणे हेही एक प्रकारचे सामाजिक अपराधीपण आहे, असा सूचक पण ठाम विचार त्यांनी मांडला. भाषा, जात, वर्ग, लिंग, आर्थिक विषमता, स्थलांतर, ग्रामीण व आदिवासी जीवनातील प्रश्न, पाणीटंचाई, आरोग्यसेवांची दरी, शिक्षणातील असमानता, पर्यावरणीय संकटे आणि बदलते श्रमसंबंध यांसारख्या समकालीन वास्तव प्रश्नांपासून साहित्याने पळ काढू नये; उलट, या प्रश्नांना शब्द देणे हेच साहित्याचे खरे कर्तव्य आहे, हा विचार त्यांच्या भाषणाचा वैचारिक कणा ठरला. दलित-बहुजन साहित्याने संविधानिक मूल्यांच्या आधारावर उभे केलेले संघर्षपर साहित्य समाजपरिवर्तनाची दिशा दाखवणारे ठरले आहे, याची त्यांनी ठळक नोंद घेतली. इतिहासातील अनेक साहित्यिक उदाहरणांचा संदर्भ देत त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले की जेव्हा साहित्याने खोल प्रश्न विचारले, तेव्हाच समाजाने स्वतःकडे पाहण्याचे धैर्य केले. संवेदनाविरहित प्रबोधन कोरडे ठरते आणि विचारांशिवायची भावना दिशाहीन होते; म्हणून साहित्यिकाने भावना आणि विवेक यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे, हा संदेश त्यांच्या भाषणातून ठामपणे व्यक्त झाला.

 

शिक्षणव्यवस्था आणि साहित्य यांचे नाते हा संमेलनातील आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणून पुढे आला. साहित्य हे केवळ अभ्यासक्रमातील घटक न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचे प्रभावी साधन आहे, हे संमेलनाध्यक्षांनी ठामपणे मांडले. आजच्या परीक्षाभिमुख शिक्षणपद्धतीत संवेदनशीलता, मूल्यनिष्ठा, स्त्री-पुरुष समता, सामाजिक न्याय, पर्यावरणीय जाणीव आणि चिकित्सक विचार यांना दुय्यम स्थान मिळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. साहित्य विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवते, सहानुभूती विकसित करते, वंचित घटकांचे अनुभव समजून घेण्याची दृष्टी देते आणि मतभिन्नतेचा सन्मान करायला शिकवते, हा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केला. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे न राहता साहित्याच्या माध्यमातून संवाद घडवणारे, विचारप्रवर्तक मार्गदर्शक व्हावे, असे सूचक आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीला केवळ माहिती नव्हे, तर मूल्यांची दिशा देणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे, ही जाणीव या विचारातून ठळकपणे पुढे आली.

 

तंत्रज्ञान आणि साहित्याच्या भविष्यासंदर्भातील विचारही त्यांच्या भाषणाचा एक ठळक आणि समकालीन भाग ठरला. डिजिटल माध्यमांनी वाचनाच्या सवयी बदलल्या असल्या तरी वाचनाची गरज संपलेली नसून ती अधिक तीव्र झाली आहे, असा स्पष्ट दृष्टिकोन त्यांनी मांडला. ब्लॉग, पॉडकास्ट, ई-पुस्तके, ग्राफिक नॅरेटिव्ह यांसारख्या नव्या साहित्यप्रकारांकडे धोका म्हणून नव्हे, तर नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी म्हणून पाहावे, असा सूचक विचार त्यांच्या भाषणातून पुढे आला. विशेषतः सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव, तात्काळ प्रतिसाद देण्याची मानसिक सक्ती, तुलना आणि दृश्य-लोकप्रियतेची स्पर्धा या डिजिटल संघर्षांमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला सखोल वाचनाची शांत जागा साहित्यच देऊ शकते, हे त्यांच्या विचारातून स्पष्ट झाले. तंत्रज्ञान हे शत्रू नसून साधन आहे; मात्र त्या साधनाचा वापर कोणत्या मूल्यदृष्टीने केला जातो, हे अधिक महत्त्वाचे आहे, असा ठाम आग्रह त्यांनी धरला. झटपट लोकप्रियता आणि अल्गोरिदमप्रधान वाचनसंस्कृतीच्या काळात दीर्घकालीन साहित्यिक मूल्यांची जपणूक करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाषांतर साहित्याच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक संवादात सहभागी होऊ शकते, हा दूरदृष्टीपूर्ण विचारही त्यांनी मांडला.

