
कजगाव येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न,गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या विविध मागण्या
भडगाव ता प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आज (दि. २६) सकाळी अकरा वाजता ग्रामसभा उत्साहात पार पडली. लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई करावी, सांडपाणी रस्त्यावर वाहू नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.
यासोबतच डी.पी.सी. मार्फत मंजूर झालेल्या विद्युत पोलांचे योग्य नियोजन करून त्यांची उभारणी करावी, सुरक्षेच्या दृष्टीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सरकारी जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करावी, ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब पारदर्शक ठेवावा, तसेच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने रखडलेली सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशा अनेक समस्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केल्या.
यावेळी कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत मांडण्यात आलेले सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
या ग्रामसभेला महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.



