देशमुख महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन नुकतेच ग्राम वडजी येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन वडजई येथील शहीद जवानाचे कुटुंबीय देविदास भिवसन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडजी येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय परदेशी, माजी सरपंच सुभाष कौतिक पाटील व माजी उपसरपंच कैलास रामदास पाटील उपस्थित होते.
‘आमचे ध्येय : युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या संकल्पनेवर हे विशेष हिवाळी शिबिर आधारित आहे. दि. २७ डिसेंबर ते दि. ०२ जानेवारीपर्यंत आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, श्रमदान, आपत्ती व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त भारत तसेच रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी अशा विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभ प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील, महिला साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना टेमकर उपस्थित होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. ए. मस्की यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