 

साहित्यिकांची भूमिका, संस्थात्मक जबाबदाऱ्या आणि आत्मपरीक्षण यांवरही संमेलनाध्यक्षांनी विशेष भर दिला. लेखक हा समाजाचा संवेदनशील घटक असून पुरस्कार, प्रसिद्धी आणि व्यासपीठांपेक्षा लेखनाची प्रामाणिकता अधिक महत्त्वाची आहे, हा विचार त्यांनी निर्भीडपणे मांडला. साहित्यिक संस्था, संमेलने, प्रकाशक आणि नियतकालिकांनी नवोदित लेखकांना व्यासपीठ, मार्गदर्शन, वैचारिक सुरक्षितता आणि चिकित्सक संवादाची संधी द्यावी, असे त्यांनी सुचवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि आत्मसंयम यांचा समतोल राखणे ही साहित्यिकांची नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. वाचकांशी प्रामाणिक संवाद साधणे आणि सतत आत्मपरीक्षण करणे हीच साहित्यिकाची खरी कसोटी आहे, हा संदेश त्यांच्या भाषणाचा नैतिक कणा ठरला.

 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप आशा, जबाबदारी आणि भविष्यदृष्टीच्या प्रकाशाने उजळलेला होता. सामाजिक असमानता, पर्यावरणीय संकटे, सांस्कृतिक ताणतणाव आणि बदलते जीवनप्रवाह असूनही साहित्याची भूमिका संपलेली नाही; उलट ती अधिक जबाबदार, व्यापक आणि मानवी झाली आहे, असा ठाम विश्वास संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. साहित्य माणसाला माणूस बनवते, त्याला प्रश्न विचारायला, स्वप्ने पाहायला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहायला शिकवते, हा विचार या संपूर्ण भाषणाचा सारांश ठरतो. साध्या वाचकापासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनाला समृद्ध करणारी ही दृष्टी काळाच्या पलीकडे जाणारी असली, तरी वर्तमानाशी घट्ट नाते सांगणारी आहे. म्हणूनच हे अध्यक्षीय भाषण आणि त्यातून साकारलेला विचार मराठी साहित्याच्या वाटचालीतील एक दिशादर्शक, प्रेरणादायी आणि मूल्यकेंद्री क्षण ठरतो.

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक : ०५/०१/२०२५

भडगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातील २ डंपर फरार की,तहसीलदारांच्या आशीर्वादाने सोडले ? कायद्याला हरताळ.

भडगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातील २ डंपर फरार की,तहसीलदारांच्या आशीर्वादाने सोडले ? कायद्याला हरताळ.

कायद्याचे नियम धाब्यावर; जिल्हाधिकारीही न्यायालयात “आवश्यक पक्षकार” होण्याची शक्यता

 

