मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला कला आणि वाणिज्य महाविद्यालयात एल. एन. शाह फाउंडेशन, रावजी फाइन फ्रेगरेंसेस प्रा. लि. आणि ‘जिओ रोटी घर’चे संस्थापक लायन राजेश रसिकलाल शाह यांच्या सौजन्याने नवी एनएसएस संगणक प्रयोगशाळेचे अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या प्रयोगशाळेसाठी १७ संगणक, १ प्रिंटर आणि नेटवर्किंग प्रणाली अशी एकूण रु. ७,९०,००० किंमतीची उपकरणे दान करण्यात आली.
या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन दाते ललित रावजी, तरुण रावजी, ‘जिओ रोटी घर’चे संस्थापक राजेश रसिकलाल शाह तसेच प्रमुख अतिथी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन फिरोज कात्रक आणि मॅनेजमेंट सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कुलीन शाह, सचिव वसंत खेतानी, खजिनदार अतुल संघवी, कोकिला मेहता आणि डॉ. शिल्पा चरनकर यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमाला लायन सदस्य, प्राचार्या डॉ. माला पांडुरंग, राखी गढवे, उप-प्राचार्य डॉ. अवनीश भट्ट, अल्पा दोषी, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा शेलार, सोनी सिंह, केजल धनधुकिया, कोमल रामपुरे तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान लायन जैमिनी थानावाला यांनी डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेसाठी चार संगणक देण्याची घोषणा करून संस्थेला आणखी बळ दिले. कार्यक्रमाच्या शेवटी लायन शीतल शाह यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. ही संगणक प्रयोगशाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी तांत्रिक कौशल्यवृद्धीचे नवे दालन ठरणार आहे.
