अमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी :-
कजगाव,ता. भडगाव – कजगाव–पारोळा या महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहतूक तात्पुरत्या पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. मात्र हा पर्यायी मार्ग सुरक्षित न ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून त्यामुळे रस्त्यावर घसरण्याची शक्यता कायम असल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहतूक सर्रास सुरू असलेल्या या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. खडीचा थर रुळून कठीणपणे मार्ग तयार होईपर्यंत संबंधित विभागाने नियमित देखभाल करणे आवश्यक असूनही या दिशेने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दोनचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहने सुद्धा या मार्गावरून जात असल्याने धोका अधिक वाढला आहे.
अपघातांचे प्रमाण वाढ — नागरिक त्रस्त
स्थानिकांच्या मते, मागील आठवड्यात या मार्गावर छोटे–मोठे असे अनेक अपघात घडले असून अनेक वाहनचालकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या आहेत. यापैकी बहुतेक घटनांमध्ये खडीमुळे वाहनांचे नियंत्रण सुटणे हीच मुख्य कारणीभूत बाब असल्याचे त्यांनी सांगितले. काही दोनचाकी चालक प्रत्यक्ष संतुलन राखण्याचा प्रयत्न करताना रस्त्याच्या कडेला आदळून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी — तरीही कारवाई नाही
ग्रामस्थ, व्यापारी तसेच वाहनधारकांनी या समस्येकडे प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने लक्ष द्यावे म्हणून अनेक वेळा तक्रारी केल्या. तसेच पर्यायी मार्गावर नियमितपणे पाणी शिंपडणे, खडी हटविणे, चेतावणी फलक लावणे यासाठी मागणी करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी तीव्र झाली आहे.
