मुंबई :-
मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत उपस्थितांना धक्का देणारे वक्तव्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत अदानी समूहाच्या वाढत्या साम्राज्याचा एक विशेष व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याची प्रतिक्रिया सभास्थळी उमटली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०१४ पूर्वी गौतम अदानी यांचे प्रकल्प मर्यादित स्वरूपात होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी समूहाच्या प्रकल्पांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. “मला व्यापाराला विरोध नाही, पण एका उद्योगपतीला इतकं सरकारचं संरक्षण आणि पाठबळ का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सभेत राज ठाकरे यांनी आधी भारताचा नकाशा दाखवला. त्यामध्ये २०१४ साली अदानी समूहाचे किती प्रकल्प होते आणि आज देशभरात किती प्रकल्प आहेत, याची तुलनात्मक आकडेवारी त्यांनी सादर केली. मुंबई महानगर, महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अदानींच्या प्रकल्पांची सविस्तर यादीही त्यांनी दाखवली.
“भाजपने फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश विकायला काढला आहे. आपल्यासमोर काय वाढवून ठेवलं आहे, याची आपल्याला कल्पनाही नाही,” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनंतर आपल्या टीमने संशोधन केल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनातून समोर आलेली माहिती धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी सभेत अदानी साम्राज्याची क्लिप दाखवली.
“तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना भीती वाटेल. हे सगळं पाहिलं असतं तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असे परखड वक्तव्य करत राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना असा आरोप केला की, सत्तेचा गैरवापर करून काही निवडक उद्योगपतींना फायदा करून दिला जात आहे. “मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदानी कुठे होते आणि आज कुठे आहेत, हा प्रश्न देशातील जनतेने विचारायला हवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संयुक्त सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.




Recent Comments