भडगाव प्रतिनिधी :-
मा. तहसीलदार भडगाव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मौजे भडगाव पेठ परिसर, ता. भडगाव येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात यशस्वी कारवाई केली.
या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे १ ब्रास वाळू, तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर वाळू कोणतीही अधिकृत परवानगी नसताना वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेला मुद्देमाल महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आला असून संबंधित चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी व महसूल पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. या पथकात ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लूळे, निखिल बावस्कर, प्रसाद दूदूस्कर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
अवैध वाळू उपशामुळे नदीपात्र व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाच्या महसुलाचाही अपहार होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर यापुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध वाळू उपसा अथवा वाहतुकीबाबत माहिती दिल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.




Recent Comments