Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 2

लाडक्या बहिणींचे महामार्ग रोको आंदोलन; मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प.!!!

0

भंडारा  प्रतिनिधी :-

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने भंडारा जिल्ह्यात महिलांचा संताप उफाळून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणूक पार पडूनही ही रक्कम अद्याप खात्यात जमा न झाल्याने संतप्त महिलांनी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केले.

आज सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने महिलांनी महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी वाहने, मालवाहू ट्रक आणि खासगी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, सरकारने दिलेले आश्वासन केवळ निवडणूक जिंकण्यासाठी होते का, असा सवाल निर्माण झाला आहे. महागाईच्या काळात या योजनेतील रक्कम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती तातडीने देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित मागणी शासनाकडे तातडीने कळवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर काही काळाने महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

आंदोलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र लाडक्या बहिणी योजनेतील आश्वासन लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.

भडगाव पेठ परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; ट्रॅक्टरसह १ ब्रास वाळू जप्त.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

मा. तहसीलदार भडगाव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मौजे भडगाव पेठ परिसर, ता. भडगाव येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात यशस्वी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे १ ब्रास वाळू, तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर वाळू कोणतीही अधिकृत परवानगी नसताना वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेला मुद्देमाल महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आला असून संबंधित चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी व महसूल पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. या पथकात ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लूळे, निखिल बावस्कर, प्रसाद दूदूस्कर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

अवैध वाळू उपशामुळे नदीपात्र व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाच्या महसुलाचाही अपहार होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर यापुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध वाळू उपसा अथवा वाहतुकीबाबत माहिती दिल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

भडगाव तालुक्यात नात्याला काळीमा.चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार पीडिता गरोदर

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात समाजाला हादरवून टाकणारी व मानवी नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या नात्याने चुलत बहिण असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, या अत्याचारातून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा पीडित मुलीच्या कुटुंबातील जवळचा नातेवाईक असून, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीवर वारंवार अत्याचार केले. अल्पवयीन असल्याने आणि भीतीपोटी मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीत बदल दिसून आल्याने कुटुंबीयांनी तिला तपासणीसाठी भडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी- वाल्मीक दिलीप शिरसाठ वय-२२ या तरुणाविरोधात भारतीय दंड विधानातील बलात्काराचे गंभीर कलम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्याची व अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून, तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे.

या घटनेमुळे भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

कजगाव येथे जळगाव–चांदवड महामार्गावरील गटारींची दयनीय अवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

0

भडगाव ता.प्रतिनिधी : अमीन पिंजारी

 

कजगाव येथून जाणाऱ्या जळगाव–चांदवड महामार्गालगत असलेल्या गटारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गालगत असलेल्या गटारीवरील ढापे अनेक ठिकाणी तुटलेले, हललेले किंवा पूर्णपणे गायब असल्याने पादचारी, लहान मुले तसेच वृद्ध नागरिकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अंधार व पाण्यामुळे तुटलेले ढापे दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही काही नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच महामार्गालगतच्या गटारींची गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित साफसफाई करण्यात आलेली नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी थेट महामार्गावर वाहत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचणाऱ्या घाणेरड्या पाण्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या गंभीर समस्यांकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण आहे.

“एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गटारीवरील तुटलेले ढापे त्वरित दुरुस्त करावेत, नवीन मजबूत ढापे बसवावेत तसेच महामार्गालगतच्या गटारींची संपूर्ण साफसफाई करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी कजगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

0

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

काझीपेठ तेलंगणा :

काझीपेठ येथील रेल्वे मैदानावर पार पडलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने आणि तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सातत्यपूर्ण व आक्रमक खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर पुरुष गटात रेल्वे संघाने दमदार खेळ करत राष्ट्रीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर अवघ्या एका गुणाने २३–२२ असा थरारक विजय नोंदवत २७ वे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवत १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आपल्या नावे केले.

महिलांचा अंतिम सामना : महाराष्ट्राची दमदार झुंज

महिलांच्या अंतिम लढतीत दोन्ही संघांनी अखेरपर्यंत चुरशीची झुंज दिली. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत २.१० मिनिटे संरक्षण व १० गुण मिळवले. तसेच संध्या मोरे (२.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.३० मिनिटे संरक्षण) आणि अश्विनी शिंदे (१.२० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली.

ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.१० मिनिटे संरक्षण व २ गुण), अर्चना माझी (नाबाद १.५० मिनिटे संरक्षण), मधुस्मिता ओझा (१.४० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शोभाश्री सिंग (१.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला; मात्र शेवटच्या क्षणी महाराष्ट्राने बाजी मारली.

