जळगावराजकीय

पाडळसरे धरणाच्या कुशीत स्व. अजितदादांच्या अस्थींचे भावपूर्ण विसर्जन

पाडळसरे धरणाच्या कुशीत स्व. अजितदादांच्या अस्थींचे भावपूर्ण विसर्जन

अमळनेर प्रतिनिधी :-
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण येथे महाराष्ट्राचे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे अत्यंत शोकाकुल वातावरणात विसर्जन करण्यात आले. या भावनिक विधीचे नेतृत्व माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी केले. हजारो कार्यकर्ते, नागरिक आणि दादाप्रेमींच्या उपस्थितीत हा विधी पार पडला.

दोन वर्षांपूर्वी अमळनेर तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी स्व. अजितदादांनी पाडळसरे धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी व परिसराच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या धरणाबाबत त्यांनी विशेष लक्ष दिले होते. आज त्याच धरणाच्या कुशीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. विकासाचा ध्यास घेतलेल्या या लोकनेत्याच्या आठवणी या धरणाच्या पाण्यात कायमस्वरूपी कोरल्या गेल्या, अशी भावना यावेळी व्यक्त होत होती.

यापूर्वी अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेला मार्गातील प्रत्येक गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, मेणबत्त्या पेटवून व पुष्पहार अर्पण करून दादांना श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रथयात्रेदरम्यान “अजितदादा अमर रहें”, “दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी नागरिक भावूक होऊन अश्रूंनी दादांना अखेरचा निरोप देत होते. हजारो नागरिकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, “स्व. अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते सामान्य जनतेचे दुःख समजून घेणारे, विकासाला दिशा देणारे नेतृत्व होते. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी अशा प्रत्येक घटकासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. पाडळसरे धरणाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली. आज त्यांच्या अस्थी याच धरणात विसर्जित होत असताना, दादांचे विचार आणि कार्य कायम स्मरणात राहतील.”

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण असूनही, दादांच्या कार्याबद्दल कृतज्ञतेची भावना सर्वत्र दिसून येत होती.

दादा गेले नाहीत, ते जनतेच्या हृदयात आणि विकासाच्या प्रत्येक वाटेवर अजरामर झाले आहेत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!