राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग, दादांचा आमदार शरद पवारांना का भेटला.?

24

राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग, दादांचा आमदार शरद पवारांना का भेटला.?

पुणे :-

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता. यादिवशी दिल्लीत अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा महत्त्वाच्या नेत्यांनी पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती.

ही भेट वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी त्यावेळी दिलं होतं. मात्र या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबतचं सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं असं भाष्य केलं होतं.

या सगळ्या घडामोडीनंतर आज सोमवारी सकाळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे. तुपे हे अजित पवारांच्या जवळचे नेते मानले जातात. अशा स्थितीत तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. मात्र य सगळ्यावर आमदार चेतन तुपे यांना स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा त्यांनी धुडकावून लावल्या आहेत. शिवाय आपण राजकीय कारणांसाठी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त भेट घेतली. यावर आमच्यात चर्चा झाली. बैठकीचा राजकीय हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तुपे यांनी दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चेतन तुपे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या, त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत, त्याबद्दल चर्चा झाली. नवीन वर्ष सुरू होत आहे, त्यामुळे रयतने काही गोष्टी राबवायचं ठरवलं आहे. शाळांच्या काही सुधारणा करायच्या आहेत. त्याबाबत सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. माझे आणि शरद पवार यांचे कौटुंबीक संबंध आहेत, प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रयत संस्थेचे इतर काही लोकही शरद पवारांना आज भेटले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा