
मराठी भाषा पंधरवडा निमित्त भडगाव न्यायालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त भडगाव वकील संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव न्यायालय परिसरात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मा. पी. व्ही. राजाळे मॅडम विराजमान होत्या.
अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश राजाळे मॅडम यांनी मराठी भाषेचे न्यायव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले. “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली संस्कृती, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीची ओळख आहे. न्यायालयीन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमानाने वापर झाला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक देशमुख सर उपस्थित होते. त्यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा तसेच बदलत्या काळात मराठी भाषेचे स्थान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. महेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास भडगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघाचे सचिव प्रकाश सोनवणे, अॅड. अशोक बाग, अॅड. मुकुंद पाटील, अॅड. आर. के. वाणी, अॅड. रणजित पाटील, अॅड. रोहित मिशर, अॅड. आसिफ शेख, अॅड. भरत ठाकरे, अॅड. प्रकाश तिवारी, समाधान सोनवणे, अॅड. कुणाल मोरे, सरकारी वकील जगपती मॅडम, अॅड. विजय महाजन, अॅड. उमेश महाजन यांच्यासह अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आलेली पक्षकार मंडळीही कार्यक्रमास उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी रानडे भाऊसाहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी हेमंत कुलकर्णी, वसंत चव्हाण, तसेच न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक बारी नाना, माळी नाना, शिपाई वाडिले आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचा गौरव व तिच्या संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवून गेला.



