मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने श्री पांडुरंग पालखी स्वागत सोहळा मागील २६ वर्षांपासून अखंडपणे आयोजित केले जात आहे. या परंपरेनुसार लालबाग येथील संत संताजी जगनाडे महाराज चौकात गेल्या दहा वर्षांपासून संत संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या वतीने पालखीचे भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात येते. यंदाही वारकरी संप्रदायातील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
पालखी स्वागतासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींसह वारकरी भाविकांसाठी अल्पोपाहार व चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सामाजिक जाणीव जपत संताजी लेखणी अर्थात पेन तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमस्थळी आकर्षक बॅनरच्या माध्यमातून संत संताजी महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, ही ऐतिहासिक माहिती वारकरी व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विशेष मांडणी करण्यात आली होती. या उपक्रमास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या भक्तीमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर, किशोर मेहेर, राम देशमाने, संतोष पन्हाळे, शिवाजी झगडे, अनिल चौधरी, देविदास राऊत, गजानन घाटकर, सचिन लोखंडे, सुरेश धानके, ॲड. रघुनाथ महाले, मुकुंद चौधरी, सचिन करडिले, संजय डाके, स्वप्नील मावळे, अनिल मावळे, अमित डाके, प्रशांत कसाबे, अशोक करडिले, भरत फल्ले, भूषण खोंड, रूपाली मावळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या वारकरी भाविकांचे, समाज बांधवांचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष दिलीप खोंड यांनी मनःपूर्वक आभार मानले. समाजातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी साकारण्यात आलेली आकर्षक रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली, तर समाज बंधू-भगिनींनी फुगड्या खेळत भक्ती आणि आनंदाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांची जबाबदारी संतोष झगडे व नीलेश कसाबे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडली.




Recent Comments