
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभांनी भडगावातील राजकीय वातावरण तापले आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही सभा शक्तिप्रदर्शन ठरली. यावेळी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखाताई मालचे तसेच 24 नगरसेवक उमेदवारांना भक्कम मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
“धनुष्यबाणाचाच विजय निश्चित” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सभा सुरू होताच मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, चक्रधर स्वामी, कवी केशवसुत व बहिणाबाई चौधरी यांना वंदन करत भाषणाला प्रारंभ केला. जळगाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देत त्यांनी भडगावकरांशी आत्मीय संवाद साधला.
रेखाताई मालचे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले,
“रेखाताई मालचे आणि त्यांची 24 सदस्यांची टीम विकासाभिमुख आहे. भडगावचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद या पथकात आहे. येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाचा झेंडा विजयी होणारच.”
तसेच शहरातील महिलांच्या मोठ्या उपस्थितीबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.
विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “दोन तारखेपर्यंत कामाचा वेग वाढवा. तुम्ही मतदारांच्या पाठीशी उभे राहिलात, तर विरोधकांचा बँड वाजणार.”
आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह विविध कल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. भडगावसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे सांगून त्यांनी “आपत्ती तिथे शिवसेना” हे सूत्र अधोरेखित केले.
“भडगाव–पाचोरा दोन्हीकडे भगवा फडकणार” – मंत्री गुलाबराव पाटील
मुख्यमंत्र्यांनंतर बोलताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे–फडणवीस सरकारच्या निर्णयांचा तपशीलवार आढावा घेतला. पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचे निर्णय जनहिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला जमलेली गर्दी “भाडोत्री नसून प्रेमाने आलेली” असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की,
“शिंदे साहेबांविषयी जनतेत, विशेषतः महिलांमध्ये प्रचंड प्रेम आहे. आगामी निवडणुकीत भडगाव आणि पाचोरा दोन्हीकडे शिवसेनेचाच भगवा फडकणार. सुमारे २२ हजार मतांची आघाडी मिळेल.”
आमदार किशोर पाटील यांची विकासकामे आणि दुष्काळकाळातील मदतीचे कार्य पुन्हा अधोरेखित करून पाटील यांनी रेखाताई मालचे व संपूर्ण संघाला समर्थन मागितले.
“विकास दिसत नाही? तर मी व्हीआयपी चष्मा देतो!” – आमदार किशोर आप्पा पाटील
सभेचा मुख्य आकर्षण ठरलेले भाषण आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत केले. “काहीही आरोप झाले तरी जनता शंभर टक्के माझ्यासोबत उभी आहे. पैशांच्या आमिषाला भडगावची जनता कधीच बळी पडत नाही,” असे सांगून त्यांनी विरोधकांना ‘कौरव’ अशी उपमा दिली.
130 कोटींची पाणीपुरवठा योजना
भडगावच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मंजूर झालेल्या 130 कोटींच्या जलयोजनेची माहिती देताना पाटील म्हणाले,
“सहा महिन्यांत भडगावला 24 तास स्वच्छ पाणी मिळेल. बिसलरीसारखे पाणी नळातून येईल.”
170 कोटींच्या रस्ते विकासाला मंजुरी
नगरविकास विभागामार्फत 170 कोटींच्या रस्ते डीपीआरला मंजुरी मिळाली असल्याचे सांगत त्यांनी शहरातील रस्त्यांचे संपूर्ण आधुनिकीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले.
विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना त्यांनी विनोदी शैलीत उत्तर दिले –“निवडणुकीनंतर मी त्यांना व्हीआयपी चष्मा देईन. तो घातला की भडगावचा विकास त्यांना स्पष्ट दिसेल.”
उपस्थित नागरिकांनी हात वर करून विकासकामांना पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेच्या शेवटी रेखाताई मालचे व सर्व 24 उमेदवारांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत पाटील म्हणाले,
“निकाल असा द्या की विरोधक पुन्हा भडगावकडे वाकड्या नजरेनेही पाहणार नाहीत.”
सभेला भव्य जनसमुदायाची उपस्थिती
सभास्थळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आगामी नगरपरिषद निवडणुकीचा झंझावात भडगावात सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
राजकीय घडामोडींनी तापलेले वातावरण पाहता भडगावातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