पुरुषांचा महाअंतिम सामना : रेल्वेची सरशी

 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यंतराला १४–११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही रेल्वेने आपली पकड कायम ठेवत महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवला.

 

रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद २.३० मिनिटे संरक्षण व २ गुण), महेश शिंदे, जगन्नाथ दास (१.४० मिनिटे संरक्षण व ४ गुण), अरुण गुणकी (१.३७ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि अभिनंदन पाटील (४ गुण) यांनी चमकदार खेळ सादर केला.

महाराष्ट्राकडून अनिकेट चेंदवणकर (१.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), प्रतीक वाईकर (१.५५ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद १ मिनिट संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

उपांत्य फेरीतील लढती

पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कोल्हापूर संघावर २९–२७ असा २ गुणांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने ओडिशाचा २५–१७ असा ८ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली.

महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्ली संघावर २७–०६ असा एक डाव व २१ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. तर ओडिशाने विमान प्राधिकरण संघावर २७–१९ असा ८ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेतील मानकरी

महिला गट :

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – संध्या सुरवसे (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – अर्चना प्रधान (ओडिशा)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)

 

पुरुष गट :

एकलव्य पुरस्कार – रामजी कश्यप (रेल्वे, सोलापूर)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – प्रतीक वाईकर (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – अभिनंदन पाटील (रेल्वे)

चित्रकला परीक्षेत कै. गु.ज. सोनवणे. माध्यमिक विद्यालय कोठली विद्यालयाचे घवघवीत यश. १००टक्के निकाल.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत कै. गुलाबराव जगन्नाथ.. सोनवणे माध्यमिक विद्यालय कोठली या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेस १० विद्यार्थी बसले होते त्यापैकी. ए ग्रेड. बी ग्रेड. १ सी ग्रेड ७ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप जयसिंग परदेशी शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष, कलाध्यापक संघ जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार एम. के. पाटील व संस्थेचे पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक चंद्रकांत भोसले, रोहन राजेंद्र परदेशी, सुनंदा पाटील. सुनीता पाटील , रूपाली पाटील. अमोल साळुंखे. मीना देसले, दिपाली पाटील, रुपाली पाटील, महेश भाऊसाहेब,धनराज पाटील, किरण पाटील, भुषण भोसले, अविनाश पाटील, कमलेश पाटील, अभिषेक पाटील, दिपेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्र. 1, भडगाव येथे फूड फेस्टिवल (आनंद मेळावा) उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव  प्रतिनिधी :-

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक 1, भडगाव येथे मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थिनींच्या वतीने फूड फेस्टिवल (आनंद मेळावा) मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनींमधील उपक्रमशीलता, आत्मविश्वास व व्यवहारज्ञान वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून शाकीर खान यासीन खान कुरेशी (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, जि. प. उर्दू कन्या शाळा क्र. 1, भडगाव) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन, संघभावना व उद्योजकतेचे गुण विकसित होतात, असे मत व्यक्त केले.

या आनंद मेळाव्यास शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मोठ्या संख्येने पालकवर्ग, उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख खलील सर, जिल्हा परिषद उर्दू बॉईज शाळेचे मुख्याध्यापक जाहेद सर व शिक्षकवृंद, तसेच उर्दू बॉईज शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख नजीर सिराजोद्दीन मुजावर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शेख नईम सर यांनी फूड फेस्टिवल आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना, विद्यार्थिनींमध्ये जीवन कौशल्ये, आर्थिक व्यवहाराची जाण, स्वच्छता व टीमवर्कची सवय लागावी, यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले विविध पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत पाहुण्यांना पदार्थांची माहिती दिली. उपस्थित मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेत विद्यार्थिनींच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले.

संपूर्ण कार्यक्रम आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

कजगाव येथे एसटी बस मनमानीपणे थांबत असल्याने प्रवाशांचे हाल.!!!

0

भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी

कजगाव येथे एसटी बस स्थानिक टॉपवर न थांबता बस स्टॉपपासून काही अंतरावरच थांबत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच आजारी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एसटी महामंडळाच्या काही चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बस योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून धावपळ करावी लागत असून त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक टॉपवर बस न थांबवता रस्त्यावरच प्रवाशांना उतरवले जात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

या गंभीर प्रकाराबाबत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून संबंधित चालक व वाहकांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच कजगाव येथे सर्व एसटी बसेस स्थानिक टॉपवरच थांबवण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी कजगाव परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.