भडगांव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणात गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आय.पी.सी कलम ३५३, ३७९,महसूल अधिनियम, MMDR Act तसेच सार्वजनिक शांतता भंगास कारणीभूत गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल होऊन कारवाई सुरू असतानाच जप्त करण्यात आलेले २ डंपर दंड भरून किंवा दंडन न भरता प्रशासकीय स्तरावर सोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महसुल प्रशासनाने भडगांव पोलिसात गुन्हा दाखल केल्या नंतर मुद्देमाल पोलिसाच्या ताब्यात न दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे,संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी अद्याप फरार असून तपास सुरू असताना आणि न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता ही कारवाई झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कायदा तज्ज्ञांच्या मते, वरील गुन्हे non-compoundable स्वरूपाचे असून अशा प्रकरणात वाहन सोडण्याचा अधिकार केवळ सक्षम न्यायालयालाच आहे. मात्र,या प्रकरणात न्यायालयीन आदेशा शिवाय डंपर सोडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तक्रारीनुसार, कारवाई दरम्यान महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांशी आरोपी व त्याच्या समर्थकांनी वाद, हुज्जत घातली. त्यामुळे तणावपूर्ण आणि दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. तरीही जप्त वाहन सोडण्यात आल्याने अवैध वाळू माफियांना थेट बळ मिळाल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणी ACB जळगाव/नाशिक विभागाकडे IPC कलम 166, 217, 218 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 व 13 अंतर्गत कडक तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि आरोपींना लाभ पोहोचवल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात JMFC न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल होणार असून, तहसीलदारांसह जिल्हाधिकारी यांनाही न्यायालयात “आवश्यक पक्षकार” करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयांची न्यायालयीन छाननी अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

अवैध वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का?”, “कायदा-सुव्यवस्था धोक्यात घालणाऱ्या निर्णयांची जबाबदारी कोणाची?” असे प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ACB चौकशी आणि न्यायालयीन कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोंडगाव विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी.!!!

गोंडगाव विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री.बी. जी. ननावरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे सर हे होते. सुञसंचालन इयत्ता नववीच्या विदयार्थीनी सायली पाटील व प्राची पाटील यांनी केले. तसेच यावेळी विदयालयातील मुला, मुलींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. आर. महाजन या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. दत्तु मांडोळे, श्री. मनोज पाटील हे ही कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी श्री. दत्तु मांडोळे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षिय मनोगतातुन विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर अनमोल असे विचार मांडले.आभार श्री. एस. डी. चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी.जी. ननावरे, श्री. सी. एस. सोन्नीस, श्री. एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. आर. पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. पी. व्हि. सोळंके, श्री. बी. डी. बोरसे, श्री. एस. एस. आमले, श्री. आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, श्री. एन. ए. मोरे, श्री. पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल. मोरे, श्री. व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर.भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर.भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

 

भडगाव प्रतिनिधी :-

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड, भडगाव येथे संपन्न झाली.

या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचीत भडगाव तालुका अध्यक्ष पदी विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष पदी पंकज पाटील, सचिवपदी नरेंद्र तुळशीराम भोसले, कार्याध्यक्षपदी अमीन पिंजारी, तालुका संघटक पदी आत्माराम पाटील, सहसचिव लक्ष्मण पाटील, संपर्कप्रमुख निलेश पाटील तसेच शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे, सल्लागार पदी अशोक परदेशी यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारीणी सदस्य शरद पाटील, दिलीप पाटील, गणेश शिवराम अहिरे, किशोर वराडे, संजय कोतकर, आनंद महाजन, रवींद्र पाटील, आबा बैरागी, रविंद्र जुगराज पाटील, संजय सोनार , प्रमोद बैरागी आदींची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सहसंघटक संजय महाजन उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र पाटील, सतीष मधुकर पाटील सहकार्य लाभले.

यावेळी सर्व उपस्थित पञकार पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते श्री.साईबाबांची आरती करण्यात आली. श्री.साईबाबांचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. तसेच येणाऱ्या ६ जानेवारी २०२६ पत्रकार दिनानिमित पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच संघटना बांधणीतसाठी चर्चा करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांनी सर्व नूतन पदाधिकारी व सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

या बैठकीत सुचक अशोक परदेशी यांनी व अनुमोदक म्हणून नरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेवाळे यांनी केले तर आभार पंकज पाटील यांनी मानले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऊर्जा दीदी’; ग्रामीण महिलांच्या हातून सौरऊर्जेचा विस्तार

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऊर्जा दीदी’; ग्रामीण महिलांच्या हातून सौरऊर्जेचा विस्तार

