अमळनेर प्रतिनिधी :- जितेंद्र वाघ
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. भारतीय कृत्रिम अवयव निर्माण संस्था (ALIMCO) यांच्या वतीने आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या सहकार्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर येथे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे, चालण्याच्या काठ्या, ट्रायसायकल, व्हीलचेअर यांसारखे आवश्यक सहाय्यक साहित्य वितरित करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. केंद्र शासनाच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख योजनेमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांच्यासह विविध सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील वयोवृद्ध घटक अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.