भंडारा प्रतिनिधी :-
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने भंडारा जिल्ह्यात महिलांचा संताप उफाळून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणूक पार पडूनही ही रक्कम अद्याप खात्यात जमा न झाल्याने संतप्त महिलांनी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केले.
आज सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने महिलांनी महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी वाहने, मालवाहू ट्रक आणि खासगी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, सरकारने दिलेले आश्वासन केवळ निवडणूक जिंकण्यासाठी होते का, असा सवाल निर्माण झाला आहे. महागाईच्या काळात या योजनेतील रक्कम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती तातडीने देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित मागणी शासनाकडे तातडीने कळवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर काही काळाने महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र लाडक्या बहिणी योजनेतील आश्वासन लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.




Recent Comments