हॉस्टेलमध्ये राहून मैत्रिणीचाच विश्वासघात,रूममेटचे कपडे बदलतानाचे फोटो-व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले

हॉस्टेलमध्ये राहून मैत्रिणीचाच विश्वासघात,रूममेटचे कपडे बदलतानाचे फोटो-व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले
छत्रपती संभाजीनगर :-
शहरातील सिडको एन-8 परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच हॉस्टेलमध्ये, एकाच खोलीत राहून परस्परांवर विश्वास ठेवणाऱ्या मैत्रिणीनेच रूममेटचा विश्वासघात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचे कपडे बदलतानाचे खासगी फोटो व व्हिडिओ गुपचूप काढून ते आपल्या प्रियकराला पाठवण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी समृद्धी शिवाजी जगदाळे (रा. वंजारवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी समृद्धी या दोघी एम.जी.एम. हॉस्टेलमध्ये रूममेट म्हणून राहत होत्या. 18 जानेवारी रोजी पीडित तरुणी आपल्या खोलीत कपडे बदलत असताना समृद्धीने संधी साधून मोबाईलद्वारे तिचे खासगी फोटो व व्हिडिओ चित्रीत केले. हे फोटो-व्हिडिओ तिने तात्काळ आपल्या प्रियकर स्वराज धालगडे याला पाठवले, असा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
जाब विचारल्यावर मारहाण व धमकी
काही वेळाने हा प्रकार पीडित तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने समृद्धीकडे जाब विचारला. मात्र, समजावून सांगण्याऐवजी समृद्धी आणि तिचा मित्र स्वराज यांनी पीडित तरुणीला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धैर्य दाखवत सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी समृद्धी शिवाजी जगदाळे व स्वराज धालगडे यांच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे अधिक तपास करत आहेत. आरोपींचे मोबाईल फोन, डिजिटल पुरावे तसेच हॉस्टेलमधील परिस्थितीची सखोल चौकशी सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडूनच खासगीपणाचा भंग झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.