पाचोरा–भडगाव तालुक्यात घराघरावर सौरऊर्जेचा उजेड

पाचोरा  भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा व भडगाव तालुक्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘ऊर्जा दीदी’ या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत असून महिलांना रोजगार, स्वावलंबन व सामाजिक सन्मान मिळत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

रूट (ROOT) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या ऊर्जा दीदी घराघरात जाऊन सौरऊर्जेबाबत जनजागृती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल पाटील यांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या बसविण्यात आला. काही दिवसांपूर्वी तांत्रिक पथकातील तंत्रज्ञ अजय यांनी ऊर्जा दीदींसह विठ्ठल यांच्या घराच्या छताची पाहणी केली. छताची मजबुती, सावलीची अडचण व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

यानंतर ऊर्जा दीदींनी विठ्ठल यांच्या पत्नी लक्ष्मी यांना सौर सिस्टिमचा खर्च, शासनाकडून मिळणारी सबसिडी, बँक कर्जाची सोपी प्रक्रिया तसेच भविष्यात वीजबिलात होणारी मोठी बचत याबाबत सविस्तर माहिती दिली. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर ही गुंतवणूक घरासाठी फायदेशीर असल्याची खात्री पटल्याने विठ्ठल व लक्ष्मी यांनी सोलर सिस्टिमची ऑर्डर निश्चित केली.

संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने करण्यात आला. पेमेंट केल्यानंतर अधिकृत पावती देण्यात आली. ऊर्जा दीदींच्या प्रामाणिक व विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे.

काही दिवसांतच विठ्ठल यांच्या घरासाठी लागणारे सौर पॅनल व इतर साहित्य घेऊन मोठा ट्रक गावात दाखल झाला. राहुल या डिलिव्हरी कर्मचाऱ्याने साहित्य उतरवले. ऊर्जा दीदी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक साहित्याची तपासणी करून खात्री करून घेतली.

त्यानंतर इन्स्टॉलेशनचे काम सुरू झाले.अजय व त्यांच्या पथकाने सर्व सुरक्षा नियम पाळत हेल्मेट व सेफ्टी बेल्टचा वापर करून छतावर सौर पॅनल बसवले. ऊर्जा दीदी खाली उभी राहून संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून होत्या. सर्व जोडण्या पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी यांना मुख्य स्विच सुरू करण्यास सांगण्यात आले. स्विच ऑन होताच घरात सौरऊर्जेवर वीजपुरवठा सुरू झाला. त्या क्षणी लक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.

काम पूर्ण झाल्यानंतर ऊर्जा दीदींनी पॅनलची स्वच्छता, देखभाल व काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल क्रमांकही दिला.

दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की,“महिला सक्षमीकरण केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवायचे आहे. महिलांना रोजगार, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास मिळाल्यास त्या स्वतःचा व समाजाचा विकास करू शकतात. पाचोरा–भडगाव तालुक्यातील प्रत्येक घरावर सौरऊर्जा पोहोचवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.”

या उपक्रमासाठी संपुर्ण सोलराईज प्रा. लि. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.प्रशांत जाधव तसेच ॲड.दिपक बोरसे पाटील, श्री.विशाल सावकारे ,सौ. कामिनी पाटील यांनी ROOT (मूळ), ऊर्जा दीदी योजने संबंधी संकल्पना मांडली आणि तांत्रिक माहिती दिली त्यासाठी श्री. मयूर पाटील,संदीप पाटील,धीरज पाटील, चेतन पाटील,.विवेक बडगुजर,जमाल एस कासार ,आकाश कोळी यांनी सहकार्य केले.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना नवे उत्पन्नाचे साधन मिळत असून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढत आहे. ऊर्जा दीदींनी ग्रामीण महिलाही तंत्रज्ञानाच्या मदतीने घराघरात उजेड निर्माण करू शकतात, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.

भडगावमध्ये महिलाराज्याचा ऐतिहासिक अध्याय”नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्यात महिला सशक्तीकरणाचा ठाम निर्धार.!!!

भडगावमध्ये महिलाराज्याचा ऐतिहासिक अध्याय”नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्यात महिला सशक्तीकरणाचा ठाम निर्धार.!!!

