भडगाव प्रतिनिधी :–
कजगाव–नागाद (SH-39) या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील रस्त्याकरिता मंजूर करण्यात आलेल्या दुरुस्ती कामात गंभीर अनियमितता व दर्जाहीन कामकाज सुरू असल्याचा मोठा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. चेनज 59/900 ते 60/200 या दरम्यान ठेकेदाराकडून बेस लेयरमध्ये अत्यंत कमी मुरूम टाकण्यात आला असून, इस्टिमेटनुसार आवश्यक पातळी व मोजमाप न करता थेट खडीकरण टाकण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान उघड झाले.
PWDच्या नियमांची पायमल्ली.?
ग्रामस्थांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इस्टिमेट, मोजमाप पुस्तिका व तांत्रिक निकष पूर्णपणे बाजूला सारून रस्त्याचे काम मनमानीपद्धतीने केले जात आहे. कामस्थळी ना अभियंता, ना कोणतेही निरीक्षण, तर ठेकेदाराच्या इच्छेनुसार काम सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
“कामाची पातळी, मजबुती, मुरूम–खडीचे प्रमाण, रोलिंग यांसह कोणत्याही तांत्रिक प्रक्रियेचे पालन होत नाही. नियमांप्रमाणे बेस मजबूत नसेल तर संपूर्ण रस्ता काही दिवसांत उखडणार हे निश्चित” — असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.
दीर्घकाळचा विलंब, आता निकृष्ट काम
सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असून कजगाव, नागाद, भोकरदन, धामोडे परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वाहतूक होतो. तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. आणि अखेर काम सुरू झाले तरी तांत्रिक दर्जाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
रस्ता धोकादायक होण्याची भीती
वाहनधारकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की
> “अल्प मुरूम व चुकीच्या खडीकरणामुळे रस्ता काही दिवसांतच खोबणीदार व गचकेदार होईल. अपघातांची शक्यता वाढेल आणि शेवटी मूळ खर्च दुप्पट करून पुन्हा दुरुस्ती करावी लागेल.”
यामुळे सार्वजनिक निधीचा प्रचंड अपव्यय होणार असल्याची नागरिकांची भीती व्यक्त होत आहे.
लेखी तक्रार दाखल
या संदर्भात कजगाव येथील रहिवासी भूषण नामदेव पाटील यांनी 21 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पाचोरा कार्यालयात लिखित तक्रार दाखल केली असून तत्काळ पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा आणि निकृष्ट काम थांबवावे अशी स्पष्ट मागणी केली आहे.
पडद्याआड आर्थिक अनियमिततेची शंका.?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेसमध्ये कमी मुरूम, कमी खडी व अपुरी लेव्हलिंग केल्यास खर्च कमी होऊन आर्थिक गैरव्यवहार करण्यास मार्ग मोकळा होतो. त्यामुळे संपूर्ण कामाची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.
नागरिकांचा इशारा – “तत्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार”
ग्रामस्थांनी स्पष्ट केले:
> “निकृष्ट काम थांबवून तांत्रिक नियमांनुसार नव्याने मांडणी करावी, अन्यथा मोठ्या आंदोलनास बाध्य होऊ.”
पुढे काय.?
सध्या PWDकडून या तक्रारीची दखल घेतली आहे का, पाहणी झाली आहे का, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र परिसरात वाढत चाललेला संताप पाहता पुढील काही दिवसात या विषयावर मोठी घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