राज ठाकरेंनी अदानी साम्राज्याचा व्हिडिओ दाखवत भाजपवर जोरदार हल्लाबोल.!!!

0

मुंबई :-

मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत उपस्थितांना धक्का देणारे वक्तव्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत अदानी समूहाच्या वाढत्या साम्राज्याचा एक विशेष व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याची प्रतिक्रिया सभास्थळी उमटली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०१४ पूर्वी गौतम अदानी यांचे प्रकल्प मर्यादित स्वरूपात होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी समूहाच्या प्रकल्पांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. “मला व्यापाराला विरोध नाही, पण एका उद्योगपतीला इतकं सरकारचं संरक्षण आणि पाठबळ का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभेत राज ठाकरे यांनी आधी भारताचा नकाशा दाखवला. त्यामध्ये २०१४ साली अदानी समूहाचे किती प्रकल्प होते आणि आज देशभरात किती प्रकल्प आहेत, याची तुलनात्मक आकडेवारी त्यांनी सादर केली. मुंबई महानगर, महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अदानींच्या प्रकल्पांची सविस्तर यादीही त्यांनी दाखवली.

“भाजपने फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश विकायला काढला आहे. आपल्यासमोर काय वाढवून ठेवलं आहे, याची आपल्याला कल्पनाही नाही,” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनंतर आपल्या टीमने संशोधन केल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनातून समोर आलेली माहिती धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी सभेत अदानी साम्राज्याची क्लिप दाखवली.

“तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना भीती वाटेल. हे सगळं पाहिलं असतं तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असे परखड वक्तव्य करत राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना असा आरोप केला की, सत्तेचा गैरवापर करून काही निवडक उद्योगपतींना फायदा करून दिला जात आहे. “मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदानी कुठे होते आणि आज कुठे आहेत, हा प्रश्न देशातील जनतेने विचारायला हवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संयुक्त सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर वडजी ता. भडगाव येथे संस्थेचे सन्माननीय चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन व्ही. टी. जोशी होते. समारोप कार्यक्रमाला संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, विजय देशपांडे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा उपस्थित होते.

व्ही. टी. जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त व नेतृत्वगुण विकसित होतात. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे फार महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात मानवी मूल्यांची जोपासना केल्यास त्याचे व्यक्तिमत्व घडते”, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण पाटील, पत्रकार सुधाकर पाटील, वडजी ग्रामपंचायत सदस्य स्वदेश पितांबर पाटील, संजय आनंदा परदेशी, समाधान रामचंद्र पाटील, कैलास रामदास पाटील, भाईदास पाटील, संजय पाटील, दीपक जिजाबराव पाटील, बाबाजी पाटील, पोलीस पाटील कैलास मोरे तसेच वडजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वनराई बंधारा, बेरोजगार तरुण सर्वेक्षण, सामाजिक जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

समारोप सोहळ्यात रोहन दिलीप तडवी, कृष्णा ज्ञानेश्वर कोळी, चेतन रघुनाथ अहिरे, निशा सुनील बागूल व प्रांजल निलेश कासार यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले. तसेच रोशनी योगेश पाटील हिला उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून मान्यवरांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या वतीने सौरभ नाना गायकवाड, चेतन माणिक बोरसे, निशा सुनील बागूल व प्रांजल पाटील यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले, तर आभार प्रा.एस.सी. पाटील यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेकरिता उपप्राचार्य डॉ. डी.एम. मराठे, प्रा.डॉ एस. डी.भैसे, डॉ. ए.एन. भंगाळे, डॉ. सुनील शेलार, प्रा. एम. डी. बिर्ला, प्रा. डॉ.नारायण चिमणकर, प्रा. जी.एस.अहिरराव, प्रा. संजय झाल्टे, डॉ.डी. एच. तांदळे, डॉ. एस. एन. हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, डॉ. गजानन चौधरी, प्रा. अर्चना टेमकर, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ. चित्रा पाटील, डॉ. डी. ए. मस्की, प्रा. रचना गजभिये, प्रा. अधिकराव पाटील, डॉ. प्राजक्ता देशमुख, प्रा. प्रवीण देसले, प्रा. श्रद्धा ठाकूर, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. ज्योती नन्नवरे, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. मयूर दायमा, संदीप केदार, शिक्षकेतर कर्मचारी अजय देशमुख, दिलीप चौधरी, सुनील पाटील, दिलीप तडवी, प्रवीण तडवी, तुळशीराम महाजन आदींनी सहकार्य केले.

समारोप कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक एस.आर.पाटील, प्रा.एल.जी.कांबळे, प्रा.पी.डी.पाटील व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!