भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून सर्वच प्रभागांत उमेदवारांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या नगमा बी अलीम शाह यांच्या प्रचार फेरीला रविवारी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उमेदवार अलीम शाह यांनी घरोघरी भेट देऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या दरम्यान त्यांनी प्रभागातील प्रलंबित व मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत समस्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दिवाबत्ती व्यवस्थेतील त्रुटी, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी नागरिकांसमोर व्यक्त केला.
विशेषतः महिलांच्या अडचणी, पाणीपुरवठा योजनेतील गळती दुरुस्ती, तसेच गल्लीस्तरावरील छोट्या पण महत्त्वाच्या नागरी सुविधा उभारणीसाठी त्यांनी कार्ययोजना तयार असल्याचे स्पष्ट केले. परिसरातील महिला आणि युवकांचा प्रचार फेरीत लक्षणीय सहभाग दिसून आला.
नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करून त्यांच्याशी समस्या व अपेक्षा व्यक्त केल्या. विविध समाजघटकांकडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील वातावरण अधिक रंगतदार होत असून उमेदवारांचे प्रचार कार्यक्रम पुढील काही दिवसांमध्ये आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
