पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा तालुक्यातील रताळे गावालगत असलेल्या आणि सध्या पूर्णतः उजाड अवस्थेत असलेल्या भाटपुरा (भाटपुरी) गावाच्या नावाने तब्बल ३७ हजार बोगस जन्म दाखले तयार केल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून उत्तर प्रदेश, बिहार तसेच परदेशापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा नसून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा येणाऱ्या महिनाभरात निश्चित छडा लावला जाईल, असा ठाम विश्वास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. सोमय्या यांनी सोमवार (दि. १९) रोजी रताळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन भाटपुरा परिसराची पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात महसूल, पोलीस व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.
यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून ते बोगस मतदार याद्या, बनावट जन्म-मृत्यू नोंदी व त्याआधारे तयार होणारी शासकीय कागदपत्रे या गैरप्रकारांचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे.
नागरिकत्व प्रक्रियेवर गंभीर परिणाम
आतापर्यंतच्या तपासात ३७ हजार बनावट जन्म नोंदी समोर आल्या असून, या नोंदींच्या आधारे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा प्रवेश, पासपोर्ट आदी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे तयार करण्यात आली असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या रॅकेटचे सूत्रधार उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सक्रिय असल्याचा प्राथमिक संशय असून, हा प्रकार बेकायदेशीर घुसखोरी व बनावट नागरिकत्वाच्या आंतरराष्ट्रीय कटाकडे निर्देश करणारा असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत कार्यालयात उच्चस्तरीय बैठक
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रताळे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, गटविकास अधिकारी एस. टी. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, तहसीलदार अनिल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया, ऑनलाइन प्रणालीतील प्रवेश अधिकार, ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदाऱ्या व प्रणालीतील त्रुटी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
ग्रामस्थ अनभिज्ञ
ज्या रताळे व भाटपुरा गावांच्या नावाने हजारो जन्म नोंदी झाल्या, त्या गावांतील ग्रामस्थांना या गैरप्रकाराची काडीमात्रही माहिती नसल्याचे समोर आले आहे. रताळे गावाचे सरपंच शांताराम पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायत स्तरावर असा प्रकार झाल्याची कोणतीही कल्पना नव्हती. सध्या वास्तव्यास कोणीही नसलेल्या भाटपुरा गावात जन्म नोंदी झाल्याने प्रशासनही अचंबित झाले आहे.
आरोपी अटक; नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी पाच आरोपींची नावे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, उजाड भाटपुरी गावाच्या नावावर ४,९०७ बोगस जन्म नोंदी आढळून आल्या असून, त्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दररोज १०० बोगस नोंदी रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.
जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीवर नाराजी
या प्रकरणाच्या गांभीर्यावरून किरीट सोमय्या यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. “या चौकशीसाठी मी स्वतः मुंबईहून येथे आलो आहे, मात्र जिल्हाध्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, बांगलादेशी व रोहिंगयांना भारतात घुसवण्याचे मोठे षड्यंत्र या प्रकरणामागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हा घोटाळा देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो. तपास अधिक वेगाने सुरू असून, लवकरच आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


