
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निरीक्षक श्री देवदत्त केकाण यांनी तालुका क्रीडा संकुल, भडगाव येथे भेट देऊन ईव्हीएम मशीनच्या सेटिंग व सीलिंग प्रक्रियेची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या तपासणीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि नियमांनुसार होत असल्याची खात्री केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. शितल सोलाट आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सौ. स्वालिहा मालगावे उपस्थित होते.
त्यानंतर श्री केकाण यांनी आचारसंहितेच्या पालनासाठी स्थापन केलेल्या फ्लाईंग स्क्वॉड/स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) चीही तपासणी केली. पथकाच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन त्यांनी कठोर दक्षता, प्रामाणिकता आणि निर्विघ्न कामकाजाचे निर्देश दिले, तसेच कोणत्याही गैरप्रकारांना वाव न देता निवडणूक पार पाडण्यावर भर दिला.
निरीक्षकांनी शहरातील नवे वडधे, यशवंतनगर, पेठ व भडगाव येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील आवश्यक सुविधा, व्यवस्थापन आणि उपलब्धता तपासली. सुविधांबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी निवडणूक तयारी समाधानकारक असल्याचे नमूद केले.
भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ शांत, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करून लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक श्री देवदत्त केकाण यांनी केले.