भडगाव |प्रतिनिधी :-

भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांच्या पदग्रहण सोहळ्याने भडगावच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय रचला. सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता आणि कोणत्याही पुरुषांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

 

या सोहळ्यास आमदार किशोर आप्पा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभाऊ पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक-नगरसेविका, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार उपस्थित होते.

 

महिलांचे नेतृत्व – भडगाव व पाचोर्‍यात महिलाराज्य

 

यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा यांनी सांगितले की, पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये महिलाच नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या असून हा महिलांच्या सामाजिक व राजकीय सशक्तीकरणाचा मोठा विजय आहे.

“जर सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली नसती, तर आज महिला नगरसेविका आणि नगराध्यक्ष दिसल्या नसत्या,” असे त्यांनी नमूद केले.

महिला बचत गटांसाठी शाश्वत उत्पन्नावर भर

महिला बचत गटांच्या कार्याबाबत बोलताना आमदार किशोर आप्पा म्हणाले की, वडे-पापड, शेवया, मसाले यांसारखे उद्योग महत्त्वाचे असले तरी त्यापुरते मर्यादित न राहता महिलांना दरमहा किमान १० ते १५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळेल असे नवे रोजगार मॉडेल उभे करणे आवश्यक आहे.

जळगाव येथे महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खाऊ गल्ली’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी भडगावमध्येही महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.

‘ऊर्जा दीदी’ उपक्रमातून रोजगार

महिलांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऊर्जा दीदी’ उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवण्याच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाकडून सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. उर्वरित कामातून महिला बचत गटांना थेट उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘लखपती दीदी’ घडवण्याचा संकल्प

“प्रत्येक महिला बचत गट आणि प्रत्येक दीदी लखपती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार किशोर आप्पा यांनी व्यक्त केला. महिलांमध्ये काम करण्याची तयारी, कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास असल्यास त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अशक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भडगावकर जनतेचे अभिनंदन

या निवडणुकीत जाती-धर्माच्या राजकारणाला नकार देत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करणाऱ्या भडगावकर जनतेचे आमदार किशोर आप्पा यांनी विशेष अभिनंदन केले.

“झोपडीत राहणाऱ्या एका सामान्य महिलेला भडगाव शहराच्या नगराध्यक्षपदी बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय जनतेने घेतला आहे,” असे ते म्हणाले.

विकासाची ग्वाही

नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील व सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक, प्रामाणिक व विकासाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली.

या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यामुळे भडगावमध्ये महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली असून महिला सशक्तीकरणाचा संदेश संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे.

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य व ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोरा–भडगावचे आमदार ना. किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ललिता ताई पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, गटनेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत जनतेच्या विश्वासावर ऐतिहासिक विजय मिळवला. विविध पक्षांनी एकत्र येऊनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना रोखण्यात अपयश आले. शिवसेनेला पाचोरा नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “हा विजय दादागिरीचा किंवा सत्तेच्या मस्तीचा नसून विकास, विश्वास आणि शांततेचा विजय आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात अशी कामगिरी करावी की पुढील निवडणुकीत नागरिक स्वतः त्या नगरसेवकाची मागणी करतील.” त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत महिला बचत गटांसाठी ‘ऊर्जा दीदी’ सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती दिली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “या विजयामध्ये ८० टक्के योगदान महिलांचे आहे,” असे सांगत त्यांनी पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाचोरा शहराला मुबलक आणि शुद्ध पाणी देणारी नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या विजयाचे अभिनंदन करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “राज्य शासनाच्या माध्यमातून पाचोरा शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या पदग्रहण सोहळ्यात महिला बचत गटांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक स्वावलंबनाच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बँक कर्ज, शासकीय अनुदान व प्रत्यक्ष कामाच्या संधी उपलब्ध करून महिलांना सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-भगिनी, शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर शिवसेनेच्या घोषणांनी व जल्लोषाने दुमदुमून गेला. पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात हा पदग्रहण सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

error: Content is protected !!